शब्दाचे सामर्थ्य १४२

५०

नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर

श्री. काकासाहेब खाडिलकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे स्मरण करीत असताना साहजिकच मराठी रंगभूमीचा सारा वैभवशाली काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. वस्तुतः पारतंत्र्याच्या काळात एक घनघोर राष्ट्रीय संघर्षाच्या प्रांरभकाळीच खाडिलकर पत्रकार म्हणून आपले विचार 'केसरी' च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले होते. पण त्याच काळात खाडिलकरांनी 'स्वयंवर' 'मानापमान' सारखी ललित नाटके लिहिली आणि आपल्या रसिक प्रवृत्तीचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. ते स्वतः म्हणाले होते, की 'मी प्रथम नाटकी आहे, नंतर पत्रकार आहे.'

खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. एक प्रकारे त्यांच्या मनाची घडण आध्यात्मिक होती. त्यांच्या नाटकांतील अनेक पात्रे या गुणांचे दर्शन घडवितात. तसेच, खाडिलकरांच्या सगळ्या नाटकांत कै. तात्यासाहेब केळकरांनी म्हटल्याप्रमाणे 'ओज हा गुण आहे', त्यांचे शृंगार आणि करुण रससुद्धा ओजगुणान्वित असतात; व त्यामुळे त्या रसाभोवती एक प्रकारचे उदात्त वातावरण निर्माण होते. मला वाटते की, महाभारतातील व्यक्तिरेखांना हीच युद्धाची पार्श्वभूमी आहे. त्यातील शृंगार हा वीरांचा आहे, त्यातील कारुण्यही युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घटनांचे आहे आणि त्या युद्धामुळे व्यक्तींच्या जीवनांत निर्माण झालेल्या तणावांचे महाभारतात वर्णन आहे. मराठ्यांच्या इतिहासातही हेच कारुण्य-नाट्य आहे. खाडिलकरांनी 'स्वयंवर', 'भाऊबंदकी' किंवा 'सवाईमाधवराव यांचा मृत्यु' या नाटकांचे विषय निवडले, ते याच आकर्षणामुळे असावेत. एका युयुत्सू व प्रतिभाशाली नाटककाराला जो शृंगार, जे कारुण्य दिसले, ते युध्दाच्या पार्श्वभूमीवरचेच होते. राजकारणातील कारस्थाने व त्यांचे पर्यवसान दाखविणारे 'भाऊबंदकी' आनंदीबाई-राघोबा यांचा शृंगारही दाखविते किंवा 'स्वयंवरा' तील 'खडा मारायचा झाला, तर माझ्या हातावर नाही, घागरीवर मारायचा, तसंही नको... खड्यानं घागर फुटून मी ओलीचिंब झालेली मला नाही आवडायचं... ही रुक्मिणीची वाक्ये शृंगारिक पोताचीच आहेत. 'मानापमान'तही मदनबाधा झालेली भामिनी धैर्यधराकडेच आकर्षित होते. नव्हे, त्याचा ती ध्यास घेते. शूरांचा शृंगार, त्यांच्या कौटुंबिक जीवनातील नाट्य, त्यांचे खलपुरुषाशी येणारे संबंध व त्यांतून निर्माण होणारे तणाव हे खाडिलकरांचे आवडते विषय आहेत.

अर्थात आता आपले विषय साहजिकच बदलले आहेत. ज्या अर्थाने आज आपली नाटके सामाजिकदृष्ट्या वास्तव वाटतात, तशी खाडिलकरांची नाटके वाटत नाहीत. निदान आज पाहताना तरी तशी ती वाटत नाहीत. किंबहुना ती रोमँटिक वा कल्पनारम्यच वाटतील. गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत मानवी मनाचे अंतरंग उकलून दाखविणारी नाटके लिहिली जात आहेत. कारण त्याचे अंतरंगच बदलत आहे. त्याची सामाजिक व व्यक्तिगत मूल्ये बदलत आहेत. त्यामुळे आजचे सामाजिक नाटक पाहताना त्यातील संघर्षांनी मन व्याकूळ होते. खाडिलकर किंवा त्या काळातील सर्व नाटककार यांनी जे समाजदर्शन घडविले आहे, ते एका अर्थाने अत्यंत ढोबळ आहे. चांगले आणि वाईट या दोन गडद रंगांनी रंगविलेली 'एकच प्याला' सारखी नाटके किंवा 'मानापमान' सारखी काल्पनिक संघर्ष रंगविणारी नाटके आता चिकित्सक मनाची पकड घेतीलच, असे सांगता येत नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org