शब्दाचे सामर्थ्य १४१

४९

सुधांशु (ह. न. जोशी)

श्री. सुधांशु हे आमच्या कृष्णाकाठचे संवेदनशील प्रसिद्ध कवी आहेत. आपल्या साध्या, पण संवेदनशील जीवनात रममाण असणारा हा कवी अवतीभोवतीच्या समाजजीवनात सहानुभूतीने समरस होणारा खराखुरा साहित्यिक आहे. त्यांच्या कवितांचे प्रसिद्ध झालेले छोटे छोटे काव्यसंग्रह यापूर्वीच मराठी वाचकांपुढे आलेले आहेत, आणि त्या सर्व कविता मी पहिल्यापासून अत्यंत आवडीने वाचीत आलो आहे. त्यांच्याबद्दल व त्यांच्या कवितांबद्दल मला वाटणारा जिव्हाळा मी येथे व्यक्त करीत आहे. काव्याच्या क्षेत्रात जाणता वाचक या नात्याखेरीज अकारण प्रवेश करण्याचा मला फारसा अधिकार नाही, हे मी जाणतो.

कल्पनाशक्ती शापही आहे आणि वरही आहे. अतितरल कल्पनाशक्ती असल्याशिवाय सरस साहित्यनिर्मिती होणे कठीणच. परंतु हा शाप जीवनातल्या अनंत वेदना शब्दरूप करणारा आहे. स्वतःच्याच नव्हे, तर सहसंवेदनेने अनेकांच्या भावनांना शब्दरूप देऊन निर्भेळ आनंदाची निर्मिती करणारा असा हा शाप एखाद्या भाग्यवंतालाच पूर्वपुण्याईने लाभतो.

सूर्य जे पाहू शकत नाही, ते कवी पाहू शकतो. जीवनातल्या अशा काही खाचाखोचा असतात, की त्या सुसह्य व्हायला जगातले पांडित्य, सारे तत्त्वज्ञान अपुरे ठरते. कवीच्या मुखातल्या एका आर्त शब्दात ह्या सार्‍या अनुभवातून एक निराळे भव्य-दिव्य स्वप्न दाखवायची शक्ती असते, समवेदनेचा दिलासा असतो. सुख वाढवणारी, दुःखे हलकी करणारी, आशेच्या नवजीवनाने नवजीवन जगण्याची उमेद देणारी ही संजीवनी मुक्त हस्ताने सर्वांना देण्याचे औदार्य कविमनालाच असते.

कवी 'सुधांशु' कल्पनाशक्तीचे हे असेच वरदान घेऊन वाचकांपुढे 'स्वर' रूपात आले आहेत. 'दत्त दिगंबर दैवत माझे' या भक्तिमधुर गीताने सर्वांनाच परिचित झालेले. 'सुधांशु' रसिकांच्या भावमनाला अनेक स्वरमधुर गीतांनी रिझवीत आहेत. घराघरांतून नित्य नव्या भावोन्मेषाने त्यांची गीते आबालवृद्धांच्या ओठांतून उमटतात.

कृष्णाकाठचा हा मराठमोळा कवी प्रीती, भक्ती, कारुण्य, उद्वेग, दुःख, तृप्ती अशा नवविध स्वररसांची उत्कटता घेऊन वाचकांच्या भेटीला येत असतो. भावनोत्कटतेने रंगलेले त्यांचे काव्य रसिकांना निश्चितच आवडते.

कवी 'सुधांशू'चे काव्य कधी रडवील, कुठे हसवील, तर कुठे वाचकांना अभिमानाने आनंदाचे नवे स्फुरणही देईल.

'सुधांशूं' च्या कविता सहज-सोप्या प्रसादयुक्त शब्दरचनेने विलोभनीय असतात. या स्वराला 'माउलीच्या ओव्यांचा ठेवा' मिळाल्याचा सार्थ अभिमान आहे. जन्मग्रामाबद्दलच्या - जन्मठिकाणाबद्दलच्या, परिसरासंबंधी, संस्कारासंबंधीच्या - समृद्धीविषयीच्या भावना त्यांच्या कवितांतून व्यक्त झालेल्या दिसून येतात. मातृप्रेम, देशप्रेम, प्रीती, समाजजीवन, आकांक्षा, शल्ये यांविषयी जितक्या उत्कटतेने, आर्ततेने हा स्वर गात आहे, तितक्याच व्यथित आर्त भावनेने चांद्रवीर, रवींद्र सरोवर, गंधर्व गीतांची चंदनी रजनी ही उजळून निघालेली आहे. 'पोरबंदरीची ज्योत' सुद्धा या भावस्वरांना उजळून राहिलेली आहे. या स्वरांचे हे वैशिष्ट्य मनाला आगळे समाधान देते. ज्याला जे हवे आहे, ते या 'स्वरा'ने शब्दरूपात पुढे केलेले आहे. या पाथेयाच्या विविध रूपांचे कौतुक करायचे आहे रसिकांनी!

आजकाल कवितांना व्यवहारी जगात बाजारभाव नसला, तरी अजूनही कविता आवडीने वाचणारे आणि ऐकणारे रसिक संख्येने कमी नाहीत. किंबहुना कवितांना स्वरबद्ध करून गुणगुणायचा छंद वाढताच आहे. गेय कवितांची ही मागणी व्यवहारात भावगीत म्हणून खपते. कविता, खरे तर, मूळचेच भावगीत असते. या भावगीतांचा 'स्वर' सुधांशूंना नैसर्गिकपणाने सहज, स्वाभाविक सुरेल व माधुर्याने मनोहर होऊन लाभला आहे. अशा या अवीट स्वरमाधुर्याची ओढ मराठी रसिक माणसाला हवीहवीशी वाटेल, यात शंका नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org