शब्दाचे सामर्थ्य १३९

४७

बाबूराव शेटे

श्री. बाबूराव शेटे यांचा, मुंबईतील पन्नासांहून अधिक संस्थांनी सत्कार-समारंभ आयोजित केला होता. १९८० च्या एप्रिल महिन्यात हा समारंभ झाल्याची माझी आठवण आहे. मानपत्र अर्पण करण्याच्या या समारंभात श्री. बाबूराव यांचा उल्लेख मी 'सार्वजनिक बाबूराव' असा केला होता. श्री. बाबूराव शेटे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत. सार्वजनिक कार्यकर्ता कसा घडतो किंवा घडावा, याचे प्रात्यक्षिक म्हणजे बाबूरावांचे जीवन आहे.

ते आमच्या कराड तालुक्यातील येळगाव हे त्यांचे जन्मगाव सोडून, वयाच्या पंधराव्या वर्षी मुंबईला नशीब काढायला म्हणून निघाले. या मुलामध्ये मुळातच नव्या कामाची हौस, कुतूहल आणि परिश्रम करण्याची जबरदस्त तयारी होती. या गुणांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा श्रीगणेशा झाला. मुंबई ही एक विराट नगरी. या शहरात स्वतःचे व्यक्तिमत्त्व दाखवायचे म्हटले, तर तसे अवघड काम आहे. परंतु सेवाबुद्धीने काम करणा-या माणसाला अपूर्व संधी देणारे हे बहुरंगी शहर आहे.

मुंबईतल्या वरच्या श्रेणीतल्या माणसाला स्पर्धेतून नाव कमावणे अवघड ठरत असेल कदाचित; परंतु सामान्य माणसाला सेवा-भावातून व्यक्तित्व बांधता येते. श्री. बाबूराव शेटे मुंबईत पोहोचल्यावर आपले स्वतःचे व्यक्तित्व बांधावे, म्हणून त्यांनी काम केले, असे नाही; ते काम करीत गेले आणि त्यातूनच त्यांचे व्यक्तित्व वाढत गेले.

मी व्यक्तिशः त्यांना कमीत कमी पंचवीस वर्षांहून अधिक काळ ओळखतो. ते मला प्रथम भेटले, तेव्हाच मला असे वाटले की, या माणसात काही विशेष चमक आहे. मुख्यमंत्री असताना अनेकविध कामांसाठी माझ्याकडे येणा-यांत बाबूराव नाहीत, असे कधी झाले नाही. त्यामुळेही माझ्या लक्षात आले, की या माणसात काही विशेष गुण आहेत.

श्री. बाबूराव शेटे यांनी मुंबईसारख्या शहरात अनेक संस्था उभ्या केल्या. सामान्य माणसांना साथीला घेऊन संस्था उभारल्या. संस्था बांधण्याचे काम करताना वैयक्तिक जीवनात शाश्वती यावी, असे प्रयत्‍न करायला बाबूराव चुकले नाहीत. जीवन-चरितार्थासाठी नोकरी करायची आणि संस्था बांधण्याचे कामही करायचे, असे सुरू राहिले. बाबूरावांनी आपल्या जीवनाला संस्थात्मक घाट दिला आहे. एका व्यक्तीचा संस्थांशी किती आणि कसा क्रियाशील संबंध असू शकतो, हे त्यांचे कार्य पाहिल्यावर लक्षात येईल. संस्था-बांधणीचे काम करण्यासाठी बाबूरावांना आपले जीवन नियमित करावे लागले. वैयक्तिकदृष्ट्या त्यांच्या जीवनाची पार्श्वभूमी खेड्याची असल्याने आणि नशीब काढायला म्हणून स्वतः मुंबईस आलेले असल्याने, नशीब काढायला मुंबईत येणा-यांबद्दलची त्यांची सहानुभूती जिवंत आहे.

करुणेच्या पोटी काम केले पाहिजे, अशा उपदेशाची त्यांना गरज नाही. गरिबीच्या दाहकतेचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला असल्याने ते ही कामे करण्यात आणि त्यासाठी निर्माण केलेल्या संस्था, यांच्याशी ते ताबडतोब एकरूप होऊन जातात. त्यांना कसल्याही त-हेचा न्यूनगंड नाही. मुंबईतल्या कार्यक्षेत्रातल्या सर्व स्तरांवरील मंडळींशी बरोबरीच्या नात्याने बोलून चर्चा करण्यात आणि काम यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. ते मुंबईचे महापौर झाले, तेव्हा निदान मला तरी आश्चर्य वाटले नाही. याच्याहीपेक्षा मोठ्या जागा शोधण्याची त्यांची कुवत आहे, अशी माझी भावना आहे. आज तर ते सार्वजनिक कार्याच्या उमेदीच्या काळात आहेत. त्यांच्या समोर अजून वीस-पंचवीस वर्षे आहेत. त्यात ते आणखी नावलौकिक मिळवतील, असा विश्वास वाटतो.

मुंबई शहर हे संमिश्र लोकवस्तीचे शहर आहे. श्री. बाबूराव शेटे यांनी या शहरातील विविध थरांतील आणि कमी-अधिक प्रमाणात विविध धर्मीयांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत. मराठी, गुजराती समाज, कामगार-वर्ग, सरकारी कर्मचारी, सर्व राजकीय पक्षांतील कर्ती माणसे यांच्याशी त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत. राखावी बहुतांची अंतरें ! हा समर्थांनी केलेला उपदेश बाबूरावांच्या रक्तात आहे. बहुतांची अंतरे त्यांनी राखली, पण त्याचा उपयोग सार्वजनिक संस्थांच्या कार्यासाठी केला आहे, वैयक्तिक कामासाठी नाही. अशा या कर्तबगार माणसाचे जीवन मुंबईतल्याच नव्हे, तर महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे.

श्री. बाबूराव शेटे यांचे जीवन वैयक्तिक यशाची कथा नव्हे. सार्वजनिक कार्यकर्ता कसा बनतो, त्याची ही कहाणी आहे. अशा या गुणी माणसाचे चरित्र जीवन नवतरुणांना खचितच प्रेरणा देईल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org