शब्दाचे सामर्थ्य १३७

४५

दादा उंडाळकर

१९३० मध्ये व त्यानंतर कराड तालुक्यात व सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्य संग्रामात कार्य करताना बाळकृष्ण ऊर्फ दादा उंडाळकरांचा व माझा संबंध आला. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक नवा तडफदार तरुण सार्वजनिक कार्यकर्ता जिल्हा बोर्डाचा सदस्य म्हणून, दादांचा तेव्हा वाढता नावलौकिक होता. स्वातंत्र्य-संग्रामात कार्य करणा-या कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार असे. ग्रामीण भागातील प्रश्नांसंबधी तळमळ व त्या प्रश्नांसंबंधी त्यांची मते ते अगदी स्पष्ट, परखडपणे मांडीत असत.

१९३७ नंतर ते काँग्रेस संघटनेत सामील झाले व त्यामुळे त्या वेळच्या दक्षिण सातारा जिल्ह्यात काँग्रेसची शक्ती वाढविण्यास फार मोठी मदत झाली. दादांच्याबरोबर त्यांचे थोरले चिरंजीव व माझे मित्र कै. शामराव एक क्रियाशील, एकनिष्ठ कार्यकर्ते होते. दादांचा सर्व परिवार काँग्रेसमय झाला होता. विशेषतः, दादांनी माझ्यासंबंधी जो जिव्हाळा दाखविला व वेळोवेळी कामाचे कौतुक केले, ती गोष्ट मी कशी विसरू? सार्वजनिक कामांतील दैनंदिन सहवासाने त्या परिवाराविषयी माझा जिव्हाळा वाढला गेला. ज्या जुन्या गोष्टींनी दादांची व शामरावांची आठवण झाली, म्हणजे आजही मन भरून येते.

१९४२ च्या चळवळीत दादांनी स्वतःला मनापासून झोकून दिले होते. या चळवळीच्या काळातील त्यांचा निर्धार विलक्षण होता. १९४२ च्या ऑगस्टपूर्वी देशाच्या घडामोडी कशा होतील, यासंबंधी त्यांची-माझी सहज चर्चा झाल्याचे मला आठवते. दादा त्यांच्या शैलीत म्हणाले होते, 'यशवंतराव, म्हातारा (महात्मा गांधी) अखेरची भाषा बोलू लागला आहे. मला ब्रिटिशांची धडगत दिसत नाही. काय जे ठरेल, ते नेटाने करू'.

ऑगस्टमध्ये भूमिगत राहून कार्य करण्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा निर्धार ही एक मोठी शक्ती होती. कराड तालुक्याच्या मामलेदार कचेरीवरील मोर्च्याचे नेतृत्व करण्याचा दादांनी निर्धार केला आणि ज्या निर्धाराने प्रचंड मोर्चा त्यांनी नेला, तो दिवस आजही माझ्या डोळ्यांसमोर तसाच दिसतो आहे.

दादा तसे मोठे वक्ते नव्हते. पण खासगी बैठकीत मात्र ते तासन् तास चर्चा करीत. मुद्देसूद, स्पष्ट आणि परखड. चांगल्यांना चांगले व वाइटाला वाईट म्हणण्यास ते कधी मागे-पुढे पाहत नव्हते. पण अंतःकरणात कोणाबद्दलही वैराची भावना कधी नव्हती.

४२च्या चळवळीतील कारावासातून परत आल्यानंतर त्या वेळी चाललेल्या उठावाच्या चळवळीला त्यांचा मोठा आधार होता. दक्षिण कराडमधील त्यांच्या भागातील जनता त्यांना फार मानीत असे.

१९६० नंतर ते प्रत्येक कार्याच्या व्यापातून काहीसे बाजूला झाले आणि आपले गाव व आपला विभाग यांत विधायक प्रवृत्तीने काम करू लागले. त्याचे कारण त्यांचे थोरले चिरंजीव शामराव त्यांच्या आधी गेले होते. दुर्दैवाने, त्यांना मृत्यूने ओढून नेले होते. घरातील कामे व शेतीच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी त्यांची गरज होती व त्यांचे दुसरे चिरंजीव विलासराव यांनी त्यांच्या सार्वजनिक कामाचा बोजा उचललेला होता. आपल्या सार्वजनिक कार्याच्या व्रताची व काँग्रेसच्या कामाची परंपरा त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या हाती दिली. ग्रामीण भागातील शेतीच्या व शिक्षणाच्या विकासाचा त्यांना शेवटपर्यंत ध्यास होता आणि त्यांनी त्या विभागात अनेकविध संस्था चालवून त्या कार्याचा भक्कम पाया घातला आहे.

बाळकृष्ण ऊर्फ दादा उंडाळकर हे सातारा जिल्ह्यातील आमच्या पिढीला ज्येष्ठ भावासारखे व्यक्तित्व होते. आज ते आमच्यांत नाहीत; पण त्यांचे काम त्यांचे सतत स्मरण देत राहील आणि म्हणूनच कृतज्ञतापूर्वक आज ही श्रद्धांजली वाहत आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org