शब्दाचे सामर्थ्य १३६

पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या क्षेत्रात सुरू करून तो चालविण्याकरिता स्वतः पाठीमागे राहून त्यांनी गाडगीळांसह इतर सहका-यांना फार मोठी मदत केली आणि त्या कारखान्याच्या यशाला या त्यांच्या स्वभावाची फारच मोठी मदत झाली असली पाहिजे, असे मला वाटते. किंबहुना शक्यतो पाठीमागे राहून इतरांकडून काम करून घ्यावे, हाही विठ्ठलरावांचा स्वभावविशेष आहे. आपल्या तरुणपणी आपल्या गावात काढलेल्या सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी इतरांना दिले होते आणि त्यांच्याकडून काम उत्तम पार पडेल, याची ते काळजी घेत होते. सार्वजनिक जीवनात शंकेचे वातावरण उभे राहू नये, यासाठी ग्रामीण जीवनात काळजी घ्यावी लागते, याचे उत्कट उदाहरण विखे पाटील यांच्यांत पाहण्यास सापडते. ऐन उमेदीच्या दिवसापासून परान्न घ्यावयाचे नाही, हा त्यांचा विशेष नियम आहे. तो आजपर्यंत चालू आहे. ते कोणाच्याही घरी किंवा कोणत्याही समारंभास जावोत, आपल्या खिशातून फडक्यात बांधून आणलेली चटणी-भाकरच ते खातील. मिष्टान्नाच्या पंगतीलाही माझी भाजी-भाकरी, असे म्हणून समाधानाने दोन घास खाऊन ते मोकळे होतात. ग्रामीण भागात काम करावयास लागणा-या स्वभावाची त्यांनी या त-हेने अत्यंत काळजीपूर्वक जपणूक केलेली आहे.

१९४५-५५ नंतर महाराष्ट्रात साखर कारखाने वेगाने वाढत आहेत. त्यातून काही नवे नवे सामाजिक व आर्थिक प्रश्नही उभे राहिले आहेत. प्रयत्‍नपूर्वक त्यांची सोडवणूक करावी लागेल, हे जरी खरे असले, तरी या सहकारी साखर कारखानदारीची वाढ कृषि-औद्योगिक समाजाच्या वाढीच्या दृष्टीने एक अपरिहार्य व स्वागतार्ह घटना आहे, असे माझे मत आहे. विखे पाटील यांचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी या घटनेचा श्रीगणेशा केला. सहकारी कारखानदारीप्रमाणे ग्रामीण भागात अद्ययावत शिक्षण हुशार मुलांना मिळावे, याची त्यांना फार चिंता आणि त्यासाठी त्यांनी योजना केल्या व अमलात आणल्या. त्यात श्री. अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या सहका-यांची त्यांना त्या वेळी चांगली साथ मिळाली. लहान लहान माणसे समाजाच्या विकासाच्या कामाची जी साखळी संघटनेच्या शक्तीवर बांधतात, त्याला मदत करणे, त्याची वाढ होईल, असे पाहणे, पितृहृदयाने या वृत्तीची व ही वृत्ती असणा-या माणसांची जोपासना करणे हे लोकशाहीतील राज्यशक्तीचे काम आहे. लोकशाहीत हे करता येते, असा माझा अनुभव आहे; आणि म्हणून मी त्या वेळच्या माझ्या भाषणात म्हटले होते की, 'लोकशाहीत हाच खरा आनंद आहे. छोट्या माणसांच्या संघटनाशक्तीला साथ देण्यात, त्यांच्या कामांची गुंफण करण्यात, अडल्या वेळी त्यांना हात देण्यात व त्यांची झालेली वाढ पाहण्यात जो आनंद आहे, तो आनंद अवर्णनीय आहे.'

आज कदाचित परिस्थिती त्या काळापेक्षा वेगळी असेल, परंतु आजच्या काळातही प्रगतीची पावले टाकावयाची असतील, तर त्या काळात घडलेल्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या व्यक्तींच्या जीवनांत काय घडले, हे समजावून घेतले पाहिजे. आज असंख्य नवीन कार्यकर्ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात धडपडणा-या मुलांप्रमाणे काम करीत आहेत. त्यांना मार्गदर्शक होईल, असे जीवनचरित्र त्यांच्या हाती पडण्याची गरज आहे.

श्री. विखे पाटील यांचे नाव आज सर्वसामान्य व सर्वपरिचित असे आहे. परंतु ते जेव्हा कुणाला माहिती नव्हते, तेव्हा त्यांनी ज्या गुणांच्या, विचारांच्या व स्वभावाच्या बळावर आपले व्यक्तिमत्त्व घडविले, ते गुण, विचार व स्वभाव यांची जोपासना करण्याची नित्यच गरज राहील, असे मला वाटते.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org