शब्दाचे सामर्थ्य १३३

तसे या घटनेचे स्वरूप नाही, असे माझे प्रांजल मत आहे. संघर्षाच्या राजकारणात काळ व परिस्थिती असे काही पेचप्रसंग निर्माण करतात, की क्वचित स्वतःच्या स्वभावामुळे, क्वचित धोरणासाठी, क्वचित स्वतःपेक्षा अधिक महत्त्वाच्या मानलेल्या ध्येयांच्या सिद्धीसाठी माणसे बाजूला राहतात आणि ती तशीच बाजूला राहतात. मधले अंतर कापून, उभा अडथळा ओलांडून प्रवाहाच्या मध्यावर पुन्हा येणे घडतच नाही. हा काळाचा आणि परिस्थितीचा बनाव असतो. प्रामुख्याने तो परिस्थितीचा बनाव होता. यामुळे नरूभाऊंच्या यत्‍नांची धार बोथट झाली नाही, की त्यांच्या साधनेत खंड पडला नाही.

आयुष्यात माणसे भेटतात, पांगतात, काहींची तर पुन्हा गाठभेटही होत नाही. पण काही पुनः पुन्हा भेटतात. त्यांच्याशी संबंध निर्माण होतात आणि ते संबंध शक्तिशाली बनतात. परस्परांच्या जीवनाचा सहारा बनतात. ते जीवन समृद्ध आणि संपन्न बनवतात. अशा नरूभाऊंच्या व माझ्या संबंधांचे ओझरते दर्शन घडविण्याचा माझा हा यत्‍न आहे. माणसामाणसांतले संबंध नाजूक असतात. ते शब्दांनी वर्णून सांगायचे समर्थ यत्‍नही पुष्कळदा मागे असमाधान ठेवून जातात. तरीही प्रसंगानुरूप माणसांना माणसांबद्दल बोलावे लागते, लिहावे लागते. हे अवघड असते, पण म्हणून ते टाळावे, हे काही खरे नाही. मिळालेली भावव्यक्तीची संधी आपल्याला नीट वापरता आली, तर समाधान वाटते. त्यांच्याबद्दल आपण बोलतो, त्यांनाही त्यातल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला, तर बरे वाटत असावे, असा अंदाज मी माझ्या अनुभवावरून बांधतो.

नरूभाऊंच्याबद्दल म्हणून लिहिण्याचा जो मी यत्‍न केला, त्यातून मीच जास्त आविष्कृत झालो, असे मला आता वाटू लागले आहे. पण आमची मने इतकी जुळली-मिळली आहेत, त्यांत असा संवाद निर्माण झाला आहे, की एकाचे दर्शन घडविताना दुस-याचे दर्शन घडणे अपरिहार्य आहे. हा मनांच्या संगमाचा प्रभाव आहे. मला असे घडल्याबद्दल संकोच वाटत नाही, हाही आमच्या मैत्रीचा विशेष आहे. माझ्या जीवनातल्या यशाला माझ्या इतर सहकारी मित्रांप्रमाणे नरूभाऊंचाही हातभार लागला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही नरूभाऊंनी मूल्ये जतन केली, त्यांसाठी ते झुंजारपणे लढले. या झुंजार वीराच्या जीवनापासून इष्ट व आवश्यक गोष्टीसाठी जिद्दीने झिजण्याची ताकद आम्हां मंडळींना, आपणां सर्वांना मिळत जाईल, असे मला वाटते.

ह्या शुभप्रसंगी नरूभाऊंना त्यांच्या आवडत्या जनताजनार्दनाची सेवा करण्यासाठी, राजशक्तींनी नीट राबवून घेण्यासाठी, लोकशक्तीचे संवर्धन करण्यासाठी दीर्घायुरारोग्य, विपुल साधने व संधी लाभोत, अशी इच्छा मी व्यक्त करतो.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org