शब्दाचे सामर्थ्य १३१

४३

नरूभाऊ लिमये

सामान्यतः मी कमी बोलतो, असा प्रवाद आहे. त्यात काही सत्यांशही आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास होऊ लागला, माणसे राखण्यापेक्षा दुरावली जातील, असे वाटू लागले, कार्यसिद्धीऐवजी कार्यनाश होईल, अशी शंका येऊ लागली, की शब्दांवरचा माझा विश्वास फार फार कमी होतो. माझ्या कमी बोलण्या-लिहिण्याचे हे एक कारण असू शकेल. पण आज नरूभाऊ लिमये ह्यांच्याबद्दल लिहायला बसलो आहे. तेव्हा माझ्या लेखणीच्या वाटेत नेहमीचे ते अडथळे मुळीच नाहीत. नरूभाऊंचे व माझे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. त्यांची-माझी मैत्री मोलाची आहे. क्वचित मतभेद झाले, पण माणूस म्हणून असलेले आमचे संबंध गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ राहिले आहेत. तेव्हा शक्य तेवढ्या मोकळेपणाने मला आज नरूभाऊंबद्दल लिहायला काही हरकत जाणवत नाही.

मी मागे वळून पाहू लागलो, की बत्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या वृद्धिंगत होत असलेल्या नरूभाऊंच्या व माझ्या संबंधांबद्दल मला समाधान वाटते. लांबलचक मैत्रीचा हा काळ सुखदुःखांच्या अनेक आठवणींनी मन भरून यावे, असा आहे. नरूभाऊ व मी तसे निराळ्या वातावरणांत वाढलोत. त्यांची व माझी पार्श्वभूमी निराळी. ते शहरात वाढले. सातारा-पुणे या शहरांच्या वातावरणात त्यांचा पिंड पोसला. मी वाढलो खेड्यात, एका गरीब कुटुंबात. तीस-चाळीस वर्षांपूर्वीचे शहर व खेडे यांतले अंतर आपण विचारात घ्या. पुष्कळदा मैत्रीला छंदांच्या क्षेत्रातून बाळसे येते. पण वयाच्या सतरा-अठरा वर्षांच्या सुमारास माझ्या जीवनातून तालीम, आखाडा, खेळणे, पोहणे निघून गेले. आम्ही माणसे लवकर कामाला लागलो. जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांच्या बैठकी होत, चर्चा होत, मला चांगले आठवते, की सातारा जिल्हा काँग्रेसच्या अशाच एका बैठकीच्या वेळी झालेल्या चर्चेत नरूभाऊंची आणि माझी चकमक उडाली. आम्ही एकमेकांवर भडकलो. पण त्याच वेळी माझ्या ध्यानात आले, की ह्या माणसात तल्लख बुद्धी, तळमळ, संघटना-चातुर्य आणि जिद्द आहे. आणखी एक गोष्ट ध्यानात आली, ती ही, की तात्त्विक मतभेदांच्या गदारोळात स्नेहाचे निर्मळ झरे न ढवळले जाण्यासाठी, मैत्रीचे नाजूक बंध सुरक्षित राखण्यासाठी आवश्यक तो हळुवारपणाही ह्या माणसात आहे. साहजिकच मी त्यांच्याकडे अधिकाधिक आकर्षिलो गेलो. मैत्री एकांगी, एकेरी, एकतर्फी असू शकत नाही. नरूभाऊंनीही माझ्यात काही तरी पाहिले असणार, पण मी त्याबद्दल काय आणि कसे बोलणार ? मी फक्त बाजू तुमच्यासमोर खुली करण्याच्या प्रयत्‍नात आहे. मला एवढेच आपल्या निदर्शनास आणून द्यायचे आहे की, ह्या मैत्रीला नरूभाऊंचीही बाजू आहे.

मी मागे एकदा लिहिले होते, 'दक्षिण साता-यामध्ये आणि उत्तर साता-यात गावोगाव पसरलेले जे माझे साथी आणि सहकारी आहेत, त्यांच्याशी कधी मी झगडलो, कधी भांडलो, कधी प्रेमाने वागलो, सगळे काही केले, पण त्यांनी मला नेहमी प्रेम दिलेले आहे. त्यांच्या प्रेमातून माझी शक्ती वाढलेली आहे.' जिल्हा पातळीवर अशा त-हेने वावरत असताना जे माझे संबंध जडले, त्यांत नरूभाऊंच्या मैत्रीचा क्रमांक खूप वरचा आहे. त्यांनी व मी खिशात पैसे नसताना लाखांची नाही, तरी हजारो रूपयांची स्वप्ने साकार करण्याची स्वप्ने एकत्र बसून पाहिली आहेत. काँग्रेसच्या कार्यक्रमांचा, धोरणाचा, कल्पनांचा प्रसार झाला पाहिजे, ह्याचा ध्यास नरूभाऊंनी घेतला, हे लोकांना कळले पाहिजे, हा त्यांचा मंत्र. वाणी-लेखणी राबवताना, कृती करताना ह्याच एका मंत्राचा आविष्कार त्यांनी चालू ठेवला. साता-याच्या 'समर्थ' मध्ये सेवा ह्याच भावनेने केली. खिशात पैसा नसताना, दारिद्र्याचे चटके सहन करीत, कर्जाचे डोंगर डोक्यावर घेऊन 'प्रकाश' चालविले. हालअपेष्टांना सीमा नव्हती; पण त्यांची तमा नरूभाऊंनी बाळगली नाही. काँग्रेसचे किंवा काँग्रेसवादी दैनिक असावे, हा नरूभाऊंचा अट्टहास. 'अट्टहास' हा शब्द मी मुद्दाम वापरीत आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org