शब्दाचे सामर्थ्य १३

तिने मला एका वाक्यात सांगितले,
‘कृष्णदेव अर्जुनाला सांगतात की, तू आपला ‘मी’ पणा सोड आणि जे तुझे काम तू केले पाहिजेस, ते तू करीत राहा. असे सगळे ते सांगत आहेत आणि ते बरोबर आहे.’

गीतेचा इतका सरळ, सोपा आणि साधा आशय मी दुस-या कुण्या पंडिताकडून ऐकलेला नाही.

तिची समज चांगली होती. मन धैर्यशील आणि उदार होते. आमची खरी शाळा आमची आई होती.
एकदा मी, आमची आजी आणि आई अशी तिघे मिळून पंढरपूरला गेलो. कराडपासून पंढरपूर जवळजवळ ऐंशी मैल आहे. आमच्या कराडच्या मारूतीबुवांच्या मंदिरातून आषाढी-कार्तिकीला पालखी जाते आणि बरोबर चार-दोन बैलगाड्या जातात. मी, आजी, आई एका गाडीतून इतरांबरोबर निघालो. अट अशी होती की, आम्ही तिघांनी एकाच वेळी गाडीत बसायचे नाही. कुणीतरी एकाने चालले पाहिजे, म्हणजे गाडीत बसणार्‍या सगळ्यांची सोय होईल. त्याप्रमाणे मजल-दरमजल करीत आमचा प्रवास सुरू झाला होता. माझ्या आजीचे वय तेव्हा साठीच्या पुढे होते. त्यामुळे तिला आम्ही गाडीत बसण्याचा आग्रह करीत असू. परंतु तिची प्रकृती काटक होती, ती म्हणे,‘मला काय झाले आहे?’आणि तीही आपला चालण्यामधला हिस्सा उचलत असे.

एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगेमध्ये आम्ही सर्व उभे राहिलो. किती तास उभे राहिलो, लक्षात नाही; पण चार तासांपेक्षा जास्त वेळ उभे होतो, असा अंदाज आहे. शेवटी आम्ही एकदाचे कसेबसे मंदिरात पोहोचलो. गंध, अक्षता, फुले, कापूर, ऊद, धूप, इत्यादी पूजा-साहित्याच्या संमिश्रणातून निर्माण झालेला, आपल्याकडील सगळ्याच देवळांत असतो, तसा वास सर्वत्र दरवळत होता. टाळमृदंगांच्या-साथीने विठ्ठलनामाचा गजरही दुमदुमत होता.

गर्दीमुळे मी घामाघूम झालो होतो.
कोणीतरी सांगितले, की हा गरुडखांब आहे.
मी जाऊन त्याला हात लावला.
कोणीतरी ओरडले,
‘हात लावायचा नाही.’आणि नंतर त्यानेच माझ्या आईला सांगितले,‘बाई, तुमच्या मुलाला सांभाळा.’

शेवटी विठ्ठलाच्या मूर्तीपर्यंत कसबसे पोहोचलो.

तेथे बसलेले पुजारी-बडवे एक क्षणही देखील कोणाला थांबू देत नव्हते, पुढे ढकलत होते.

माझी उंची त्या वेळी स्वाभाविकच कमी होती. पायांवर डोके ठेवण्याइतका मी उंच नव्हतो.

कोणी एक पुजारी माझ्या आईवर खेकसला,
‘चला लौकर येथून!’

पण आईने त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मला उचलून विठ्ठलाच्या पायांवर घातले आणि मग आम्ही तेथून परतलो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org