शब्दाचे सामर्थ्य १२३

ग्रामीण अर्थकारण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातील अनेक समस्यांचा विचार व त्यांवर उपाययोजना त्यांनी वेळोवेळी केली. ग्रामीण पतपुरवठा, लहान उद्योगधंदे, सहकारी अर्थव्यवस्था, पाटबंधा-याचे प्रश्न या सर्व विषयांवर त्यांनी केलेल्या सूचना वेळोवेळी सरकारी धोरणात समाविष्ट झाल्या. ग्रामदानाच्या कल्पनेतही त्यांनी असाच सखोल अर्थ पाहिला आणि त्याचा पुरस्कार केला. लहान शेतक-यांचा प्रश्न, भूमिहीन मजुरांची समस्या यासंबंधीही त्यांची भूमिका अतिशय जिव्हाळ्याची व सहानुभूतीची होती.

गाडगीळांच्या अर्थकारणाचा संकलित व समग्र विचार कोणत्याही सरकारला अपरिहार्य ठरेल. गाडगीळांची नियोजनाविषयीची मते १९५० पासून त्यांनी सातत्याने, कठोरपणे व निर्भीडपणे मांडली. त्यामागेही त्यांची भारताच्या ग्रामीण अर्थकारणासंबंधीची भूमिका हीच प्रभावी होती. किंबहुना गाडगीळांनी जिल्हा हा घटक मानून नियोजन केले पाहिजे, हा विचार अत्यंत प्रभावीपणे दिल्लीला आल्यावरही मांडला व त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्‍न केला. वर्धा जिल्हा योजना हे त्यांच्या जिल्हा नियोजनाच्या कल्पनेचे मूर्त रूप होते. अखिल भारतीय आर्थिक समस्यांची त्यांची उकलही केवळ सैद्धान्तिक नसे. प्रत्यक्ष व्यवहाराच्या मर्यादा, आपली सामाजिक, राजकीय स्थिती यांचा समग्र विचार करून नियोजन मंडळांचे मार्गदर्शन त्यांनी केले. त्यामुळे अत्यंत कठीण काळात भारतीय नियोजनाला त्यांची मदत झाली.

हे सर्व आकड्यांचे अर्थकारण करीत असताना डॉ. गाडगीळांना बदलत्या सामाजिक व राजकीय प्रवाहांचे भान असे. त्यांचे सामाजिक प्रक्रियांकडे, दैनंदिन जीवनात घडणार्‍या क्रांतीकडे लक्ष असे. त्यामुळे गाडगीळ हे कधीही स्थितिशील झाले नाहीत. लोकशाहीवर ठाम निष्ठा, गरिबांच्या प्रश्नांची कणव आणि लोकहिताची साक्षेपी जपणूक करण्याचे त्यांचे धोरण या गाडगीळांच्या जीवनकार्याच्या मूलभूत निष्ठा मानता येतील.

या सर्व निष्ठांमुळेच गाडगीळांचे जीवन व्रतस्थ झाले. त्यामुळे कडक आचरण व स्वनियमन आले. म्हणूनच लौकिक अर्थाने प्रसिद्धिच्या प्रकाशात न वावरता गोखले अर्थसंशोधन संस्थेचे काम सतत छत्तीस वर्षे एकाग्रतेने त्यांनी केले.

सहकारी चळवळीप्रमाणेच गाडगीळांचे शैक्षणिक कार्य व त्यांचे संयुक्त महाराष्ट्राचे वेळी झालेले अमोल साहाय्य महत्त्वाचे आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचे गाडगीळ कार्याध्यक्ष झाले आणि आपल्या नेहमीच्या निष्ठेने, शिस्तीने व पद्धतशीरपणे त्यांनी ते काम केले. शिक्षण-प्रसाराच्या क्षेत्रात गाडगीळांची ही कामगिरी मोलाची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला जी तात्त्विक व शास्त्रशुद्ध बैठक गाडगीळांनी दिली, ती फार मोलाची म्हणावी लागेल. ज्या वेळी भाषिक प्रश्नात लक्ष घालण्यास उच्च कोटीचे विद्वान तयार नव्हते, त्या वेळी गाडगीळांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपले विचार मांडले. किंबहुना गाडगीळांची भारतीय संघराज्याविषयीची संकल्पना स्पष्ट असल्याने त्यांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिला.

डॉ. गाडगीळ यांचे महाराष्ट्राच्या व भारताच्या राष्ट्रीय जीवनातील स्थान स्वयंनिर्मित होते. त्यांचे कार्य अनेक विचारवंतांना व कार्यकर्त्यांना स्फूर्ती देत राहील, यांत शंका नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org