शब्दाचे सामर्थ्य १२०

३९

कृ. भा. ऊर्फ अण्णासाहेब बाबर

कै. कृ. भा. ऊर्फ अण्णासाहेब बाबर ही महाराष्ट्रातील, ज्यांनी शिक्षण व सार्वजनिक क्षेत्र, तसेच, सार्वजनिक जीवनाला आपले म्हणून काही देऊ केले, अशा बोटांवर मोजण्याइतक्या थोड्या लोकांपैकी एक व्यक्ती आहेत. त्यांच्या जीवनासंबंधी हा लेख लिहिताना मला माझ्या लहानपणची आठवण येते.

मी मराठी शाळेत शिकत असताना आमच्या सातारा जिल्ह्यात एक नवी चळवळ सुरू होती. शिक्षणाचा प्रसार व्हावा, गोरगरिबांच्या मुलांनी खूप शिकावे, काही महत्त्वाकांक्षा धरून काम करीत राहावे, असे एक वातावरण बहुजन समाजात पसरविण्याचे कार्य काही प्रमुख शिक्षक मंडळी करीत होती. त्या वेळच्या सातारा जिल्ह्यात (म्हणजे आजचा सातारा-सांगली जिल्हा) जे जे क्रियाशील शिक्षक होते, त्यांत अग्रेसर कै. अण्णासाहेब बाबर होते. त्यांना सर्व शिक्षक-वर्गात अतिशय आदराने वागविले जात असे. आम्ही ज्या मराठी शाळेत शिक्षण घेत होतो, तिथे त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी गुरुजी बाबरांचे विद्यार्थ्यांना समजेल, अशा सोप्या भाषेत सुरेख भाषण ऐकल्याचे मला आजही स्मरते.

त्यांनी शिक्षकांची एक जागृत संघटना उभी केली. त्यांनी हे काम भाषण करून, लेख लिहून सुरू केले आणि त्यामुळे लेखनाचे व भाषणाचे काम त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत चालू होते. ती त्यांची एक महत्त्वाची सवय झाली होती. सातारा जिल्ह्यात सर्वत्र माहिती असलेली ती दहा-पाच नावे होती, त्यांत कै. कृ. भा. बाबर हे नाव प्रमुख होते.

एक उत्तम शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक मिळविला होता. परंतु बहुजन समाजाचे आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या कामांतही त्यांनी मार्गदर्शन केले होते. तरुण मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करणे, शिकलेल्यांना नोकरी मिळवून देण्याकरिता साहाय्य करणे, नवीन काय काय वाचावे, याची माहिती आग्रहपूर्वक मुलांना पुरविणे, आपले आचार-विचार कसे संस्कृतिसंपन्न असले पाहिजेत, हे शिक्षकांना पटवून त्यांच्या मार्फत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. मला आठवते, त्यांनी शिक्षक असताना 'विद्यार्थी सीताराम' ही छोटीशी पुस्तिका लिहून प्रकाशित केली होती. श्री. सी. रा. तावडे यांचे ते चरित्र होते. श्री. सीताराम तावडे यांनी गरिबीची परिस्थिती असतानाही परिश्रमपूर्वक अभ्यास करून विद्वत्ता संपादन केली व उच्च पदाच्या नोकरीपर्यंत ते पोहोचले. याची त्यांनी सोप्या व मनोरंजक भाषेत ओळख करून दिली होती. त्यांनी लहान मुलांमध्ये एक महत्त्वाकांक्षा निर्माण केली, याचा साक्षीदार मी आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वामुळे एक उत्तम शिक्षक व सामाजिक नेता ही त्यांची भूमिका तयार झाली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org