शब्दाचे सामर्थ्य ११९

विद्वत्तेमुळे कधी कधी येणारा एकांगीपणा शास्त्रीजींच्यामध्ये कधीच दिसला नाही; त्याचे कारण त्यांची बौद्धिक निष्ठा वैचारिक प्रामाणिकपणावर अवलंबून आहे. जे विचाराने स्वीकारले, ते पडेल ती किंमत देऊन त्यांनी आचरिले आहे. आपल्या विचारश्रद्धेसाठी त्यांनी अनंत कष्ट सोसले आहेत. १९३०-३२ च्या आंदोलनात भोगलेला कारागृहवास, रॉयवादाचा अत्यंत कठीण काळात पुरस्कार करताना सहन करावी लागलेली अप्रियता त्यांनी आनंदाने सहन केली आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या वैचारिक क्रांतिकार्याची महनीयता महाराष्ट्राच्या बुध्दिमंतांना मानावयास लावण्यात त्यांचा महत्त्वाचा पुढाकार होता. ते आपल्या विचारांतील भिन्नता व्यक्त करतात; परंतु त्यात कटुता कधीच नसते.

गेली वीस वर्षे त्यांनी साहित्य संस्कृति मंडळाचे अध्यक्ष व विश्वकोश कार्याचे प्रमुख संपादक म्हणून जे कार्य केले आहे, ते मराठी भाषेच्या विकासाच्या इतिहासातील एक प्रमुख कार्य म्हणून गणले जाईल. विश्वकोश व साहित्य - संस्कृति मंडळाचे कार्य सुरू करावे, असा निर्णय मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने घेतला. त्या वेळी हे काम कोणावर सोपवावे, असा प्रश्नच माझ्यापुढे उभा राहिला नाही. कारण तेव्हा तर्कतीर्थांसारखी सुयोग्य व्यक्ती माझ्या नजरेपुढे उभी होती. आणि वीस वर्षांनंतर मी मागे वळून पाहतो, तेव्हा ती एक अतिशय उचित अशीच गोष्ट झाली; असे मला नेहमी वाटते. त्यांचे धर्मकोशाचे कार्य तर सर्व भारतीय विद्वानांना विदित आहे.

तर्कतीर्थ एक उत्तम गृहस्थी आहेत. तसेच प्रेमळ मित्रही आहेत. त्यांच्या घरी अनेक वेळा जाण्याचा मला प्रसंग आला आहे. त्यांच्या कै. पत्‍नी हयात असताना त्यांच्या संसारातील आतिथ्यशील पाहुणचार मी अनेकदा घेतला आहे. ते गृहस्थी असले, तरी त्यांचे मन खालच्या पातळीवर कधीच नसते. ते नेहमीच तत्त्वचिंतनात गर्क असलेले दिसतात.

शास्त्रीजींशी झालेले संभाषण म्हणजे एक बौद्धिक मेजवानीच असते. म्हणून अशी संधी वारंवार उपलब्ध करण्याचा प्रयत्‍न करतो. माझ्या या सवयीमुळे काही मंडळी ते माझे गुरू व मी त्यांचा शिष्य, असे सुचविण्याचा प्रयत्‍न करीत असतात. परंतु त्यांचे माझे गुरूशिष्याचे नाते नाही; तर ते आहे एक थोर विद्वानाच्या चाहत्याचे व जिव्हाळ्याच्या स्नेहाचे.

महाराष्ट्राला आज अभिमान व आनंद आहे, की तर्कतीर्थांच्या कर्तृत्वाचा विद्वान आमच्यांत अजून क्रियाशील आहे. आज आपल्या प्रिय पत्‍नीच्या निधनानंतर ते थोडेसे एकाकी वाटतात; परंतु त्यांनी आपले मन कामात व्यग्र ठेवले आहे आणि एका अर्थाने आपल्या गुरूदेवांसारखेच जीवन ते व्यतीत करीत आहेत, असे वाटते. मी स्वतःला एका अर्थाने भाग्यशाली समजतो, की अशी तोलामोलाची विचारवंत व्यक्ती सहकारी व मित्र म्हणून मला लाभली, या मैत्रीबद्दल मी कृतज्ञ आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org