शब्दाचे सामर्थ्य १०८

३१

रत्‍नाप्पाअण्णा कुंभार

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध नेते श्री. रत्‍नाप्पाअण्णा कुंभार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार-समारंभ होत आहे, ही मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचे सर्व आयुष्य प्रजा परिषदेच्या चळवळीत आणि विविध विधायक कार्य करण्यात खर्च झाले आहे.

स्वातंत्र-लढ्याच्या वेळी मी कोल्हापुरात विद्यार्थी म्हणून राहत होतो. त्या वेळी प्रजा परिषदेने चालविलेली चळवळ अधिक संघटितरीतीने बांधण्याचे काम तिची नेते मंडळी करीत होती. त्यामुळे मला त्यांत प्रमुखपणे काम करणा-या माणसांची माहिती होती. अर्थात यांत प्रामुख्याने माझ्या दृष्टीने श्री. माधवराव बागल, रत्‍नाप्पाअण्णा कुंभार, वीर माने ही मंडळी होती. परंतु या सर्वांमध्ये जिद्दीने बसून संघटना बांधण्याचे काम रत्‍नाप्पाअण्णांनी विशेष प्रकारे केले, हे स्पष्ट आहे. त्या काळात त्यांना मी एक-दोन वेळा भेटल्याचे मला आठवते. आलेल्या मंडळींशी शांतपणे बोलून त्यांना मार्गदर्शन करणे, वेळोवेळी परिपत्रके काढणे ही संघटनेतील महत्त्वाची कामे आहेत. श्री. रत्‍नाप्पाअण्णांनी ही कामे फार कष्टाने व कुशलतेने केली. त्यामुळे श्री.माधवराव बागल यांच्यानंतर कोल्हापूर प्रजा परिषदेमध्ये रत्‍नाप्पांचे नाव डोळ्यांपुढे येत असे.

श्री. माधवराव बागल यांची राजकीय उंची फार मोठी होती. स्वाभाविकपणे ते कोल्हापूरबाहेरही माहीत होते. उत्तम वक्ते व लेखक म्हणूनही त्यांचे नाव होते. प्रजा परिषदेच्या संघटनेच्या क्षेत्रात रत्‍नाप्पांचे विशेष असे मानाचे स्थान होते व त्या  दृष्टीने महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी त्यांचे संबंध वाढत होते. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून रत्‍नाप्पाअण्णांनी केलेले काम सुप्रसिद्ध आहे. त्याच्या तपशिलात मी जाण्याचे कारण नाही.

भूमिगत लढा संपल्यानंतर बराच काळ ते भूमिगतच राहिले व त्यानंतर त्यांनी अतिशय नाट्यमय पद्धतीने पुन्हा उघड राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी स्वतःला विधायक कार्यांत गुंतवून घेतले. विशेषतः, त्यांनी पंचगंगा सहकारी साखर कारखाना संघटित केला. त्याचा सर्व तपशील मला माहीत आहे. मला आठवते, की त्या कारखान्याच्या तयारीसाठी ते जेव्हा मुंबईत येत, तो काळ साधारणतः १९५५-५६ चा होता. त्या काळात ते व त्यांचे मित्र व श्री. तात्यासाहेब कोरे व त्यांचे मित्र हे दोन्ही गट दोन साखर कारखान्यांकरिता प्रयत्‍न करीत होते. मुंबईत त्यांचा मुक्काम मी राहत असलेल्या चित्रकूट बंगल्यावर असलेल्या जागेत असे, याची मला आठवण आहे. श्री. तात्यासाहेब कोरे यांचे व माझे जुने संबंध होते. या निमित्ताने श्री.रत्‍नाप्पाअण्णांशी पण जिव्हाळ्याचे व निकटचे संबंध आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org