शब्दाचे सामर्थ्य १०४

संयुक्त महाराष्ट्र मिळावा, याबाबत दोघांचे एकमत होते, मार्ग भिन्न होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंध ठेवण्याची मला कसलीच अडचण वाटत नव्हती. मी काही प्रसंगी त्यांना मुद्दाम बोलावून त्यांच्याशी चर्चा केली व त्या चर्चेचा मला उपयोगही झाला, असा माझा अनुभएव आहे. एस्. एम्. हातचे राखून बोलत नाहीत. जे मनात असेल, ते सरळ व स्पष्ट सांगून टाकतात. त्यामुळे त्यांच्याशी झालेले संभाषण प्रसंगी हितकारकच ठरले आहे. पुढे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या कालखंडात मी अनेक खासगी गोष्टीही त्यांच्याशी बोलू शकलो आज त्यांना त्याची आठवण आहे, की नाही, मला माहीत नाही.

आम्ही एकमेकांविरुद्ध भाषणे केली, विचारांवर टीका केल्या, पण हे सर्व चळवळीच्या संदर्भात होते. सभागृहात एकमेकांविरुद्ध बोललो आहोत. परंतु ज्या वेळी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्या १ मे १९६० रोजी जीपमध्ये शेजारी उभे राहून गिरणगाव, लालबाग भागांत दुतर्फा उभ्या असलेल्या सहस्त्र लोकांचे अभिनंदन आम्ही एकत्र स्वीकारले आहे. ती एक मजेदार आठवण आजही लक्षात आहे.

महाराष्ट्रात समाजवादी विचारांचा स्वीकार काँग्रेस चळवळीत ज्यांनी केला, त्या पिढीतील एस्. एम्. आहेत. त्यांनी राष्ट्र सेवा दल संघटित केले व समाजवादाचे संस्कार घडविले, अशी अनेक माणसे आज भेटतात, तेव्हा अनेक उबदार आठवणी सांगतात. विशेषतः, 'अण्णांबद्दल' - म्हणजे एस्. एम्. बद्दल ते ज्या कृतज्ञतेने व आदराच्या भावनेने बोलतात, ते पाहिले, म्हणजे असे वाटते की, एस्. एम्. च्या जीवनाचे सार्थक झाले. महाराष्ट्रात समाजवादी विचारांना प्रतिष्ठा आली. पण समाजवादी संघटना मूळ धरू शकल्या नाहीत, अशी आजची परिस्थिती आहे. कामगार-चळवळीतील संधीसाधू नेतृत्वाची पद्धती पाहिली, म्हणजे कधी निराशा वाटते. शेतमजूर, कामगार व तरुण यांमध्ये समाजवादी निष्ठा म्हणजे निव्वळ विचारातील निष्ठा नव्हे, तर प्रत्यक्षात समाजपरिवर्तनात त्याचा शेवट झाला पाहिजे, अशा निश्चयाच्या संघटना करणे याची जाणीव समाजवाद बोलणा-या मंडळींना असणे आवश्यक आहे. परंतु हे आज घडत नाही. हा कुणाचा दोष आहे, याची आज चर्चा करणे अवघड आहे.

एस्. एम्. नी जसे मुंबई असेंब्लीत काम केले, तसेच, लोकसभेतही काम केले आहे. लोकसभेच्या कामात ते अधूनमधून भाग घेत असत; परंतु त्यात त्यांनी फारसा रस घेतला, असे मला दिसले नाही. त्यांनी निवडणुका कधी जिंकल्या, कधी हरल्या, पण या यशापयशाच्या कल्पनेच्या पलीकडे ते गेले आहेत, असे मी पाहिले आहे. एस्. एम्. च्या जीवनात त्यांची साथ करणा-या त्यांच्या पत्‍नी सौ. ताराबाई यांना त्यांच्या जीवनातील यशाचे मोठे श्रेय दिले पाहिजे. आज एस्. एम्. एक्याऐंशी वर्षांचे झाले आहेत. प्रार्थना करू या, की ते जास्तीत जास्त जीवन यशस्वी रीतीने जगतील आणि महाराष्ट्राच्या व देशाच्या सामाजिक जीवनातील कर्तृत्ववान माणूस म्हणून प्रकाशत राहतील.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org