शब्दाचे सामर्थ्य १०३

२८

एस्. एम्. जोशी

श्री. एस्. एम्. जोशी एक्याऐंशी वर्षांचे झाले, असे जेव्हा मला श्री. मधु दंडवते यांनी लिहिले, तेव्हा मला सानंद आश्चर्य वाटले. आनंद अशासाठी, की एक्याऐंशी वर्षांचे होऊनसुद्धा एस्. एम्. कृतिशील आहेत; आणि आश्चर्य यासाठी, की गेली कित्येक वर्षे मी एस्. एम. ना पाहतो आहे, त्यात काही फरक नाही. म्हणून ते एक्याऐंशी वर्षांपर्यंत पोहोचले, याची कल्पनाही माझ्या मनात आली नाही.

एस्. एम्. यांच्या व्यक्तित्वाचा पहिला परिचय मला झाला, तो १९३२ साली, तुरुंगामध्ये. जेव्हा जेलमध्ये मी त्यांना काम करताना, बोलताना पाहिले, तेव्हा माझ्या मनात जो ग्रह झाला, की हे एक स्फटिकासारखे स्वच्छ व्यक्तिमत्त्व आहे. तोच ग्रह आजही माझ्या मनात कायम आहे.

गेल्या पन्नास वर्षांत एस्. एम्. नी अनेक चळवळींत भाग घेतला आहे. राजकारणाच्या दिशा त्यांनी अधूनमधून बदलल्या. सुरुवातीला ते काँग्रेस सोशालिस्ट झाले. त्यानंतर ते प्रजा सोशालिस्ट झाले आणि नंतर ते जनता पक्षात गेले. त्यांच्या पक्षांची नावे कितीतरी बदललेली असली, तरी एस्. एम्. जे एस्. एम्. होते, तेच आज आहेत. सर्व राजकीय प्रवासात एस्. एम्. चे व्यक्तिमत्त्व कायम राहिले. ते अनुभवाने मोठे झाले असतील व आता वयानेही मोठे झाले आहेत. पण विचाराने ते पहिले मोठे होते, तसे ते आजही आहेत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात फार थोडी माणसे अशी आहेत, की ज्यांच्याबद्दल कोणत्याही परिस्थितीत आदर वाटावा. एस्. एम्. यांमध्ये अग्रगण्य आहेत.

एस्. एम्. चा माझा प्रत्यक्ष विरोधाचा संबंध आला, तेव्हा ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नेतृत्व करीत होते. महाराष्ट्रात त्याच वेळी झालेल्या निवडणुकीत आम्ही उभयता विधानसभेत निवडून गेलो आणि मी द्वैभाषिक मुंबई राज्याचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा एस्. एम्. विरोधी पक्षाचे नेते झाले. ते संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे एका वर्षाकरिता नेता निवडले गेले होते. समितीने दरवर्षी वेगळा वेगळा नेता विधानसभेत निवडावा, अशी पद्धत सुरू केली होती.

परंतु एस्. एम्. जेव्हा नेते होते, तेव्हा चळवळ अत्यंत तीव्र झालेली होती व काही प्रमाणात तीमध्ये कटुता आली होती. माझ्या आठवणीप्रमाणे सभागृहाबाहेरील तीव्रता व कटुता या दोन्ही सभागृहात न आणता त्यांनी केवळ तीव्रता आणली व कटुता बाहेरच ठेवली. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल मूलतःच असलेला आदर अधिकच वाढला आणि पुढे ते जेव्हा विरोधी पक्षाचे नेते राहिले नाहीत, तेव्हा माझ्यासाठी तेच विरोधी पक्षाचे नेते आहेत, असे समजून चाललो होतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org