शब्दाचे सामर्थ्य १०२

२७

नाना पाटील

मी काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यात गेलो होतो. तेव्हा वाळवे येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची व माझी गाठभेट झाली. त्या वेळी, त्यांच्या चेह-यावरील प्रसन्नता व तेजस्विता पाहून मी प्रभावित झालो. आज त्यांचे शरीर दुर्बल झाले असले, तरी त्यांचे मन पूर्वीसारखे उत्साही दिसून आले.

वाळवे तालुक्यातील येडे-मच्छिंद्र या गावी त्यांचा ३ ऑगस्ट, १९०० रोजी जन्म झाला. सार्वजनिक कामाच्या ओढीमुळे त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. १९३० सालच्या असहकार चळवळीत, दांडीच्या मीठ - सत्याग्रहात, तसेच, बिळाशीच्या जंगल-सत्याग्रहात त्यांनी पुढाकार घेतला. पुढे त्यांना याबद्दल कारावासही भोगावा लागला. १९४२ चा लढा म्हणजे स्वातंत्र्य-लढ्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान ! नानांनी हा लढाही गाजवून सोडला. चव्वेचाळीस महिने त्यांनी भूमिगत राहून ब्रिटिश सरकारला नामोहरम केले व भूमिगत चळवळ प्रभावीपणे चालविली. त्या वेळी, त्यांना ग्रामीण जनतेनेच अधिकतर सांभाळून घेतले. कारण ते दुर्बलांचे वाली आहेत. गरिबांबद्दलचा जिव्हाळा, त्यांच्या उत्कर्षासंबंधी तळमळ यांसाठी त्यांनी चळवळ सुरू केली होती. १९४२ च्या लढ्याच्या क्रांतीमागची त्यांची प्रेरणा दुर्बल लोकांच्या मुक्तीचीच होती. नुसते भारताला स्वातंत्र्य मिळावे, म्हणून ते भारले गेले नव्हते, तर त्यांना सामाजिक पुनरुत्थानाची निकड जाणवत होती आणि यासाठी ते प्रयत्‍नशील होते आणि आजही आहेत. राजकारणात पडण्याअगोदर ते सत्यशोधक होते. लग्नासाठी खर्च कमी व्हावा, म्हणून त्यांनी एक सामाजिक चळवळ सुरू केली होती.

१९४२ च्या लढ्यात केलेल्या उठावामुळे ते सातारा जिल्ह्यात अतिशय लोकप्रिय झाले. त्यांना पाहिले, की शेतक-यांपैकी लहानापासून ते थोरापर्यंत सर्व त्यांच्या नावाचा जयजयकार करीत. परंतु त्याच वेळी गरिबांची पिळवणूक करणा-या सावकारांचा मात्र थरकाप होत असे. या लढ्यातील कर्तृत्वामुळे त्यांचा महाराष्ट्रात दबदबा वाढला. त्यांच्या वक्तृत्वाची एक ढंगदार शैली आहे. ही शैली ग्रामीण जीवनातील जिव्हाळ्याच्या अनुभवांनी घडलेली आहे. जिव्हाळा, तळमळ, निर्भयता, स्पष्टवक्तेपणा, कुणाला न झोंबणारा पण विषय स्पष्ट करणारा विनोद, हे त्यांच्या वक्तृत्वाचे गुणविशेष ! कोणतीही सभा ते सहजासहजी जिंकतात.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनाचा अभ्यास, त्यांनी केलेल्या कार्याची ओळख आजच्या विद्यार्थी वर्गाला, तरुण पिढीला होणेआवश्यक आहे. आज स्वातंत्र्योत्तर काळातही नानांनी आपले जनसेवेचे व्रत अखंडपणे पुढे चालू ठेवले आहे. त्यांची जिद्द व मनाचा दमदारपणा या वयातही प्रकर्षाने जाणवतो, कर्तव्यपूर्तीचा आनंद हा एक जीवनातील महत्त्वाचा निकष मानला, तर नियतीने त्यांच्या पदरात यशाचे भरपूर माप टाकले आहे. कर्तव्यपूर्तीचा आनंद उपभोगण्यासाठी त्यांना परमेश्वर दीर्घायुरारोग्य देवो, हीच प्रार्थना !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org