शब्दाचे सामर्थ्य १

या ग्रंथातील प्रत्येक वाक्य, विचार व भाषशैली यशवंतराव चव्हाणांची आहे. त्याची रचना करताना यशवंतरावांची ओळख महाराष्ट्राच्या नवीन व पुढील पिढीला उपयुक्त स्वरूपात राहावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने यशवंतरावांच्या लिखाणाचे चार भाग केले आहेत. एक : संस्कार, दुसरा : व्यक्ती, तिसरा : विचारचौथा : चिंतन.

पहिल्या भागात यशवंतराव चव्हाणांवर झालेले संस्कार दिसून येतील. तसेच, त्यांची जडणघडण कशी झाली, याचा उलगडा होईल, अशी माझी अपेक्षा आहे. कारण मला परिचित यशवंतराव हे एक तेजस्वी हिरकणीप्रमाणे होते. हिरकणीची निर्मिती एका दगडापासून होते व दगडाची जडणघडण योग्य तर्‍हेने केल्यानंतरच तो दगड हिरकणी म्हणून आपल्यासमोर येतो. या सह्याद्रीच्या काळ्या दगडाची निर्मिती कशी झाली, हे पाहण्यासाठी मी काही वर्षांपूर्वी देवराष्ट्रे गावी गेलो. कराडपासून बावीस-तेवीस कि.मी. अंतरावरच्या सागरेश्वराच्या सान्निध्यात असलेल्या ह्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या आईंनी व आजीनं यशवंतरावांना व त्यांच्या भावां-बहिणीला वाढवले, शिक्षण दिले. या सह्याद्रीतील दगडाची खरी जडणघडण व संस्कार केले, ते त्यांच्या आईनेच. याचे वर्णन यशवंतरावांनी ‘ॠणानुबंधा’ मध्ये केले आहे. ‘संस्कारांचे सामर्थ्य’या लेखाची सुरुवात करतानाच त्यांनी म्हटले आहे की,‘सिंहावलोकन करीत कर्तृत्वाची वाटचाल करणारा मी एक संस्कारक्षम माणूस आहे.... मी माझ्या आईच्या अवतीभोवती वाढलो. साक्षात प्रेम, असे जिच्याकडे पाहून म्हणावे, अशी माझी आई आहे. तिची अन् शाळेची ओळख नसेलही, पण तिचे कर्तृत्व दांडगे आहे. खर्‍या अर्थाने ती सुमाता आहे. आईच्या प्रेमाने वाढविलेली, फार मोठी झालेली माणसे मी आजही जेव्हा पाहतो, तेव्हा मला माझी आई अधिक समजते. माझ्या कुटुंबात हीच खरी श्रीमंती आहे. श्रीमंतीने मला मनाचा राजा बनायला शिकविले.’या संस्कारांची छाप यशवंतरावांच्या सतेज चेहर्‍यावर, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सदैव दिसत असे.

त्यांच्या मनावर पुढील संस्कार कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये झाले. लोकमान्य टिळकांप्रमाणे यशवंतरावांच्या मनातही प्रखर ध्येयवाद, देशप्रेम, देशसेवा, स्वार्थत्याग व जिद्द या भावना पेरल्या गेल्या. त्याचबरोबर महात्मा फुले, तसेच, त्यांचे बंधू कै. गणपतराव यांचे सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्याच्या कार्यामुळे यशवंतरावांना एक नवीन दृष्टी मिळाली. एम्.एन्.रॉय यांच्याशी संबंध व त्यांची विचारसरणी यांमुळे कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक प्रश्नांचे सूक्ष्म दृष्टीने पृथक्करण करण्याची प्रवृत्ती त्यांच्या मनात जागृत झाली. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर राजकीय सत्तेमध्ये त्यांनी जेव्हा पदार्पण केले, तेव्हा आपली स्वतःची व आपल्या मनाची एक दृष्टी स्पष्ट होती. सामाजिक विषमता काय, लहान मोलमजुरांचे, शेतकर्‍यांचे प्रश्न काय; शिक्षणाअभावी व दारिद्र्यामुळे बहुजन समाजातील मुले व मुली समाजात कधी वर येऊ शकत नाहीत, हे यशवंतरावांनी देवराष्ट्रे व कराड येथे पाहिले होते. राजकीय जीवनाला सुरुवात व तुरुंगवास याचाही यशवंतरावांच्या संस्कारांत महत्त्वाचा वाटा आहे. १९३० सालात त्यांनी राजकारणात उडी घेतली व तुरुंगवासही भोगला. १९४० साली पुण्यातील येरवडा जेलमध्ये झालेल्या तुरुंगवासात त्यांना मौलिक बौद्धिक शिक्षण मिळाले. त्या शिक्षणाचे वर्णन ‘बरॅक नं. १२ : विद्वानांच्या सहवासात : शाकुंतल ते समाजवाद’ या लेखात सापडते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org