शब्दाचे सामर्थ्य ९८

या निवडणुकीच्या काळात मी कोल्हापूरला कॉलेजात विद्यार्थी होतो, परंतु प्रचारासाठी मी माझ्या जिल्ह्यात काकासाहेबांबरोबर एक-दोन दिवस फिरलो आहे. त्यांची भाषणे व चर्चा मी ऐकल्या होत्या. हे अनुभव एका अर्थाने नेतृत्वाचे राजकीय शिक्षण घेण्यासारखे होते. या निवडणुकीच्या वेळी, काकासाहेबांनी, निवडून गेल्यावर, पार्लमेंटची बैठक संपल्यानंतर पुन्हा हजर होईन, असे सांगितले होते. त्याप्रमाणे ते आमच्या जिल्ह्यात पुन्हा आले होते. त्याही वेळी मी त्यांच्याबरोबर एक दिवस व रात्र काढली. त्या वेळी झालेल्या गप्पा-गोष्टी मला अजूनही स्मरतात. पार्लमेंटच्या कामाचे त्यांनी सांगितलेले अनुभव व तिथल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची केलेली सुलभ मांडणी आजही आठवते. मी त्या वेळी काकासाहेबांना सुचविले होते, की दिल्लीत चाललेल्या या संसदीय कामाची माहिती घेण्याकरिता त्यांनी ग्रामीण भागातील काही मंडळींना निवडून दिल्लीत थोड्या दिवसांसाठी बोलवावे.

काकांना ही सूचना पसंत पडली होती व त्यांनी त्याच ठिकाणी दिल्लीला येण्याचे मला निमंत्रणही दिले होते. मात्र त्यांची एक अट होती. दिल्लीला तुम्हांला तुमच्या खर्चाने यावे लागेल. दिल्लीला आल्यावर तेथील व्यवस्था मी करीन. मी त्यांचे निमंत्रण स्वीकारले होते; परंतु दिल्लीला जाणे माझ्या हातून घडले नाही. त्या वेळी ते सहा वर्षे केंद्रीय विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे चिटणीस होते. माझी जाण्याची इच्छा होती. परंतु जाऊ शकलो नाही, ही गोष्ट खरी आहे. पुढे त्यांनी या सहा वर्षांतील दिल्लीतील संसदीय कामाच्या संबंधाने लिहिलेले नितांत वाचनीय पुस्तक जेव्हा मी वाचले, तेव्हापासून तर, आपण जाऊ शकलो नाही, याची खंत मनाला नेहमीच राहिली.

मी त्या वेळी जरी जाऊ शकलो नाही, तरी तो शब्द मी पुढे बारा वर्षांनी पुरा केला आणि काकासाहेब मध्यवर्ती मंत्रिमंडळाचे सदस्य असताना त्यांच्या घरी दोन दिवस राहून आलो. दिल्लीत त्या वेळी माझ्याप्रमाणेच लहान-मोठे पाहुणे त्यांच्या घरी होते. तिथे असलेल्या अनेक पाहुणे मंडळींत महर्षि अण्णासाहेब कर्वेही होते. लोकसंग्रहाची भाषा टिळकांच्या परंपरेतील माणसे बोलतात खूप, परंतु त्यासाठी काढाव्या लागणा-या खस्ता काकासाहेब आणि त्यांच्या पत्‍नी यांना प्रत्यक्ष काढताना मी पाहिले आहे. काकांचे घर तेव्हाचे 'महाराष्ट्र सदन' होते, असे म्हटले, तरी चालेल. काकासाहेबांना कार्यकर्त्यांसंबंधी खराखुरा जिव्हाळा होता, याचा मी अनुभव घेतला आहे.

काकासाहेब गाडगीळ हे पिंडाने मूलतः लोकशिक्षक होते. त्यांची वाणी आणि लेखणी या दोन्ही माध्यमांतून त्यांनी हे कार्य पहिल्यापासून अखेरीपर्यंत अखंडपणे केले. काकासाहेबांची ग्रंथसंपत्ती विपुल आहे. काही शास्त्रीय विषयांवर पहिल्या प्रथम ग्रंथलेखन करण्याचे काम काकांनी केले. ग्यानबाचे अर्थशास्त्र, समाजशास्त्र वगैरे ग्रंथ हे त्याचाच पुरावा आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org