शब्दाचे सामर्थ्य ८७

रयत शिक्षण संस्था या कल्पनेचा जन्म काले, ता. कराड येथील सत्यशोधक समाजाच्या संमेलनात झाला, ही मोठी अर्थपूर्ण घटना आहे. आपल्या भोवतालच्या अज्ञान आणि गरिबी, जातिभेद व त्यांतून होणारे अन्याय, अस्पृश्यता व त्याने केलेले माणसाचे गुलामीकरण या सर्व गोष्टी पाहून गेल्या शतकात महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळीचा झेंडा रोवला आणि यासंबंधी केवळ पुस्तकात न वाचता स्वतःच्या अनुभवाने तीच परिस्थिती आपल्या आसपास आहे, हे पाहिल्यानंतर जोतीरावांनी जे केले, तेच करण्यास कर्मवीर भाऊराव पाटील उद्युक्त झाले.

भाषणाने जनतेत प्रचार केला जातो, पण त्यातून कृती होत नाही, असा अनुभव आल्यामुळे सत्यशोधक चळवळीच्या प्रत्यक्ष कार्यक्रमात आपण उतरले पाहिजे, या जाणिवेने कर्मवीर भाऊरावांनी आपल्या घरी एक अस्पृश्य मुलास ठेवून आपल्या कामास सुरुवात केली आणि तोच आज पुढे मोठा वटवृक्ष झाला. ख-या अर्थाने महात्मा जोतीराव फुले यांचा वारसा विसाव्या शतकात चालविण्याचा ज्या चार-दोन थोर व्यक्तींनी निष्ठापूर्वक प्रयत्‍न केला, त्यांच्यापैकी कर्मवीर भाऊराव हे एक आहेत; हा काही सामान्य वारसा नाही; हा क्रांतिकारक वारसा आहे आणि हा वारसा घेऊन भाऊरावांनी सामाजिक विषमतेविरुद्ध व अज्ञानाविरुद्ध घनघोर लढा दिला.

कर्मवीर भाऊराव पाटील ही अशी व्यक्ती होती की, त्यांनी ज्या सामाजिक पार्श्वभूमीवर हे कार्य उभे केले आहे, ती समजली, तरच कर्मवीर भाऊरावांसारखा कर्तृत्ववान पुरुष समजू शकेल. त्यांना कोणतीच गोष्ट लढाई लढल्याशिवाय मिळाली नाही. महात्मा गांधींनी धनिणीच्या बागेला दिलेली भेट ही काही भाऊरावांच्या सहजासहजी पदरी पडली नाही; त्यासाठी एका अर्थाने भाऊरावांना सत्याग्रह करावा लागला. परंतु गांधीजींचे आशीर्वाद या थोर कार्याला लाभले होते, ही केवढी योगायोगाची गोष्ट आहे. गांधीजींच्या आशीर्वादाने उभी राहिलेली ही संस्था आज हिंदुस्थानातील एक नमुनेदार शिक्षण-संस्था म्हणून कार्य करीत आहे. मी मागे एकदा रयत शिक्षण संस्थेच्या समारंभात म्हटले होते, 'कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था ही निव्वळ शिक्षण देणारी संस्था उभी केली, असे नव्हे, तर त्यांनी सामाजिक परिवर्तनाची एक प्रयोगशाळा उभी केली आहे.' मागासलेल्या जमातींतील असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी आईच्या मायेने जो हात दिला, त्यातून त्या व्यक्तीच्या जीवनात तर परिवर्तन झालेच, परंतु त्याचबरोबर सामाजिक परिवर्तनाचे एक नवे वातावरण निर्माण झाले. भाऊरावांसारखा कर्तृत्ववान मनुष्य असल्याशिवाय असे वातावरण निर्माण होत नाही आणि मनामध्ये उच्च ध्येय, आदर्श ठेवून, कष्टाने का होईना, पण नवे कार्य उभे करावयाचे, हा संकेत केल्याशिवाय असे मोठे कार्य उभे राहू शकत नाही.

ग्रामीण शिक्षण हा कर्मवीरांचा जीवनध्यास होता. हे कार्य पुढे चालविण्यासाठी समर्पित वृत्तीच्या कार्यकर्त्यांचा संच उभारण्यात भाऊराव यशस्वी झाले, हे त्यांचे मोठेच कर्तृत्व म्हटले पाहिजे. भाऊरावांच्या शेकडो विद्यार्थ्यांवर त्यांच्या आदर्शवादाचा आणि सामाजिक पुनर्घटनेच्या आव्हानात्मक निष्ठेचा एवढा परिणाम झाला की, ते भाऊरावांचे कार्य अधिक जोमाने आणि अधिक समर्पित वृत्तीने करायला मोठ्या उत्साहाने पुढे सरसावले. महाराष्ट्राने नेहमीच भौतिक यशापेक्षा बौद्धिक प्रगती, शैक्षणिक कर्तृत्व आणि आदर्श जीवन यांचाच मनःपूर्वक आदर केला आहे. भाऊरावांना महाराष्ट्राच्या इतिहासात अढळ स्थान प्राप्त झाले, ते यामुळे.

आज भाऊराव आपल्यांत नाहीत, परंतु रयत शिक्षण संस्थेमार्फत चालविली जाणारी शेकडो शाळा-महाविद्यालये या आधुनिक ॠषीच्या प्रचंड कार्याची जिवंत स्मारकेच आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org