शब्दाचे सामर्थ्य ८

त्या वेळच्या त्या घटना मनात आजही ताज्या आहेत. क्रांतिकारकांच्या उठावणीचा तो काळ होता. लाहोर-कटाच्या खटल्याने सार्‍या भारताचे चित्त खेचून घेतले होते. अनेक क्रांतिकारकांना त्या वेळच्या नोकरशाहीने तुरुंगांत डांबून, त्यांचे अनन्वित हाल मांडले होते. नोकरशाहीने ज्यांच्यावर दात धरला होता, अशा अनेकांना लाहोर-कटाच्या जाळ्यात गोवले होते, आणि त्यांतच बंगालचे प्रसिद्ध क्रांतिकारक श्री. जतींद्रनाथ दास हे एक होते. जतींद्रनाथांना, वस्तुतः लाहोरच्या कटाशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध सिद्ध न करताना, सरकारने पकडले होते. १९२० सालच्या असहकाराच्या चळवळीत सामील झाल्यापासून नोकरशाहीचा त्यांच्यावर दात होता. पाच वर्षांत त्यांना चार वेळा तुरुंगात अडकविण्यात आले. चौथ्यांदा ज्यावेळी ते मैमनसिंगच्या तुरुंगात गेले, तेव्हा त्यांचा इतका छळ झाला की, वैतागून त्यांनी जेल सुपरिटेंडेंटशी मारामारी केली; परंतु या गुन्ह्यामुळे त्यांना अंधार-कोठडीची शिक्षा भोगावी लागली. तेथे जतींद्रनाथांनी उपवास आरंभिला. तेवीस दिवस त्यांनी उपाशीपोटी काढले, तेव्हा त्यांच्या तक्रारीची थोडीशी कुठे दाद लागली.

लाहोर-कटात अडकवून त्यांना बंदिखान्यात टाकल्यानंतरही पुन्हा तसलाच प्रसंग उद्‍भवला होता. राजकीय कैद्यांना निर्ढावलेल्या बदमाश गुन्हेगारांप्रमाणे वागविले जात आहे, असे पाहून सात्त्विक संतापाने जतींद्रांनी तुरुंगात उपोषण आरंभिले होते. वृत्तपत्रांतून त्यांच्या उपोषणाच्या बातम्या नित्य येत असत. जतींद्रनाथांच्या अगोदरपासून सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी, राजकीय कैद्यांना विशिष्ट सवलती मिळाव्यात, म्हणून उपोषण आरंभिले होते. क्रांतिकारकांच्या या अन्नत्यागाच्या सत्याग्रहाने सार्‍या देशात चिंता पसरली होती. उपोषणाचा एक-एक दिवस वाढत होता आणि नोकरशाही अधिकाधिक निगरगट्ट बनत चालली होती. या दोघां क्रांतिवीरांना उपोषण सुरू करून एक महिना उलटला, तरी इंग्रज राज्यकर्त्यांना घाम फुटेना, तेव्हा तुरुंगातील इतर कैद्यांनीही अन्नसत्याग्रह पुकारला. त्यात जतींद्रनाथही सामील झाले. त्यामुळे भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांच्या उपोषणास गंभीर व उग्र स्वरूप प्राप्त झाले आणि त्यापुढच्या प्रत्येक दिवशी भयाणपणा वाढतच गेला.

कराडला त्यावेळी‘केसरी’,‘ज्ञानप्रकाश’व‘नवाकाळ’ एवढीच वर्तमानपत्रे वाचावयास मिळत असत. अन्नसत्याग्रहाचे काय झाले, हे समजण्यासाठी मी रानातल्या वस्तीवरून रोज दोन-तीन मैल चालून गावात येत असे. कंबरेइतक्या पाण्यातून नदी ओलांडून मी येत असे. त्यावेळी वर्तमानपत्र वाचावयास मिळणे हे सहजसुलभ नव्हते. ज्या कोणाकडे वृत्तपत्र येत असेल, त्याच्याकडे जाऊन ते वाचावे लागे. मी रोज तसे करीत असे. क्रांतिकारकांच्या उपोषणाने मी अस्वस्थ झालो होतो. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांची उपासमारीने सर्व शक्ती संपत आली होती. परंतु त्याहीपेक्षा एक महिन्याने उपवास सुरू केलेले जतींद्रनाथ यांस उपवासाने प्रेतकळा आल्याची वर्णने येत होती. एक तर सरकारने शुद्धीवर आले पाहिजे किंवा प्राणाने देह सोडून गेले पाहिजे, अशा अटीतटीने क्रांतिकारकांचा उपवास सुरू झाला होता. वर्तमानपत्रात त्या वेळी येणारी वर्णने चित्तथरारक होती. का, कोणाला ठाऊक, परंतु जतींद्रनाथांच्या उपोषणाने मला घायाळ केले होते. शेवटचे वीस दिवस तर जतींद्रनाथांची प्रकृती क्षणाक्षणाला घसरत असल्याचे वृत्त येऊ लागले. धडधडत्या अंतःकरणाने मी ते वाचीत होतो. जतींद्रनाथांच्या सुटकेच्या बाबतीत सरकारने धरलेला निष्ठुरपणा यमालाही लाजविणारा होता, असे मला वाटे. जतींद्रनाथ हे काही थोड्या घटकांचे सोबती असताना व पंजाब सरकार त्यांना सोडून भावाच्या ताब्यात देण्यास तयार असतानाही, त्यांच्यापासून जामीन घेतल्यावाचून त्यास सोडू नये, अशी सरकारने अपमानास्पद अट घातली; परंतु या अटीपुढे मान तुकविण्यास जतींद्रनाथांचा भाऊ कबूल नव्हता. दुसरे काहीजण जामीन भरण्याच्या तयारीने पुढे आलेही; परंतु स्वतः जतींद्रनाथांची जामिनावर सुटका करून घेण्याची तयारी नव्हती. जणू काही इहलोकाच्या बंदिवासातून कायमची सुटका करून घेण्याच्या क्षणाचीच ते वाट पाहत होते.

माझ्या बालमनावर या घटनांचा चिरकाल परिणाम झाला. देशासाठी देह सोडणारे जतींद्र माझे कोणी जवळचे आप्त आहेत, असे माझ्या मनाने ठामपणे घेतले. बासष्ट दिवस जतींद्रनाथांनी देशासाठी तीळतीळ आहुती दिली आणि बासष्टाव्या दिवशी लाहोरच्या तुरुंगात भर दुपारी एक वाजता सूर्याला साक्ष ठेवून त्यांनी स्वदेहाची पूर्णाहुती दिली. मातृदेवतेसाठी झिजून-झिजून त्यांनी प्राणार्पण केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org