शब्दाचे सामर्थ्य ६६

१४

मराठी राज्याचे स्वप्न

१ मे, १९६० ! युगायुगांतून येणारा तो दिवस अखेर महाराष्ट्राला दिसला. भारताच्या सर्वश्रेष्ठ नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र मान्य केला व त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात आला. पण त्यापूर्वी २७ एप्रिलला महाराष्ट्रानं शिवनेरीवर तुतारी फुंकून सूर्य उगवल्याचं सांगितलं होतं. मला आठवतं, त्या दिवशी मी शिवनेरीस पोचलो, तेव्हा प्रतापगडपासून शिवनेरीपर्यंतचा घडलेला संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला. महाराष्ट्राची तीन कोटी जनता त्या दिवशी शिवनेरीकडे पाहत होती. महाराष्ट्र राज्याचा उत्सव शिवछत्रपतींच्या जन्मदिवशी शिवनेरीवर सुरू झाला होता आणि १ मे, १९६० ला महामंत्री पं. नेहरूंच्या हस्ते पहाटे संयुक्त महाराष्ट्राचं नवराज्याचं उद्‍घाटन झालं. सोनियाचा दिवस महाराष्ट्रानं पाहिला. आज ते सारं सारं आठवतं. 

ज्या दिवशी राज्य स्थापन झाले, त्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात मी पुढील विश्वास व विचार व्यक्त केले होते.

‘गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील जनतेची जी विचलित अशी अवस्था झाली होती, ती आता संपून महाराष्ट्राला यापुढे स्थैर्याचे दिवस येतील, अशी आशा करण्यास मुळीच हरकत नाही. त्यायोगे लोकांना आता आपल्या विकासाच्या प्रश्नांकडे कटाक्षाने लक्ष देता येईल व विकासकार्यांच्या बाबतीत येणा-या निरनिराळ्या अडचणींना ते अधिक परिणामकारकपणे तोंड देऊ शकतील.’

हे एक; आणि त्यानंतर -
‘नव्या महाराष्ट्र राज्याच्या जन्माने आपल्याला भरभराटीचे व सुखाचे दिवस येतील, ही सामान्य जनतेची अपेक्षा योग्य अशीच आहे. हा जनतेच्या अपेक्षापूर्तीचा क्षण जवळ आणणे हा महाराष्ट्र राज्याचा मी मानबिंदू मानतो.’

आज या रोमांचकारी स्मृतींच्या दिवसांकडे पाठीमागे वळून दृष्टिक्षेप टाकल्यानंतर, मनात काय विचार येतो, तो जास्त महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्याचे स्वप्न साकार होणार, की नाही, हे ठरविण्याची कसोटी मी या माझ्या ‘सह्याद्रीचे वारे’ या भाषणांच्या संग्रहात दिलेली आहे, आणि ती म्हणजे, जनतेच्या सुखाचे दिवस येतील, ही जी अपेक्षा आहे, त्या अपेक्षापूर्तीचे क्षण जवळ आणणे. हा मानबिंदू मानून ह्या कसोटीवर गेल्या वीस वर्षांची तपासणी केली पाहिजे. आज मी असे म्हणू शकणार नाही, की हा अपेक्षापूर्तीचा मानबिंदू आम्ही जिंकलेला आहे. महाराष्ट्राचे समाजजीवन हे जातिधर्मांमध्ये विस्कटून, तुटूनफुटून निघालेले आहे.

या समाजजीवनास एकजिनसी रूप आणता यावे, हा एक प्रमुख उद्देश राज्यनिर्मितीत होता. त्यासाठी काही ध्येयधोरणे घालून दिली होती व निश्चित अशी प्रयत्‍नांची दिशा ठरवली होती. उपेक्षित दलित समाजाच्या सहकार्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व ध्येयधोरणाचा पाठपुरावा करून महाराष्ट्राचे राज्य व राजकारण करावे, असा हेतुपुरस्सर प्रयत्‍न केला गेला; परंतु चंद्रपूरपासून कोकणच्या टोकापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या विशाल भूमीतील या समस्या दूर करण्याकरिता प्रयत्‍न करणा-या कार्यकर्त्यांची उणीव, तसेच, त्यासाठी लागणारी निष्ठा व सामाजिक प्रयत्‍न यांची कमतरता पडली. प्रयत्‍न झाले नाहीत, असे मी म्हणणार नाही. पुरेसे आणि सातत्याने झाले नाहीत, ते कबूल करावे लागेल आणि त्यामुळे आज या दिशेने आमची प्रगती जशी व्हावी, तशी झालेली नाही, हे प्रामाणिकपणाने कबूल करावे लागेल. या प्रश्नाचे स्वरूप विसरून एकटाच महाराष्ट्र काही संपूर्ण वेगळे करू शकेल, हे खरे नव्हते. हा एक विचार म्हणून मी त्यांची नोंद येथे केली आहे. अपयश झाकण्यासाठी एक सबब म्हणून नव्हे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org