शब्दाचे सामर्थ्य ६३

याच सुमारास विदर्भात असंतोष माजला. मी शहाणपणाने महाराष्ट्र मिळविला, पण आता आपल्याला गुलाम केले जाईल, असे तेथील काही लोकांना वाटू लागले. त्यांना राग आला. लोकनायक अणे वगैरे याप्रमाणे बोलत होते. अशा प्रकारे दोन प्रश्न निर्माण झाले आणि त्यावर मीच तोडगा काढावा, असे पंडितजी सांगत होते. मग मी विदर्भातील माझ्या सहका-यांना बोलावून पंडितजींचे म्हणणे सांगितले. त्यावर वसंतराव नाईक, शेषराव वानखेडे, नासिकराव तिरपुडे, काझी या विदर्भाच्या मंत्र्यांनी चांगली भक्कम भूमिका घेतली. ते म्हणाले,
‘आपण दिल्लीत जाऊ. खासदार वगैरेंना भेटू आणि महाराष्ट्र राज्यात आपल्याला राहावयास हवे, असे त्यांना सांगू.’

मी हे मान्य केले; पण सांगितले, ‘जे इतर सहकारी आपल्याविरुद्ध आहेत, त्यांच्याविरुद्ध काही करू, बोलू नका.’ हे सर्वांनी कबूल केले व मग हे माझे सहकारी अनेकांच्या गाठीभेटी घेऊ लागले.

मी कन्नमवारांनाही बोलावले व विदर्भाच्या चळवळीबद्दल बोललो.

ते म्हणाले,
‘मी जाहीररीत्या विदर्भाबद्दल बोललो आहे, तेव्हा मला माघार घेता येणार नाही, पण मी तुमच्याविरुद्ध जाणार नाही.’

मग हे कसे करावयाचे, असे मी विचारले. तेव्हा दोन्ही भागांतील दोन-दोन तीन-तीन काँग्रेसजनांची एक समिती नेमावी व या प्रश्नाचा विचार करून तिने काही ठरवावे, अशी सूचना कन्नमवार यांची होती, ती मी मान्य केली.

तथापि, एकट्या महाराष्ट्र-विदर्भापुरता हा प्रश्न नव्हता. गुजरातमध्येही काही हालचाल करावयास हवी होती. त्या वेळी मोरारजीभाई मुंबईत आले असता मी त्यांची भेट घेतली. मी त्यांना म्हणालो,
‘मोरारजीभाई, द्वैभाषिक मोडून दोन राज्ये करण्याचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. आता जर काहीच न करता आपण स्वस्थ बसलो, तर परिस्थिती बिकट होईल.’

मग काय करावे, असे त्यांनी विचारले.

मी म्हणालो,
‘तुम्हांला द्वैभाषिक तोडण्याची कल्पना तत्त्वतः मान्य नाही, आपला विश्वासभंग झाला, असे तुम्हांला वाटते. पण आपण वस्तुनिष्ठ विचार केला पाहिजे. म्हणून दोन राज्ये सद्‍भावनेने कशी करावीत, हे ठरविण्याची आता गरज आहे. आपण दोघे एकत्र बसून तोडगा काढू.’

मोरारजींनी याला मान्यता दिली. ‘पण दिल्लीच्या नेत्यांचा सल्ला घेतला काय?’ असे त्यांनी विचारले. मी ‘नाही’ म्हणून सांगितले, तसेच, पंडितजींशी सल्लामसलत करण्याची गरज नाही, असेही म्हणालो. याचे कारण माझे मला माहीत होते.

नेहरूंनी या संबंधात स्वतः हालचाल न करण्याचे ठरविले होते, पण मोरारजीभाईंनी मला दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा आग्रह केला आणि आपणही गुजराती नेत्यांशी बोलू, असे ते म्हणाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org