शब्दाचे सामर्थ्य ६२

ते म्हणाले,
‘चव्हाण यांना जर याप्रकारे वाटत असेल, तर आपल्याला काही करावे लागेल.’

मग मोरारजीभाईंना त्यांचे मत देण्यास सांगण्यात आले. मोरारजीभाई म्हणाले,
‘द्वैभाषिक राज्य मोडण्याची कल्पना मला मान्य नाही. ती माझ्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे. तेव्हा पक्षाने द्वैभाषिक मोडावे, असे मी सांगणार नाही; पण चव्हाणांचे मत वेगळे आहे आणि आपल्याला याचा विचार करावा लागेल’, एवढे बोलून त्यांनी जगाच्या इतिहासातील द्वैभाषिक राज्यांची उदाहरणे दिली.

मी मग म्हणालो,
‘द्वैभाषिक राज्याचा प्रयोग चांगला आहे. मोरारजीभाई म्हणतात, यात काही चूकही नाही, परंतु द्वैभाषिकाचा प्रयोग करण्यासाठी आमचीच का निवड केली, असे लोक विचारतात आणि त्यांच्या मनाला ते डाचते. इतरांचा हक्क आपण मान्य केला आहे, मग आमचा का नाही? असा त्यांचा प्रश्न. निदान मराठी लोकांना हे फार बोचते. त्यांच्याशी या संबंधात तर्कसंगत चर्चा करणे शक्य  नाही.’

मोरारजीभाई म्हणाले,
‘इतर राज्यांबाबतही हा प्रयोग करण्याची कल्पना होती, पण कोणी मानली नाही. तामिळनाडू व केरळ यांचे एक राज्य करण्याची सूचना झाली होती, पण कामराज यांनी ती मानली नाही.’

हा प्रश्न निघाला, तेव्हा कामराज कसे बसले होते व ते ‘नाही, नाही’ एवढेच कसे म्हणाले, याची नक्कलच मोरारजीभाईंनी केली.

मी पुन्हा सांगितले की,
‘द्वैभाषिकाच्या मी विरुद्ध नाही, पण हा प्रयोग केला आणि तो फसला.’

यानंतर बैठक संपली. ही बैठक निर्णायक होती.

सकाळी मी मुंबईला परतलो.

त्या दिवशी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद वगैरे ठिकाणच्या वृत्तपत्रांत या बैठकीची बातमी ठळकपणे आली. पंडितजींनी घेतलेल्या बैठकीचा हा वृत्तांत कदाचित त्यांच्या वर्तुळातून प्रसिद्धीला दिला गेला असेल. मी मुंबईला पोहोचलो, तेव्हा मला बरेच लोक भेटावयास आले. विधानसभेचे अधिवेशन चालू होते. माझ्या मंत्रिमंडळातील मंत्री डॉ. जीवराज मेहता यांना वाटले, की विधिमंडळाचा हा विश्वासभंग झाला. मी त्यांना सारा इतिहास निवेदन केला, पण ऑगस्ट-सप्टेंबरपासून वेगळीच अडचण उभी राहिली. काँग्रेसचे अध्यक्ष होते ढेबर. त्यांचा द्वैभाषिक तोडण्यास विरोध होता. गुजरातच्या लोकांना ही बदललेली भूमिका आम्ही कशी पटवणार, असे त्यांनी नेहरूंना विचारले. पंडितजींच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य होते. अशा वेळी ते शिंपल्यात जाऊन बसतात. तसे ते बसले. इकडे लोकांना द्वैभाषिकाच्या फेरविचाराची योजना समजली होती; पण हालचाल होत नव्हती. हा फेरविचार करण्याचे पाऊल कसे टाकावयाचे, हे मी नेहरूंना विचारले. तेव्हा ढेबर व मोरारजीभाईंचे मत त्यांनी मला ऐकविले आणि मीच या संबंधात शंकासमाधान केले पाहिजे, असे म्हणाले. आता जर द्वैभाषिकाचा फेरविचार केला गेला नाही, तर काय होईल, या विचाराने मला धडकी भरली, मी अस्वस्थ झालो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org