शब्दाचे सामर्थ्य ५९

ठरल्याप्रमाणे मी अडीच वाजता गेलो. नेहरूंनी मला लगेच त्यांची विश्रांतीची जी खोली होती, तीत नेले आणि महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी माझे मत काय, म्हणून विचारले. तसेच, गुजरात व विदर्भाच्या मंत्र्यांशी माझे कसे संबंध आहेत, अनेक प्रमुख व्यक्तींची नावे घेऊन त्यांच्याशी कसे संबंध आहेत, कारभारयंत्रणा कशा प्रकारे चालू आहे. अधिका-यांचा प्रतिसाद कसा आहे, असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले.

मी प्रत्येकाची उत्तरे दिली.

‘कारभारयंत्रणा चांगली चालली आहे, विकासाची कामे होत आहेत, परंतु...’
नेहरूंनी विचारले,
‘हे परंतु काय?'
मी म्हणालो,
‘परंतु लोक समाधानी नाहीत !’
‘का नाहीत?’
या प्रश्नाला मी उत्तर दिले की, ‘विकासाची कामे करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे व सरकार ते करील. पण यासाठी द्वैभाषिकाची गरज नाही, अशी लोकभावना आहे व म्हणून ते संतुष्ट नाहीत. तुम्ही इतर मंत्र्यांशी बोलून त्यांचे काय मत आहे, हेही पाहावे. माझ्याबरोबर काम करावयाचे असल्याने ते मला एक सांगत असतील, पण त्यांच्या काही इतरही कल्पना असण्याचा संभव आहे.’

नेहरू यावर हसले आणि अगोदरच यांपैकी काही जणांशी बोललो असून, माझे विश्लेषण प्रायः बरोबर, असेही ते म्हणाले.

अशाच प्रकारचे बोलणे झाल्यावर अखेरीस त्यांनी मला विचारले की,
‘शासकीय दृष्टया द्वैभाषिक मुंबई राज्य चांगले चालले आहे, पण राजकीय दृष्ट्या तसे ते चाललेले नाही, हाच तुझा निष्कर्ष आहे ना? हे तुझ्या मनातले आहे, हे खरे काय ?’

मी होकार दिला व माझे स्पष्ट मत असल्याचेही म्हणालो.
त्यावर -
‘तू तुझे मन बोलून दाखविलेस, हे चांगले झाले’, असा अभिप्राय देऊन आमच्या संभाषणाबद्दल कोणापाशीही न बोलण्याचा सल्ला त्यांनी मला दिला.

हे संभाषण १९५८ च्या मध्यास झाले. नेहरूंच्या सल्ल्याप्रमाणे मी या संभाषणाची गंधवार्ता कोणालाच लागू दिली नाही. नेहरू या सा-या प्रश्नाचा फेरविचार करण्याच्या मनःस्थितीत आहेत, याचा अंदाज मला या वेळी लागला.

नेहरूंनी हा विषय त्यांच्या काही निकटवर्तीयांपाशी नंतर काढला असेल. राजकीय परिस्थितीचे मी केलेले विश्लेषण त्यांनी पं. पंत यांना सांगितल्याचेही मला नंतर कळाले.

नेहरू ५८ साली डिसेंबरच्या सुमारास मुंबईत आले होते. त्यांचे उपनगरात कार्यक्रम होते. या कार्यक्रमानंतर दुपारच्या भोजनासाठी राजभवनावर येण्याऐवजी आरे वसाहतीत खास अतिथिगृह आहे आणि तेथे जेवणाची व्यवस्था होऊ शकते, असे मी म्हणालो, तेव्हा नेहरूंनी ते लगेच मान्य केले. भोजनानंतर आपण एखादी डुलकी घेऊ, असेही ते म्हणाले. पण कोणत्याही कारणाने असो, त्यांना झोप आली नाही व त्यांनी बोलावणे धाडले. त्यांची भाची नयनतारा सहगल बरोबर होती. तिला हे माहीत नव्हते. म्हणून या वेळी नेहरूंची झोपमोड कशासाठी करतो ? असे तिने विचारले. नेहरूंनीच बोलावणे धाडल्याचे मी तिला सांगितले. मी खोलीत गेलो, तेव्हा पंडितजी आडवे झाले होते. त्यांनी बसावयाला सांगितले व लगेच हैद्राबादच्या संभाषणाची त्यांनी आठवण दिली आणि विचारले की ‘द्वैभाषिक तोडून दोन स्वतंत्र राज्य केली, तर काँग्रेसला बहुमत मिळेल काय ?’ महाराष्ट्रात ५७ साली काँग्रेसला कमी जागा मिळाल्या होत्या, त्याचाही त्यांनी उल्लेख केला. मी त्यांना सांगितले, की ‘मी याचा विचार केलेला नाही. आणि मी याबद्दल कोणाशी बोललो नाही, पण तुम्हांला याचे उत्तर पुढील बैठकीत देऊ शकेन.’ त्यांनी ते मान्य केले, काँग्रेसच्या बहुमताविषयी त्यांना खात्री हवी होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org