शब्दाचे सामर्थ्य ५७

मनात एकभाषिक ठेवून मी द्वैभाषिक चालविले नाही. या प्रयोगाला पूर्ण वाव द्यावयाचा, तो यशस्वी होत असेल, तर त्याला संपूर्ण संधी द्यावयाची, अशा निर्धाराने एक-दीड वर्ष मी अगदी एकनिश्चयाने (single-minded) द्वैभाषिक राबविले. त्यात सदिच्छा कायम राखण्यास संधी मिळेल, राष्ट्रीय दृष्ट्या हा एक प्रयोग होत आहे, त्याला आपल्याकडून संपूर्ण सहकार्य द्यावयाचे, अशी माझी या बाबतीतील धारणा होती.

द्वैभाषिकाच्या फेरविचाराला चालना कोणी व केव्हा दिली, ते तपशिलाचे प्रश्न आहेत, पण फेरविचाराच्या प्रक्रियेला सर्वसाधारणपणे कशी चालना मिळाली, ते सांगतो. द्वैभाषिकाचा कारभार सुरू करताना मला जे सहकार्य मिळाले, त्यामुळे मला खूप उत्साह वाटत होता. या राज्यातील प्रचंड साधनसामग्रीचा उत्कृष्ट विनियोग करून विकासकार्याच्या द्वारे या विशाल प्रदेशाचे भवितव्य घडविण्याची ही सुसंधी आपल्याला लाभली आहे, अशी एक प्रकारची ‘थ्रिल’ मला वाटत होती; परंतु दीड-पावणेदोन वर्षांनतर संमिश्र अनुभव येऊ लागला. ज्यांच्यासाठी आपण हे सारे करावयाचे, त्यांनाच यात काही रस वाटत नाही, असे राजकीय दृश्य डोळ्यांसमोर दिसायचे. एका बाजूने विकासकार्याच्या आघाडीवर आपले राज्य नेण्यासाठी आलेली संधी पाहून मला स्फुरण चढे आणि दुस-या बाजूला ज्यांच्यासाठी हे सर्व आपण करावयाचे, ते लोक अनुकूल मताचे नाहीत, या विचाराने मन खिन्न होत असे. असा दुहेरी अनुभव मी घेत होतो. मात्र जनतेची मनोभावना मला विकृत अथवा उपेक्षणीय केव्हाच वाटली नाही. शेवटी लोकशाहीत लोक हाच कोणत्याही कार्याचा आधार. लोकांच्या भावनांचा विचार हाच प्रधान विचार. आपली जी साध्ये आहेत, त्यांच्यासाठी प्रयत्‍न करताना लोक आपल्याबरोबर असतील, तर मनाला वाटणारा उत्साह द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही, असे पुढेपुढे माझ्या मनात येत असे. पण एक गोष्ट मी कटाक्षाने पथ्य म्हणून पाळली होती. ती अशी की, ज्यांनी माझ्यावर द्वैभाषिक राबविण्याची जबाबदारी टाकली होती, त्यांनी या बाबतीत मला विचारीपर्यंत आपण होऊन या प्रश्नाचा फेरविचार करा, असे सुचवावयाचे नाही; पण जेव्हा ते होऊन मला परिस्थितीचा अंदाज विचारतील, तेव्हा मात्र सुस्पष्ट कल्पना द्यावयाची. आपल्या विकासकार्यांत लोकांचे उत्साहपूर्ण पाठबळ लाभत नाही, हा अनुभव जसा मला येत होता, त्याचप्रमाणे राष्ट्रीय नेत्यांनाही त्याची जाणीव होत असलीच पाहिजे, असा माझा विश्वास होता. त्याप्रमाणे त्यांच्याही मनात डाचणारी ही गोष्ट त्यांनी मला विचारली आणि प्रांजलपणे व सुस्पष्टपणे माझे परिस्थितीबाबतचे बनलेले मत मी वरिष्ठ नेत्यांना सांगितले. आताच म्हटल्याप्रमाणे सवंगपणाने मतप्रदर्शन करण्याचा मोह मी टाळला होता. किंबहुना आपण अशा वेळी जे मत देऊ, ते निर्णयासच कारणीभूत व्हावे, इतकी आपली शक्ती निर्माण व्हावयास हवी, असे मला वाटे. राष्ट्रीय नेत्यांकडून अर्थात माझ्या मतप्रदर्शनाची कदर केली गेली आणि माझे मत निर्णय ठरविण्याच्या कामी महत्त्वाचे मानले गेले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org