शब्दाचे सामर्थ्य ५

या ग्रंथात समाविष्ट केलेली त्यांची भाषणे फारच थोडी व निवडक आहेत, असे म्हणावे लागेल. राजकीय नेता म्हणून जगलेल्या आपल्या चाळीस वर्षांच्या जीवनात त्यांनी अनेक प्रसंगी अनेक भाषणे केली आणि उपलब्ध भाषणांतून काही भाषणे निवडण्याचे काम संपादक म्हणून मला करावे लागले. ते करताना इतर अनेक चांगली भाषणे निवडता आली असती, याची मला जाणीव आहे. परंतु एकंदर या ग्रंथाच्या रचनेच्या दृष्टीने मला तसे करता आले नाही, याचा खेद वाटतो.

शेवटी या चार विभागांचे सार म्हणजे यशवंतरावांचे विचार व त्यांना लाभलेले संस्कार, राजकीय आयुष्यातील अनुभव, सहकारी व मित्र यांची सोबत, तसेच त्यांनी केलेले विचारमंथन हे मराठी भाषेत आणि महाराष्ट्रातील नवीन पिढीसाठी एक मार्गदर्शक ठरतील, अशी माझी भावना आहे. त्यांच्याच शब्दांत‘वर्तमान काळ समजण्यासाठी इतिहासाचे चिंतन करावे लागते. कारण वर्तमान काळाशी झगडणार्‍या माणसाला भूतकाळ समजण्याची जर अक्कल नसेल, तर वर्तमान काळाशी तो फारसा झगडू शकणार नाही.’ भूतकाळाचे महत्त्व समजणार्‍या नेत्यांनी भविष्याकडे दृष्टी ठेवून महाराष्ट्राच्या स्थापनेच्या प्रसंगी महाराष्ट्राला‘जगन्नाथाचा रथ’अशी उपमा देत असताना ते म्हणाले,‘महाराष्ट्राच्या भवितव्याची ही मोठीच मोठी, लांबच लांब सफर आहे... त्या सफरीतील आम्ही प्रवासी आहोत. ही सफर तुम्हां-आम्हांला पुरी करावयाची आहे... ती सफर आज मला माझ्या डोळ्यांसमोर दिसते आहे... ती लांबची सफर आहे... पण ती पुरी केलीच पाहिजे... कारण त्यांत जनतेचे कल्याण आहे...’ त्यांचे हे शब्द महाराष्ट्राला सदैव मार्गदर्शक ठरतील, असे मी म्हणतो.

या ग्रंथाच्या संपादनासाठी गेली चार-पाच वर्षे मला ज्यांनी मदत केली व ज्यामुळे हे साध्य होत आहे, त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे योग्य होईल. कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारकाचे ग्रंथपाल विठ्ठलराव पाटील हे यशवंतराव चव्हाण प्रेमी व त्यांच्या कार्याचे गाढे अभ्यासक म्हणून समजले जातात. त्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन, निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेले लेख मला उपलब्ध करून दिले व संपादनात बहुमोल मदत केली.

त्याचप्रमाणे‘अमेय प्रकाशना’चे हे तरुण प्रकाशक उल्हास लाटकर यांनी अत्यंत समंजसपणे, खर्चाचा विचार न करता या ग्रंथाच्या छपाईसाठी जे कष्ट केले, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

तसेच, माझे मित्र श्री. बाबूराव शिर्के यांनी आपले स्वीय सहायक चंद्रकांत कदम यांची सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे हा ग्रंथ संपादित होत आहे, याची मला जाणीव आहे, याची मला जाणीव आहे. त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे.

या ग्रंथाचे खरे लेखक कै. यशवंतराव चव्हाण आहेत. त्यामुळे या ग्रंथाचे सर्व हक्क, तसेच रॉयल्टीचे हक्क सौ. वेणूताई चव्हाण स्मारक, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कराड यांना प्रदान करीत आहे. यास मान्यता दिल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे इतर सहकारी यांचा मी आभारी आहे.

हा ग्रंथ संपादन करताना मला एक विशेष समाधान होत आहे. ज्या यशवंतरावांनी आपल्या हयातीतील पस्तीस-चाळीस वर्षे मला ज्या मैत्रीपूर्ण व बंधुत्वाच्या भावनेने प्रेम अणि विश्वास दिला, त्यांच्याविषयी असलेला माझ्या मनातील नितांत आदर व कृतज्ञता मी या ग्रंथाच्या स्वरूपात सादर करीत आहे. अगोदर म्हटल्याप्रमाणे हा ग्रंथ कै. यशवंतराव यांचा आहे. यातील जवळजवळ प्रत्येक शब्द त्यांनी बोललेला किंवा लिहिलेला आहे, हे मी स्पष्ट करू इच्छितो. या ग्रंथाच्या स्वरूपात साहित्यिक म्हणून यशवंतराव चव्हाण मराठी भाषकांसाठी अमर राहतील, मी माझी भावना आहे.

राम प्रधान
गुढीपाडवा                     
५ एप्रिल, २०००      

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org