शब्दाचे सामर्थ्य ४९

कॅनडामध्ये हिंडताना, कॅनडामधील काही नामवंत लेखकांनी लिहिलेले ग्रंथ खरेदी करण्यासाठी म्हणून मी काही पुस्तकांच्या दुकानांतून फेरफटका मारला. ओटावामध्ये असताना तेथील एका तरुण, तरतरीत अधिका-याबरोबर मी पुस्तकांच्या दुकानात गेलो. पुस्तकांची चांगली दुकाने आपल्याला पाहावयाची आहेत आणि पुस्तके खरेदी करावयाची आहेत, असे मी या अधिका-याला सांगितले होते. त्याने मला मोठ्या दुकानांतून फिरविले. हा तरुण अधिकारी पूर्वी भारतात आला होता आणि महाराष्ट्रात उरळी कांचनला आठ-दहा दिवस राहिलेला होता. मोठा हुशार वाटला.

पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर, ग्रंथांवरून मी नजर टाकली आणि काहीही खरेदी न करता परत फिरू लागताच, माझ्या बरोबरीच्या तरूणाला मोठे आश्चर्य वाटले.

‘पुस्तकं खरेदी करणार आहात ना?’त्याने विचारले. ‘मला पाहिजे आहे, ते इथं दिसत नाही.’ मी सांगितले. यावर तो आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहतच राहिला.

वस्तुस्थिती अशी होती, की तिथे हारीने मांडलेले ग्रंथ हे अमेरिकन लेखकांचे होते. मला हवे होते ग्रंथ कॅनडामधील लेखकांनी लिहिलेले. पण मला असे आढळले, की अमेरिकन लेखकांनीच ग्रंथबाजाराचा बव्हंशी कबजा घेतलेला आहे. इंग्लंडमधील पुस्तकांच्या दुकानांतून मला इंग्रज लेखक आढळले. परतु कॅनडामधील दुकानांत अमेरिकन लेखकांचा भरणाच अधिक दिसला.

कॅनेडियन लेखकांची माहिती मिळेल, म्हणून मोठ्या उत्साहाने मी खरेदीसाठी गेलो होतो. अखेर या तरुण अधिका-यासच कॅनडामधील लेखकांची यादी देण्यास मी सुचविले. अर्थात कॅनडामधील तीन-चार दिवसांच्या मुक्कामात मला जे दिसले, त्यावरून माझे हे मत बनले. संशोधन करून हे मत बनले आहे, असे नव्हे. कॅनेडियन लेखकांचीही पुस्तके अन्यत्र कोठे असू शकतील, परंतु मी गेलो, तेथील दुकानांत मला जो भरणा दिसला, तो मात्र अमेरिकन लेखकांचा होता.

या सा-या प्रवासात सायप्रसची भेट मात्र माझ्या लक्षात वेगळ्याच कारणाकरिता राहिली. सायप्रसचा प्रश्न सध्या वादग्रस्त बनला असून, सायप्रसच्या प्रचलित सरकारला शक्ती मिळावी आणि तेथील प्रमुख दोन समाजांत सहकार्य निर्माण व्हावे, असे भारताचे धोरण होते.

सायप्रसमध्ये ग्रीस आणि टर्किश असे दोन समाज आहेत. मी गेलो, तेव्हा हे लहानसे बेट पाहण्याचा प्रयत्‍न केला. त्या वेळी दोन-तीन गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्या. मी जे पाहिले, त्याबद्दल आता काही मत व्यक्त करणे योग्य होणार नाही. पण जे पाहिले, ते मात्र मनात राहिले आहे. तेथील ख्रिस्तपूर्व राजधानी ‘सलामिस’ ही ‘सइन्स’ मध्ये आहे. इथे पूर्वी रोमन राज्य होते. ख्रिस्तपूर्व काळातील राजवाडे, थिएटर, स्नानगृह, तेथील पुस्तके वगैरे गोष्टी आजही पाहावयास उपलब्ध आहेत. राजवाड्यातील स्नानगृह पाहण्यासाठी गेलो, तेव्हा मला तिथे एक प्रतीक दिसले. आपल्याकडे जसे ब्रह्मा, विष्णु, महेश असे तिघांचे एकत्रित प्रतीक आहे, तसे ख्रिस्तपूर्व काळातील ते त्यांचे प्रतीक आहे. पण आश्चर्य असे की, या प्रतीकाची शिरे कापलेली होती. हा प्रकार पाहिल्यानंतर माझ्या बरोबर जी मार्गदर्शक स्त्री होती, तिच्याकडे याबाबत पृच्छा केली, तेव्हा ती म्हणाली, ‘ख्रिश्चनांनी केलेला हा अत्याचार आहे. त्यांच्या विध्वंसक वृत्तीचा नमुना या अवस्थेत येथे उभा आहे.’ 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org