शब्दाचे सामर्थ्य ४३

केतकरांचे वय झालेले, त्यांना डोंगर चढण्याचे श्रम मानवतील का, असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. त्यांना मी तसे सांगितलेही. परंतु केतकरांची उमेद दांडगी, ‘हो, हो! मी डोंगर चढू शकेन!’ त्यांनी होकार भरला आणि वेळ ठरवून आम्ही मग आगाशिवच्या मार्गाला लागलो. आम्ही डोंगर चढू लागलो आणि थोड्याच वेळात माझी धास्ती खरी ठरली. पायथ्याचा थोडासा भाग केतकर आमच्या बरोबर चढले आणि मग पार थकले, संपूर्ण डोंगर चढून जाण्याचे लक्षण दिसेना, त्यांना ते झेपणारेही नव्हते. थकल्याने ते थांबले आणि एका दगडावर बसले.

मी विचार करू लागलो. आम्हांला तर डोंगरावर जायचे होते. लेण्यांत पोहोचायचे होते.

‘तुम्ही आता असं करा, इथंच झाडाखाली विश्रांती घ्या.’ मी केतकरांना सुचविले. केतकरांनाही ते मान्य दिसले. त्यांना मग विश्रांतीकरिता थांबवून आम्ही मुले पुढे गेलो.

आगाशिवला मी दरसाल जात असे. परंतु त्यामध्ये ज्ञानकोशकारांच्या बरोबर आगाशिवला गेल्याची आठवण मात्र मनात कायमची राहिली.

कृष्णाकाठ धुंडाळावा, डोंगरद-यांतून हिंडावे, निसर्गशोभा लुटावी, हा माझा छंद जुना आहे. या छंदापायी तरुणपणी कराडच्या जवळचे आणि लांबचे अनेक गड, किल्ले चढलो. वसंतगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड हे तर आमच्या परिसरातील गड. सातारचा अजिंक्यतारा, परळीचा सज्जनगड, कोल्हापूरजवळच्या पन्हाळा या किल्ल्यांवरूनही सफरी केल्या. प्रतापगड, रायगडची मजल केली. गड आणि किल्ले चढण्याचा एक वेगळाच आनंद असावयाचा. किल्ला चढताना आणि चढून गेल्यावर त्या किल्ल्याचा निसर्ग आणि इतिहास यांचे तर दर्शन घडतेच, परंतु एकदा किल्ल्यावर चढून उभे राहिले आणि अवतीभोवती सभोवार नजर टाकली, म्हणजे खालून वाहणा-या नद्या, पाण्याने भरलेली त्यांची पात्रे, नागमोडी वळणाचा त्यांचा तो मार्ग आणि तीरावरील वृक्षांच्या रांगा पाहून मन हरखून जात असे.

शेतांची शोभा वेगळीच. काही शेतांतली पिके निघालेली, काहींतली उभी. मध्येच एखादे गवताचे, सरमडाचे, कडब्याचे बुचाड शिखरासारखे दिसायचे. एकाच गालिच्यावर निरनिराळ्या रंगांचे आणि आकारचे पट्टे काढून गालिचा आकर्षक बनवितात, तसा हा शेतीच्या अंथरलेला गालिचा उंचावरून मोठा सुंदर दिसतो. सृष्टीच्या रूपाने अशा वेळी मला वारक-यांचे दर्शन घडायचे. कराडहून पंढरपूरला जाणारे वारकरी मी पाहत असे. वारक-यांची पताका, गळ्यातला वीणा, खांद्यावरची पडशी, हातांतले टाळ, गळ्यातली माळ, डोक्यावरचे मुंडासे, प्रत्येकाचा रंग वेगळा. चेहा-याचेही तसेच. कपाळावर बुक्क्याचा टिळा आणि इतरत्र गोपीचंदन. निरनिराळ्या रंगांच्या मुद्रा उठविलेल्या पाहताक्षणीच निरागसता लक्षात यावी, पवित्र वाटावे, अशी एकूण ठेवण. डोंगरावरून शेताचे, सृष्टीचे दर्शन असेच व्हावयाचे. जीवनातले ते दिवस सुगीचे वाटत असत.

हळूहळू ते दिवस मागे सरकले. विचाराने, कृतीने, मनाने राजकारणात राहून मी धावपळ करीत होतो. टप्पे ओलांडीत राजकारण पुढे चालले, तसा मीही जात राहिलो. भारत आज स्वातंत्र्याच्या टप्प्याजवळ येऊन पोहोचला होता आणि मी मुंबईत येऊन थांबलो होतो. क-हाडच्या प्रीतिसंगमाच्या आठवणी बाळगून आणि कृष्णाकाठची प्रदक्षिणा करण्याचे स्वप्न मनात धरून ! मुंबईत सरकारी कामे करीत होतो. भारत स्वतंत्र झाला आणि राजकारणात मला आणखी एक पुढची झेप घ्यावी लागली. प्रवासाची कक्षा आता थोडी रुंदावली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org