शब्दाचे सामर्थ्य ३३

अखेरचा लढा

ही आठवण झाली, की मन वर्षांचे पंख लावून तीस वर्षांपूर्वीच्या काळात जाते. १९४२ चा अखेरचा स्वातंत्र्य-लढा डोळ्यांपुढे उभा राहतो. मी त्या वेळी सातारा जिल्ह्यातला एक लहानसा काँग्रेस कार्यकर्ता होतो. अ. भा. काँग्रेस कमिटीची बैठक ८ ऑगस्टला निश्चित झाली होती. या बैठकीचे वातावरण काही तरी वेगळेच आहे, हे आम्हांला जाणवत होते. आता होईल, तो लढा अंतिम असणार, अशी जाणीव कुठे तरी मनात होती. आम्ही जिल्ह्यातील सात-आठ कार्यकर्ते ५ ऑगस्टला मुंबईस गेलो. अ. भा. काँग्रेस कमिटीच्या बैठकीतील भाषणे मन लावून ऐकली; पण महात्मा गांधींच्या भाषणाने आम्ही भारावून गेलो.

गांधींची ‘चले जाव !’ ची घोषणा झाली होती आणि ब्रिटीश सत्ता खिळखिळी करण्यासाठी सारेच तयारीला लागले होते. सातारा जिल्हा तर अगादेरच जागृत जिल्हा. लोकविलक्षण स्वातंत्र्ययुद्धात हिरिरीनं उडी घ्यायचं आम्ही मुंबईतच ठरवलं. ब्रिटिशांनी धरपकड सुरू केली होती. बडे नेते गजांआड झाले होते. आमच्या वाट्यालाही तेच येणार होतं. म्हणून गुप्तपणानं सातारा जिल्ह्यात पोचायचं आणि उठाव करायचा, असे डाव आखण्यात आम्ही गुंतून गेलो आणि तेच केलं. सातारा जिल्ह्यातलं बेचाळीसचं आंदोलन हा एक प्रदीर्घ इतिहास आहे. त्याची पानं किती उलटावीत ! जन्मभर आणि जन्मांतरी आठवणीत राहतील, अशा त्या सा-या आठवणी आहेत. तिथला तो भूमिगतांचा इतिहास भूमिगतच राहावा, असं वाटतं. सारेच श्रेयाचे वाटेकरी. ते श्रेय कुणाकडे कमी-अधिक करून वाटता येण्यासारखं नाही. त्या आंदोलनातील भूमिगत अवस्थेतील काळ, पत्‍नी आणि बंधूंची धरपकड, मला स्वतःला झालेली अटक आणि भूमिगत अवस्थेतील अनेक रोमांचकारी प्रसंग आठवताना अभिमान आणि अनुकंपा यांचं काही चमत्कारिक मिश्रण मनात तयार होत राहतं. घडलं, ते सारं रोमांचकारी, हे तर खरंच !

रात्री आम्ही बद्रिकाश्रमात खूप वेळ चर्चा करीत होतो. शेवटी आम्ही ठरविले, की काहीही झालं, तरी तुरुंगात जायचे नाही. भूमिगत राहून चळवळ पुढे न्यायची. हा अंतिम लढा यशस्वी करायचा. पहाटे सर्व राष्ट्रीय नेत्यांची धरपकड झाली. आमचीही वॉरंट्स आमच्या स्वागतासाठी तयार असणार, याची खात्री होती, म्हणून मुंबईहून एकेकट्याने गुपचूप परत जावे, असे ठरले. त्याचबरोबर जिल्ह्यात गेल्यानंतर हाती घ्यावयाच्या कार्यक्रमाबद्दलही आम्ही खूप विचार केला. आमच्यापुढे दोन पर्याय होते. एक म्हणजे, ब्रिटिश सत्ता खिळखिळी करण्यासाठी त्या सत्तेला आधारभूत असलेल्या गोष्टींचा विध्वंस करणे किंवा स्वातंत्र्य-लढ्याचा संदेश जनतेपर्यंत नेऊन तिला लढ्यासाठी संघटित करणे. माझ्या दृष्टीने दुसरा पर्याय महत्त्वाचा व आवश्यक होता आणि तोच आम्ही स्वीकारला. तेथूनच सातारा जिल्ह्यातील लोकविलक्षण स्वातंत्र्य-लढ्याला सुरुवात झाली. माझ्या दृष्टीने या लढ्याचे दोन टप्पे पडतात. पहिला टप्पा जागृत जनतेने उठविलेल्या आवाजाचा आणि दुसरा टप्पा ह्याच जनतेने ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला दिलेल्या प्रत्युत्तराचा. अर्थात पहिल्या टप्प्याशी माझा फार निकटचा संबंध होता.

आम्ही भूमिगत बनून जिल्ह्यात परत आलो, तरी भूमिगत आहोत, असे काही वाटत नव्हते. कारण आम्ही उजळ माथ्याने फिरत होतो. सभा घेत होतो. बैठकी घेत होतो. याचे रहस्य म्हणजे, स्थानिक पोलिसांची आम्हांला असलेली सहानुभूती व जनतेचा पाठिंबा हेच होते. जिल्ह्यात येऊन आम्ही कामाला लागलो. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठेमोठे मोर्चे काढावयाचे. ब्रिटिश सत्तेचे प्रतीक असलेल्या मामलेदार कचेरीवर हे मोर्चे न्यावयाचे आणि प्रत्येक कचेरीवर काँग्रेसचा झेंडा लावावयाचा, असा कार्यक्रम ठरला. हा कार्यक्रम साधा वाटला, तरी त्यामागे बराच अर्थ होता. मोर्च्याच्या रूपाने स्वातंत्र्य-लढ्याचे लोण समाजातल्या सर्व थरांत पोचणार होते. अनेकांना स्फुरण चढणार होते आणि आपण प्रत्यक्ष ब्रिटिश सत्तेच्या मर्मस्थानावर घाव घालीत आहोत, ही भावना जनतेमध्ये निर्माण होणार होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org