शब्दाचे सामर्थ्य २६

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नावाशी माझी पहिली ओळख अशी झाली आणि पुढे त्यांच्या विचारांशी असलेला संबंध काहीसा वाढत गेला.

जेलमधून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या अनेक सहकारी मित्रांच्या सोबतीमुळे आणि आग्रहामुळे काही काळ रॉय यांच्या विचारांचा पाठपुरावा केला होता.

या राजकीय स्वरूपाच्या पुस्तकांच्या वाचनाबरोबरच वाङ्मयविषयक पुस्तकांचे वाचनही मी सुरू केले. मराठी वाङ्मयाच्या वाचनाची माझी आवड जुनी होती. तिला आता नवा अर्थ प्राप्त झाला. आचार्य भागवतांच्या बिछान्याभोवती रोज संध्याकाळी आम्हां अनेक जिज्ञासू सत्याग्रहींचा गराडा पडलेला असे.

आचार्य भागवत हे सर्वंकष बुद्धीचे गृहस्थ होते. प्रखर विद्वत्ता आणि तितकीच परखड वाणी ही त्यांची दोन मोठी आयुधे होती आणि ते अनेक विषयांवर तासन् तास बोलत असत आणि ते निव्वळ ऐकूनसुद्धा कोणी मनुष्य बहुश्रुत, ज्ञानी झाला असता ! आचार्य भागवतांच्या श्रोत्यांतला मी एक कायमचा श्रोता होतो. बोलण्यापेक्षा ऐकण्यावर मी तेव्हापासून अधिक भर देऊ लागलो.

एकदा बोलता-बोलता सहज त्यांनी बॅरिस्टर सावरकर यांच्यासंबंधी उल्लेख केला. त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणावर त्यांनी सपाटून टीका केली. आचार्य भागवतांनी सावरकरांनी केलेल्या हिंदुत्वाच्या व्याख्येसंबंधी विश्लेषण केले. या हिंदुत्वाच्या पायावर जर आम्ही राजकारण उभे करण्याचा प्रयत्‍न केला, तर भारताचे रहिवासी असलेल्या अनेकविध धर्मांतील लोकांची एकता कशी साधणार? जनतेची एकता हा स्वातंत्र्याचा प्राण आहे. हा हिंदुत्वाच्या आग्रहामुळे जनता एकसंध राहू शकणार नाही, म्हणून हा प्रतिगामी विचार आहे. भागवतांच्या टीकेचा हा सारांश होता.

मला ही टीका पटली. ओघाओघाने कोणी तरी त्यांना विचारले, ‘साहित्यिक म्हणून सावरकरांबाबत तुम्हांला काय वाटते?’

मघाशी त्यांच्यावर राजकीय टीका करणारे आचार्य भागवत एकदम बदलून गेले. त्यांच्या मनामध्ये, त्याचप्रमाणे बोलण्यामध्ये एक प्रकारचा हळुवारपणा निर्माण झाला आणि त्यांनी सांगितले, ‘मला अत्यंत प्रिय आहेत, ते कवी सावरकर’ एवढेच नव्हे, तर दुस-या दिवसापासून सावरकरांचे ‘गोमंतक’ आणि ‘कमला’ यांचे प्रकट वाचन सुरू करणार असल्याचेही जाहीर करून ज्यांना कोणाला यायचे असेल, त्याने यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आता ‘गोमंतक’ आणि ‘कमला’ या काव्यांच्या वाचनासाठी आम्ही सर्व मंडळी दररोज जमू लागलो. सावरकरांच्या या काव्याचा आस्वाद घेण्याची संधी मला प्रथमच मिळाली. त्यातील ‘कमला’ काव्याची गोडी तर अवीट आहे, त्याची भाषा, आपल्या भावना आणि त्याच्यामध्ये असलेली देशप्रेमाची उत्कटता ही तरुण मनाला मोहून टाकणारी होती. मी यापूर्वीच सावरकरांची कविता का वाचू शकलो नाही, याचे मला आश्चर्य वाटू लागले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org