शब्दाचे सामर्थ्य २५०

८०

जीवनाचे पंचामृत

राष्ट्राच्या जीवनात एकामागून एक संकटे निर्माण होत होती. व्यक्तिगत जीवनातही संकटे कोसळली. अशा वेळी विचाराने दृढ आणि कृतीने स्थिर राहूनच त्यांतून पार व्हावे लागले. साथीदारांना पार करावे लागले. सुखाचा क्षण असो अगर दुःखाचा, संकटाचा असो, साथीदारांचे बोट धरून ठेवलेच पाहिजे. सुखाच्या वेळी एकत्र यायचे आणि संकटाच्या वेळी बोट सोडून, दिसेल त्या मार्गाने निसटून जायचे, अशी त्या पिढीची प्रवृत्ती नव्हती. माझ्या साठ-सत्तर वर्षांच्या जीवनाचा ताळेबंद जेव्हा मी मांडतो, तेव्हा विधायक दृष्टिकोन, विधायक प्रवृत्ती ही माझ्या आयुष्यातील जमेची बाजू प्रकर्षाने जाणवते. देशासाठी, देशातील लोकांसाठी काही करू शकलो, तो या विधायकतेचा परिणाम असावा. ध्येयाची, तत्त्वाची, अर्थाची जीवनावर प्रतिक्रिया निर्माण होत असते, असे आपण म्हणतो, त्याचा अर्थ, माझ्या समजुतीने, विधायक प्रवृत्तीने जीवन भारले जाणे, हाच असला पाहिजे.

संपूर्ण जीवनाला काही अर्थ असू शकतो का, असा प्रश्न मनात अनेकदा आला. परंतु त्या प्रत्येक वेळी मी त्यासंबंधी मीमांसा करू शकलो नाही. तो प्रश्न उद्‍भवत राहिला. त्याला तसा परिस्थितीचा संदर्भ असण्याचीही शक्यता आहे. 

देवराष्ट्र हे माझे जन्मगाव आणि आजोळ, आमचं घर हे गावातल्या सामान्य शेतक-याचं घर होतं. खेड्यात राहणा-या लहान आणि गरीब घरांतील मुलांच्याप्रमाणेच माझे लहानपण जात होते. अडीअडचणी, गरिबी, कष्ट आणि नागवणूक यालाच जीवन असे म्हणत असत. घरची गरिबी होती. लहानपणीच मला पितृप्रेमाला वंचित व्हावे लागले. आईनं आम्हां मुलांना जगविण्यासाठी, वाढविण्यासाठी काबाडकष्ट उपसले, हे सर्व खरं, परंतु आमच्या घरानं गरिबीचं कधी भांडवल केलं नाही. आईला एकटीला, एकाकी पद्धतीने सारे करावे लागत होते. तरीपण संकटकालीन परिस्थितीला ती शरण गेल्याचे स्मरत नाही. सातत्याने ती सामोरी जात राहिली.

माझी आई शिकलेली नव्हती. परिस्थिती गरिबीची होती. पंरतु मनानं, संस्कारानं ती श्रीमंत होती. देवावर तिची अखंड निष्ठा होती. संकटाला ती शरण गेली नाही, त्याचं हे एक प्रमुख कारण असलं पाहिजे. आईनं मला गरिबीत वाढवलं, परंतु आपल्या मनाची, संस्कारांची संपूर्ण श्रीमंती तिनं मला दिली. मी माझं जीवन विचारी, कृतिशील आणि त्या अर्थानं संपन्न बनवू शकलो, ते आईनं रुजविलेल्या संस्कारांमुळे होय, अशी माझी नम्र भावना आहे. मन विधायक प्रवृत्तीनं भारलं गेलं, ही देणगीही त्या संस्कारांचीच.

वैयक्तिक जीवनातून समाजजीवनात, लोकजीवनात आणि कालांतराने लोकसत्ताक जीवनात माझे पदार्पण होत राहिले, तेव्हा जीवनाचा अर्थ जीवनाव्यतिरिक्त दुसरा नसावा, असे प्रतीत होऊ लागले. जीवन हाच जीवनाचा अर्थ. वैयक्तिक जीवन हेच त्याचे ध्येय. लोकसत्ताक जीवनाचा अर्थही वैयक्तिक जीवन असाच करावा लागतो.

लोकसत्ताक जीवन म्हणजे राष्ट्रीय जीवन, या जीवनात प्रत्येक व्यक्ती ही सत्तेचे श्रेष्ठ केंद्र मानलेले आहे. राष्ट्राची म्हणून जी काही सत्ता असते, त्या सत्तेचा उगम मानवातून होतो. माणूसच या सत्तेचा उत्कर्ष साध्य करू शकतो आणि या सत्ताशक्तीचा उच्छेदही माणूसच करू शकतो. व्यक्तीचा, समाजाचा, राष्ट्राचा उत्कर्ष साधणारी आणि उच्छेद करणारी शक्ती मानवमात्र हीच असते. लोकसत्ताक जीवन आणि वैयक्तिक जीवन यांतील भेद ज्याला उमजेल, त्याला, मला वाटते, विधायक प्रवृत्ती म्हणजे काय, हे उमजण्यास अडचण पडू नये.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org