शब्दाचे सामर्थ्य १९०

त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. या क्षेत्रात काम करणारी आणखी पुष्कळ माणसे आहेत. त्यांच्या नावाचा मी उल्लेख केला नाही, तर त्याचा अर्थ त्यांचे काम कमी महत्त्वाचे आहे, असे वाटता कामा नये. परंतु त्याचबरोबर या क्षेत्रात काम करणा-या सगळ्या मंडळींनी बाहेरच्या माणसांच्या मदतीने परत एकदा पाहणी केली पाहिजे, असे मला फार वाटते. कारण आपले जीवन शेकडो वर्षे, हजारो वर्षे चालले आहे, आणि माझ्या कल्पनेप्रमाणे आमच्या भारताच्या जीवनामध्ये काहीतरी फार जबरदस्त असे सामर्थ्य आहे. आम्हांला याची प्रचीती बाहेरदेशामध्ये गेल्यानंतर येते. चारशे-पाचशे वर्षांची ज्यांची संस्कृती आहे, अशी राष्ट्रे आज पहिल्या प्रतीची राष्ट्रे म्हणून दुनियेमध्ये मोठ्या मानाने जगत आहेत. पण तीही माणसे मोठ्या अगत्याने आमच्या जीवनाकडे पाहतात. ज्यांना सेन्स ऑफ हिस्ट्री आहे, ज्यांना इतिहासासंबंधी काही जाणीव आहे, ती मंडळी आमच्या जीवनाकडे मोठ्या आपुलकीने पाहत असतात. त्यांना अशी भीती वाटते की, आपले तीन-चारशे वर्षांचे जीवन आज तरी उच्च कोटीला जाऊन पोहोचले असले, तरी काही धोके निर्माण झाले, तर आपले हे टिकेल का ? आणि समजा, हे जर टिकले नाही आणि त्यातून काही धोके निर्माण झालेच, तर पुनः आम्ही आमचे जीवन कोणत्या त-हेने सुसंबद्ध व सुसंस्कृत करू शकू, याला कोणती कारणे आहेत, ती शोधली पाहिजेत, आणि ती पाहण्याकरिता म्हणून ते हिंदुस्थानच्या इतिहासाकडे मोठ्या आपुलकीने पाहत असतात.

किती संकटे आमच्या हिंदुस्थानच्या इतिहासावरती आली. किती राज्ये आली आणि किती साम्राज्ये गेली. किती दौलती आल्या आणि किती काळाच्या उदरात गडप झाल्या; पण भारताची संस्कृती अभेद्यच राहिली. हिंदुस्थानचे जीवन साधेसुधे नाही. अनेक धर्मांचे हल्ले येथे आले नि गेले; परंतु जीवनामध्ये स्वतःचे संरक्षण करण्याकरिता म्हणून काही मूल्ये आहेत, काही सामर्थ्ये आहेत. या सामर्थ्यांचा शोध या लोकसाहित्याच्या मार्गाने घेतला पाहिजे, असे माझे स्वतःचे मत आहे. संशोधनातून जे जमवायचे, ते कशासाठी, हे पाहिले पाहिजे, त्याला काहीतरी नजर असली पाहिजे. आपल्या सामर्थ्याची जाणीव या अभ्यासाने, या चिंतनाने, या संशोधनाने जर आली, तर मला वाटते, ती जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी ह्या दृष्टीने या सगळ्या प्रयत्‍नांकडे पाहिले पाहिजे. मी काही त्यातला अभ्यास केलेला व्यासंगी माणूस नाही; पण या क्षेत्रातील मी एक नादी माणूस आहे. जर ह्याच्यातले कोणी काही सांगितले, तर ते मला ऐकावयाला बरे वाटते. रसिक श्रोत्याची भूमिका मी चांगली करीन. याच्यामधील प्रश्नांची चर्चा करायला लागलात, तर ऐकायला बरे वाटते. परंतु या संबंधाने काही मूलग्राही विचार जरूर माझ्या मनामध्ये आहेत. ते विचार अगत्याने आपल्यापुढे मांडले आहेत. या क्षेत्रात काम करणा-या मंडळींनी पुन्हा आणखीन काय प्रयत्‍न करण्याची गरज आहे, हे पाहावे. तसेच, लोकसाहित्य हे भूतकाळात झाले आहे आणि तसे ते आता काही घडत नाही किंवा काय, हेही पाहिले पाहिजे. हा मी एक विचार मांडला आहे. मला वाटत नाही, हा किती बरोबर आहे. पण पाहा, विचार करा. लोकसाहित्य म्हणजे अशीच गोष्ट आहे, की फक्त जुन्या कहाण्या आणि गीते शोधणे म्हणजेच लोकसाहित्य ! कदाचित आजही घरोघरी या संदर्भात शोधले, तर तुमच्या - आमच्या जीवनाचे प्रतिबिंब जास्त चांगले पाहावयास सापडेल, असे मला वाटते. निव्वळ लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या पुस्तकात समाजजीवनाचे प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्‍न टीकाकार करीत असतात, बाहेरचे पाहत असतात. अप्रकाशित अनुभव आणि निव्वळ उच्चारित वाङ्‌मय असे कितीतरी वाङ्‌मय, कितीतरी साहित्य आमच्या लोकजीवनामध्ये अजूनही असेल. ते शोधण्याचा प्रयत्‍न केला, तर आजचे आमचे जीवन कसे आहे, याचा अनुभव येण्याची शक्यता आहे. अर्थात हे काम कठीण आहे. पण कोणी तरी हे सुद्धा काम केले पाहिजे. हे जे फोकलोअर कमिटीने काम अंगीकारले आहे, ते गेल्या पाच-दहा वर्षांमधले आहे. दहा-बारा वर्षांमागे जुन्या मुंबई सरकारने, मला वाटते, ना. बाळासाहेब खेरांच्या वेळी या कामाला सुरुवात झाली आणि आस्ते आस्ते काम वाढत चालले आहे; फार प्रमाणात वाढत चालले आहे. तरीसुद्धा या कामाची यापुढची प्रगती आम्हाला कोणत्या दिशेने केली पाहिजे, याचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे, असे मला या निमित्ताने सुचवायचे आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org