शब्दाचे सामर्थ्य १८४

एखाद्या पक्षाला बहुजनसमाजाचा पक्ष म्हणून राहावयाचे असेल, तर त्या पक्षाला, राष्ट्रीय आंदोलनाचे स्वरूप द्यावे लागेल. भारतात काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, याचे कारण बहुसंख्य समाजाला लागू असलेले दारिद्र्याचे, सामाजिक सांस्कृतिक उत्थापनाचे जे प्रश्न आहेत, ते आणि असे कितीतरी प्रश्न काँग्रेस पक्ष आजवर स्वतःचे म्हणून हाताळीत राहिला आहे. दलित समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे कार्यक्रमच या पक्षाने आजवर स्वीकारले. बहुजनसमाजाचा पक्ष म्हणून राहायचे असेल, तर हेच कार्यक्रम पक्षाच्या कार्यकर्त्यांना द्यावे लागतील, हे उघड आहे.

बहुजनसमाजातील दारिद्र्याचा प्रश्न पाहा. हा प्रश्न ग्रामीण भागात आहे, तसा नागरी भागातही आहे. नागरी भागात तर श्रीमंत आणि गरीब यांच्यांतील दरी स्पष्टपणे जाणवत असल्यामुळे नागरी भागातील दारिद्र्याचा प्रश्न अधिक बोचक ठरतो. ग्रामीण भाग असो, तेथील बहुजनसमाजाचे आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्पृश्य-अस्पृश्य यांसारखे प्रश्न सोडवावयाचे, तर ते एक राष्ट्रीय आंदोलन म्हणूनच पक्षाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा आजही हा एक कार्यक्रम होऊ शकतो, समाज हा कोणत्याही जाती-जमातीचा असो, त्या ठिकाणी दारिद्र्य हे असतेच असते. महाराष्ट्रात तर सामाजिक दृष्ट्या स्वतःला जे वरच्या थरातील समजतात, त्यांच्यांतही दारिद्र्य आहे आणि इतर समाजातही आहे, याचा अर्थ दारिद्र्याचा प्रश्न हा बहुसंख्य समाजाचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाने दारिद्र्याच्या या प्रश्नांशी मुकाबला करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले, त्यामुळेच तो बहुजनसमाजाचा पक्ष बनला आहे.

जनता पक्षाचा विचार करताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, की मूलतः शक्तीच्या हिशेबाने, हिंदी प्रांतापुरत्या एक विभागीय पक्षासारखे त्याचे स्वरूप दिसते. ग्रामीण भागापर्यंत या पक्षाची मुळे खरी रुजलेली नाहीत. जनता पक्षाची कमजोरी ही त्यांची पक्ष बनण्याची जी अभावात्मक कारणे आहेत, त्यांत सामावलेली आहे. काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सात्त्विक रागाची जी मनोभूमिका तयार झाली, तीवर ज्यांचा कार्यक्रम एक नाही, अशांनी एकत्र येऊन काही प्रांतांच्या जोरावर निवडणूक जिंकली व मग सरकार बनविले, हीच खरी जनता पक्षाची कमजोरी आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस-विरोध, सात्त्विक राग जनता पक्षाला उपयोगी पडला. परंतु सरकार चालवावयाचे, तर धोरण हवे, निश्चित कार्यक्रमाची दिशा हवी. केंद्रीय शासनात त्या दृष्टीने अजून तरी ना सरकार, ना पक्ष अशी 'नॉन-गर्व्हमेंट','नॉन-पार्टी' स्थिती आहे. जनता सरकारचा काही ठोस कार्यक्रम आहे, अशी भावना लोकांच्या मनांतही नाही. त्यामुळे सर्वत्र चलबिचल आहे. जनता पक्षाबद्दल एकूणच भ्रमनिरास वेगाने व्हायला लागला आहे. जो लहान समाज आहे, गरीब समाज आहे, हरिजन समाज आहे, त्यांच्यांत हा भ्रमनिरासाचा वेग जबरदस्त आहे. ज्या वेगाने हा भ्रमनिरास होत राहिला आहे, त्याची कल्पना खुद्ध जनता नेत्यांना तरी आहे, की नाही, माहीत नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org