शब्दाचे सामर्थ्य १७

त्या वेळी आमच्या शाळेमध्ये शेणोलीकर म्हणून एक शिक्षक होते. ते मात्र वेगळ्या प्रकारचे होते. वर उल्लेख केलेल्या कुठल्याही गटात न बसणारे, अत्यंत वक्तशीर, व्यवस्थित आणि टापटिपीने काम करणारे शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांचे चालणे-बोलणेसुद्धा अगदी खास शैलीदार होते. त्यांना खरा शौक होता शिकविण्याचा आणि क्रिकेटचा. त्यांनी मला क्रिकेटमध्ये गुंतविण्याचा प्रयत्‍न करून पाहिला; परंतु मी त्यांच्या हिशेबात बरोबर बसलो नाही. त्यामुळे त्यांनी माझा नाद सोडून दिला. आमच्या शाळेत आणि गावात त्या वेळी जे थोडे-फार क्रिकेट चालले होते, त्याचे सर्व श्रेय या गुरुजींना दिले पाहिजे.

त्यांनी एकदा आमच्या वर्गात मुलांना विचारले, ‘तुम्हांला प्रत्येकाला काय व्हायचे, ते तुम्ही एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहून द्या.’

प्रत्येकाने आपल्यापुढे आदर्श असणार्‍या एका थोर पुरुषाचे नाव लिहून दिले असावे.

मी माझ्या मनाशी विचार केला, की कुठल्या तरी मोठ्या पुरूषाचे नाव लिहून देणे म्हणजे आपली फसवणूक करून घेणे होय. मोठी माणसे आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली असतात. त्यांच्यासारखे आपण होऊ, हा विचार चांगला; पण तसा निर्णय अवास्तव, म्हणून मी माझ्या चिठ्ठीवर लिहिले :
‘मी यशवंतराव चव्हाण होणार.’

मास्तरांनी सर्व मुलांच्या चिठ्ठया पाहिल्या आणि माझी चिठ्ठी पाहून ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ‘अरे, तू तर चांगलाच अंहकारी दिसतोस. तू सार्वजनिक कामांत रस घेतोस, हे चांगले आहे, पण त्यामुळे तू निदान देशातील मोठ्या माणसांचा आदर्श तरी आपल्या डोळ्यांपुढे ठेवला पाहिजेस.’

मी म्हटले, ‘तुमचे म्हणणे खरे आहे, पण मला वाटले, ते मी लिहिले, झाले.’

हा विषय माझ्या दृष्टीने मी वर्गातच संपविला, पण त्यांनी टीचर्स रूममध्ये जाऊन शिक्षक-बंधूंशी या गोष्टीची चर्चा केली असावी. कारण पाठक सरांनी मला विचारले. ते आमचे हेडमास्तर होते. त्यांना मी झालेली खरी हकीकत सांगितली, तेव्हा त्यांनी मात्र मला सांगितले : ‘यात काय गैर आहे? आपले व्यक्तिमत्त्व वाढविण्याचा प्रयत्‍न करण्याची तुझी इच्छा आहे, असा त्याचा अर्थ आहे, आणि तो योग्य आहे. शेणोलीकर तुला काही म्हटले असतील, तर त्याकडे तू लक्ष देऊ नकोस.’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org