शब्दाचे सामर्थ्य १६

‘गाडी नसताना तुम्ही स्टेशनमध्ये काय करीत आहात?’

कदाचित त्याचे बरोबरही असेल. तो आपले काम करीत असेल; पण आमची गैरसोय होऊ लागली. आम्ही त्याला सर्व खरे सांगितले.

‘आम्हांला सकाळपर्यंत वेळ काढावयाचा आहे. सकाळच्या गाडीने आम्हांला कराडला परत जायचे आहे.’

‘निव्वळ नाटक पाहण्यासाठी तुम्ही इतके दूर आलात का ?’ त्याने विचारले.

आम्ही ‘हो’ म्हटले.

मला वाटते, पोलिसांतही काही काही चांगली माणसे असतात. कदाचित तोही नाटकाचा शौकीन असावा.

‘तुम्ही खुशाल बाकांवर झोपा. तुम्हांला कोणी त्रास देणारे नाही.’असे त्याने सांगितले.

अशा रीतीने उरलेली रात्र मंद प्रकाशात, थंडीने कुडकुडत का होईना, त्या स्टेशनवर, बाकड्यांवर अंग टाकून काढली.

दुसर्‍या दिवशी सकाळच्या गाडीने कराडला परत आलो.

विद्यार्थिदशेतले आमचे हे प्रयोग माझ्या घरातील सर्व मंडळींना पसंत होते, असे नाही; पण झालेली हकीकत मी त्यांना खरी सांगे.

२६ जानेवारी, १९३० आणि नंतरचा काळ ब-याच उद्योगांत गेला. माझ्या राजकीय हालचाली तर चालू होत्याच.

आमच्या शिक्षक - वर्गात दोन त-हेची शिक्षक मंडळी होती. एक वर्ग असा होता, की जो मूलतःच राष्ट्रीय वृत्तीचा होता. अभ्यास चांगला करून राजकीय हालचाली करणार्‍या मुलांना ते एक प्रकारे उत्तेजनच देत असत. शाळेचे दोन प्रमुख शिक्षक पाठक आणि दुवेदी हे माझे शिक्षक होते. माझा अभ्यास उत्तम करून मी चळवळी करतो, म्हणून, नाही तरी, त्यांचा माझ्यावर लोभच होता; पण दुसरे काही शिक्षक असे होते, की त्यांना असे वाटत असे, की आम्ही नको ते उपद्व्याप करतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org