शब्दाचे सामर्थ्य १५४

मराठी माणसाच्या मनात थोडासा अहंकार आहे आणि तो कदाचित रास्तही असेल. पण याचे कारण काय? याचे कारण हे आहे की, हे सर्व इतिहासातून घडत आलेले आहे, बनत आलेले आहे. आजही आम्ही बदलतो आहोत. सतराव्या शतकात आम्ही जसे होतो, तसेच आज विसाव्या शतकात आम्ही राहिलेलो नाही. पण आम्ही बदललेले असलो किंवा बदलत असतो, तरीसुद्धा, मूळ पिंड आहे, त्याला धरूनच बदलत राहणार, हेही तितकेच खरे आहे. तेव्हा हा जो आपला स्वभावधर्म घडला आहे, त्याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, आणि म्हणून शहाजीमहाराज आणि मालोजीराजे यांच्या जीवनाचा इतिहास म्हणजे त्यांच्या काळाचा इतिहास असला पाहिजे, त्या वेळच्या समाजाचा इतिहास असला पाहिजे, त्या वेळच्या परिस्थितीचा इतिहास असला पाहिजे.

अमक्याने अमक्यापासून प्रेरणा घेतली आणि अगदी त्याच्या पायांशी बसून धडे घेतले. अशा प्रकारचा समज आमच्याकडे फार आहे. हा अमक्याचा गुरू आणि तो तमक्याचा शिष्य. गुरू भेटला आणि शिष्याला साक्षात्कार झाला आणि मग तो शहाणा झाला, अशाच प्रकारच्या आमच्याकडे कल्पना आहेत. मी असे मानीत नाही; आणि हा ग्रंथ वाचण्यापूर्वी शहाजीमहाराजांपासून शिवाजीमहाराजांनी साक्षात प्रेरणा घेतली, असे मी मानीत नसे आणि हा ग्रंथ वाचल्यानंतही त्या माझ्या मतात बदल झालेला नाही. परंतु त्याबरोबर मला असेही वाटते की, शहाजी महाराजांनी जे केले, ते त्यांनी केले नसते आणि त्याच्याही पूर्वी मालोजीराजांनी जे केले, ते त्यांनीही केले नसते, तर शिवाजीमहाराजांनी जे केले, ते त्यांना सुद्धा करता आले नसते. कारण कोणत्याही महत्कार्याला काही परंपरा असावी लागते. शहाजीमहाराजांच्या काळामध्ये त्यांना असलेले महत्त्व राधामाधवविलासचंपूत वर्णन केलेले आहे. या राधामाधवविलासचंपूला राजवाड्यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली.

प्रस्तावनेतील काही भाग श्री. बेन्द्रे यांनी आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत उद्‍धृत केला आहे. त्यामुळे राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेची कैक वर्षांनी माझी पुन्हा उजळणी झाली. फारसे कळत नव्हते, म्हणून वाचले पाहिजे, या आग्रहाने, या हट्टाने ही प्रस्तावना मी पूर्वी वाचली होती. आज जरा समजले आहे, म्हणून ही प्रस्तावना मी पुन्हा वाचली.

या प्रस्तावनेत महाराष्ट्राची रचना कशी झाली, महाराष्ट्रात वसाहत कशी झाली, येथला मनुष्यस्वभाव कसा बनला, तो तसा का बनला वगैरे गोष्टींचे राजवाड्यांनी अतिशय चांगले विवेचन केले आहे. त्यात काही अर्थपूर्ण वाक्ये आहेत. त्या प्रस्तावनेत त्यांनी असे लिहिले आहे की, येथला मूळ जो बहुसंख्य समाज होता, राजवाड्यांच्या शब्दांत बोलावयाचे, म्हणजे येथले मूळचे जे मराठा क्षत्रिय, मराठा कुणबी, शूद्र कुणबी आणि नागवंशी महार होते, त्यांच्या गुणदोषांचा परिणाम त्या काळच्या अल्पसंख्याक महाराष्ट्र क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यावर म्हणजे त्या काळच्या बुद्धिमंतांवर आणि विचारवंतांवरही पडला. एवढेच नव्हे, तर त्या काळच्या महाराष्ट्राचा गुरूत्वमध्य त्यांनी निर्देश केलेल्या ह्या बहुसंख्य समाजात होता, हा विचार राजवाड्यांनी मोठ्या आग्रहाने या प्रस्तावनेत मांडला आहे. पंरतु या वातावरणात त्या काळी एक फरक पडला, तो असा की, त्या वेळी ज्या मुसलमानी राजवटी येथे होत्या, त्या शहाजीमहाराजांसारख्या कर्तृत्वान सरदारांची आणि माणसांची मदत घेतल्याशिवाय चालूच शकल्या नसत्या, अशी काहीशी परिस्थिती त्या काळात निर्माण झाली होती. शहाजीमहाराजांना बोलवल्याशिवाय निजामशाही वाचविणे अवघड आहे, आदिलशाही वाचविणे अवघड आहे, कर्नाटकात पराक्रम करणे अवघड आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org