शब्दाचे सामर्थ्य १५०

पण 'दोन ध्रुव' हे शब्द वाङ्मयीन मराठीत प्रथम लिहिले गेले, त्याच वेळी आज जे घडत आहे आणि जे घडले पाहिजे, असे आग्रहाने सांगितले जाते आहे, त्याची जाणीव या द्रष्ट्या लेखकाला तेव्हाच झाली होती. दोन ध्रुवां सारखे अंतर असणारी माणसाची जीवने आहेत. शब्दांचे सामर्थ्य फार आहे. मी शब्दांना फार मानतो. त्यांच्यांत अस्त्रांचे सामर्थ्य आहे, तसेच प्रकाशाचे तेज आहे, एखादा शब्द कोणी, अशा वेळी उच्चारतो की, त्यामध्ये एक विलक्षण सामर्थ्य येते. गांधीजींनी 'क्विट इंडिया!' हे शब्द उच्चारले. केवढे सामर्थ्य या दोन शब्दांत होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या रामायणाचे सर्व सार आहे या शब्दोच्चारात.

केव्हा केव्हा काही शब्द उच्चारले की, सर्व समजल्यासारखे वाटतात. तसेच, माझ्यापुरते माझ्या विद्यार्थिदशेत प्रश्न सुटले. ज्या वेळी मी 'दोन ध्रुव' हे शब्द नव्या सामाजिक संदर्भात ऐकले व खांडेकरांच्या कादंबरीच्या मुख्यपृष्ठावर वाचले, तेव्हा हिंदुस्थानातील सर्व प्रश्नांचा मूळ आवाज मी त्या शब्दांत ऐकला. पृथ्वीचे दोन ध्रुव एकत्र येतील, की नाही, हे माहीत नाही. अर्थात येणार नाहीत. पण समाज-जीवनात निर्माण झालेले हे विषमतेचे दोन ध्रुव नाहीसे करणे हे मानवतेचे आजचे काम आहे. खांडेकरांनी हा विचार आपल्या साहित्यात मांडण्याचा त्या वेळी प्रयत्‍न केला, ही महत्त्वाची गोष्ट आहे.

भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक रूपे आहेत. लेखक हा बुहरूपी आहे, असे त्यांनीच म्हटले आहे. हे ललित साहित्य म्हणजे काय? ते कशासारखे आहे? त्यांनी आपल्या एका भाषणात सांगितले आहे की, ललित साहित्य अनंत व गंभीर अशा समुद्रासारखे आहे. सागर केव्हा, कशी रूपे घेतो, हे कळत नाही. कधी ओसरलेला असतो, तर कधी उफाळलेला, तर कधी शांत, तर कधी रौद्ररूप धारण केलेला. पण त्याच्या पोटात काय असते? पोटात कधी रत्‍ने असतात, तर कधी शार्क मासे. पोटात तळाशी तेलही असते. रत्‍ने असतात, म्हणून त्याला रत्‍नाकर म्हणतात. अशा अनेकविध रूपांत तो असतो.

लेखक या नात्याने भाऊसाहेब तसे बहुरूपी आहेत. त्यांनी गुजगोष्टी लिहिल्या आहेत. कथा लिहिल्या आहेत. भाषणे केली आहेत. टीकाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांची किती रूपे आहेत! कादंबरीकार ते नंतर झाले. कादंबरीकार म्हणून, 'ययाति' कार म्हणून, आज ते आमच्या डोळ्यांपुढे आहेत. मानवतावादी कलाकार हे जे त्यांचे रूप आहे, ते माझ्या मताने अतिशय महत्त्वाचे असे रूप आहे.

त्यांचे एक स्वप्न, जे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते, ते आठवते. त्यांनी सांगितले की, त्यांना एकदा स्वप्न पडले, 'स्वप्नात मी मंदिरात गेलो नाही, तर ग्रंथालयात गेलो, ग्रंथागारात मजला काही वाचायचे होते.' त्यांच्या मनात होते की, भासाचे 'उत्तर-रामचरित' वाचावे व व्हिक्टर ह्यूगोची 'ला मिझरेबल' वाचावी. 'हे ग्रंथ शोधण्यासाठी मी चाललो असताना पाठीमागून मला आवाज यायला लागला. पाठीमागे वळून पाहतो, तो राज्यशास्त्र, अर्थशास्त्र वगैरे अनेक शास्त्रे मला त्यांच्याकडे बोलावू लागली. मागे न फिरता तसाच पुढे गेलो. मला जे ग्रंथ हवे होते, ते शोधले.' त्यांनी सांगितले की, त्यांना फडक्यांचा आवाज ऐकू आला, अत्र्यांचा आवाज ऐकू आला. आचार्य अत्रे व प्रा. फडके बोलले, पुष्कळ हशा व टाळ्या झाल्या. त्यामुळे एकाएकी ते जागे झाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org