शब्दाचे सामर्थ्य १४४

काव्यातली गेयता ही रविकिरण मंडळाने, मला वाटते, जास्त स्पष्टपणे लोकांपुढे मांडली. नाटकांना अलीकडे जशी गर्दी होत असते, तशी यशवंतांच्या कविता ऐकण्यासाठी लोक त्या काळी हजारोंच्या संख्येने गर्दी करीत. काव्यगायन ऐकण्यासाठी पुण्या-मुंबईला तर माणसे जमतच असत. पण मला आठवते की, कवी गिरीशांची आणि यशवंतांची गीते ऐकण्यासाठी त्या काळी आम्ही मोठ्या संख्येने आमच्या लहानशा गावीही जमलो होतो. त्यांतल्याच एका ज्येष्ठ कवीने महाराष्ट्राच्या जीवाला आज एक वेगळी ओढ लावली आहे.

शिवाजी महाराजांच्या रूपाने अति भव्य असे एक चरित्र इतिहासाने आम्हांला दिले आहे. त्या चरित्राची मांडणी करण्याचे काम इतिहासकार आपल्या शब्दांनी करीत आहेत आणि कादंबरीकारही आपल्या शब्दांनी करतील. पण प्रतिभावान कवीच्या शब्दांमध्ये ते चरित्र रंगल्याशिवाय त्यातला खरा जिव्हाळा आपल्याला समजणार नाही; आणि म्हणून हे एवढे सुंदर चरित्र एका महाकवीची वाट पाहत उभे आहे, असे मी नेहमी म्हणत असे. यशवंतांनाही मी एकदा म्हणालो होतो की, अतिशय उत्कंठेने तुमच्या महाकाव्याची हे चरित्र वाट पाहत तिष्ठत उभे आहे. या ग्रंथाच्या पुरस्काराच्या छोट्याशा चार ओळींमध्ये माझी एक जुनी आठवण मी सांगितली आहे. १९६२ साली काही कामानिमित्त यशवंत मला भेटण्यासाठी मुंबईस आले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या मनातली पहिली हुरहुर मला सांगितली.

यशवंत प्रकृतीने थकलेले होते. पण इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलता-बोलता, ईश्वराने आयुष्य आणि आरोग्य दिल्यास शिवरायांचे चरित्रगीत रचण्याची आपली मनीषा त्यांनी मजजवळ प्रकट केली. त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांची - माझी गाठभेट होत असे, तेव्हा तेव्हा मी त्यांना त्यांच्या शिवकाव्यासंबंधी विचारीत असे. खरे म्हणजे, माझे हे विचारणे अन्यायाचे होते. परंतु जीव राहत नसे, म्हणून मी विचारीत असे, आणि तेही मोठ्या जिव्हाळ्याने झालेली प्रगती मला सांगत असत; आणि काही आठवड्यांपूर्वी जेव्हा त्यांचे हे ग्रंथलेखन पुरे झाले, असे त्यांनी मला लिहिले आणि त्याच्या प्रकाशनासाठी मला प्रत्यक्ष निमंत्रण दिले, तेव्हा त्यांचा जीव तर मोठा झालाच, पण माझाही जीव फार मोठा झाला. फार मोठा आनंद झाला त्या वेळी. आपले काव्य पुरे झाल्याबद्दल कवीला आनंद व्हावा, हे तर स्वाभाविकच आहे. परंतु माझ्यासारख्या त्यांच्या एका मित्रालाही अतिशय आनंद झाला. तो अशासाठी की, शिवाजीमहाराजांचे जीवन हे आपल्या मराठी जीवनातले जे एक भव्य आणि विशाल असे शिल्प आहे. ते आता महाकाव्याच्या रूपाने आमच्यासमोर उभे राहणार आहे.

बाबासाहेब पुरंदरे आणि कुसुमाग्रज यांनी मघाशी जे सांगितले, ते खरे आहे. शिवचरित्राने आम्हांला इतिहास दिला. या सह्याद्रीच्या डोंगखो-यातून आम्ही राहत होतो, शेती करीत होतो, कसबसे जीवन जगत होतो. आमच्यापैकी कोणी पांडित्य करीत होते, तर कोणी भाऊबंदकीच्या भांडणामध्ये गुंतले होते. हे सगळे चाललेले होते. परंतु इतिहासामध्ये मराठ्यांचा म्हणून जो इतिहास गाजला, त्याचा श्रीगणेशा ज्या जीवनातून लिहिला गेला, ते अति विशाल असे शिल्प होते. त्या शिल्पामध्ये सर्व काही आहे. त्यामध्ये एक प्रकारचे उत्तुंग यश आहे, त्यामध्ये शौर्य आहे, त्यामध्ये त्वेष आहे, त्यामध्ये प्रेम आहे आणि त्यामध्ये कारुण्यही आहे. कवीच्या मनाला जे जे गुण वेडावून सोडतात, ते ते सगळे गुण त्या जीवनामध्ये भरलेले आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org