शब्दाचे सामर्थ्य १४०

४८

धों. म. मोहिते

श्री. धों. म. मोहिते यांच्याबद्दल माझ्या अंतर्यामी एक प्रकारचा जिव्हाळा आहे आणि या जिव्हाळ्याचे मुख्य कारण म्हणजे, मोहित्यांचे वडगाव आणि माझे आजोळ देवराष्ट्रे ही सख्ख्या भावंडांसारखी एकमेकांशेजारी खेटून बसलेली गावे आहेत. मोहित्यांचे वडील महादू मास्तर मुंबईला गिरणगावात जाऊन नाव काढलेले कर्तबगार गावकरी होते. त्यांची 'मास्तर' ही पदवी शिक्षकाच्या पेशाची नव्हती. गिरणी-कामगारांमध्ये म्होरकेपण घेऊन जॉबर किंवा चीफ-जॉबर होणा-याला मास्तर ही पदवी प्राप्त होते. महादू मास्तर अशा नाव काढलेल्या कर्तबगारांतील प्रमुख होते. आपल्या पंचक्रोशीतील शेकडो लोकांना मुंबईला नेऊन रोजगार देण्याची किमया त्यांनी केली असल्यामुळे त्यांचा तसा दबदबाही त्या भागात होता. ग्रामीण जीवनात प्रस्थ असलेल्या महादू मास्तरांचे आमचे लेखक मोहिते हे चिरंजीव. घराची परिस्थिती तशी ब-यापैकी. गावात-भागात तसा थोडा-फार नावलौकिक. माझा अंदाज होता, की ठरावीक चाकोरीतील चळवळीत भाग घेऊन धोंडीराम आता कोणत्याही एका राजकीय पक्षाचा आपल्या भागातील 'पुढारी' होणार आणि त्या मैदानात त्यांची -आमची मुलाखत होणार; पण घडले उलटेच!

श्री. मोहिते आजही आपल्या शेतीचे काम करतात; गावातील सहकारी सोसायटीकडे लक्ष देतात. इतर सार्वजनिक कामांतही आपल्या शक्त्यनुसार आपला वाटा उचलीत असतात. परंतु राहिलेल्या वेळात ते अवती-भोवतीच्या जीवनात ऐकले, पाहिले, अनुभवले, ते सारे शब्दांकित करावे आणि इतरांना सांगावे, या त्यांच्या ऊर्मीतून लेखक मोहिते निर्माण झाला आहे. अनपेक्षितपणे काही वर्षांपूर्वी त्यांचा एक लेख मी 'किर्लोस्कर' मध्ये पाहिला, वाचला आणि तो मला आवडलाही. माझी भेट झाल्यानंतर त्यांना मी हे बोलूनही दाखविले. नंतर ते वारंवार लिहू लागले. आज त्यांच्याबद्दल लिहिताना मला खरोखरीच आनंद होत आहे.

'मुलाखतीच्या मैदानातून' ते पुस्तक नुकतेच मी वाचले. त्या पुस्तकामध्ये श्री. मोहिते यांनी आपल्या लेखांत जो परिसर रेखाटला आहे व जी प्रातिनिधिक व्यक्तिचित्रे रंगविली आहेत. त्या ग्रामीण जीवनासंबंधी माझ्या मनात तीव्र जिव्हाळा आहे. कृष्णा-कोयना आणि वारणा-वेरळा या नद्यांच्या खो-यांतील जनजीवनाच्या प्रवाहात, नाही म्हटले, तरी एक प्रकारचा अवखळपणा आहे. या अवखळपणाचे काही नमुने धोंडीराम मोहिते यांनी आपल्या लेखांद्वारे वाचकांपुढे ठेवले आहेत. हा अवखळपणा कधी पराक्रमी बंडखोरीची झेप घेतो, तर कधी गुन्हेगार फरारीपणाचे वळसे घेतो; कधी रंगेलपणाचे, तर कधी रगेलपणाचे रूप घेतो. पि-या मांग, पठ्ठे बापूराव, मोहन मोहिते ही व्यक्तिचित्रे हे स्पष्ट करतात. की जशी अवखळ चित्रे येथे आहेत. तशीच नदीच्या संथ डोहाप्रमाणे समाजजीवनाला सतत शक्ती देणा-या पुरुषार्थी जीवनाचे रेखाटनही यात आपल्याला सापडेल, कृषिपंडित, भीमगोंडा, मणिभाई देसाई, भाऊसाहेब साळुंखे यांची व्यक्तिचित्रे म्हणजे याचे नमुने आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात ग्रामीण जीवनात विधायक बदल करणा-या ज्या प्रेरणा क्रियाशील झाल्या आहेत, त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या त-हेने या पुस्तकात दिसते. त्यांनी आपल्या निवेदन-कौशल्याने व सहृदयतेने ही व्यक्तिचित्रे रंगविली आहेत. मला विश्वास आहे, की मराठी वाचकही या ग्रामीण लेखकाचे तितक्याच सहृदयतेने स्वागत करतील.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org