शब्दाचे सामर्थ्य १४


अविस्मरणीय घटना

टाळ आणि मृदंग यांच्या साथीचे संगीत भजन हा एक नवा प्रकार मला अनुभवायला मिळाला. काही दिवस ही भजने ऐकण्याचा छंदच मला लागला होता. पुढल्या काळात चैत्र-वैशाखांत गावोगावी होणार्‍या जत्रांच्या निमित्ताने होणारे तमाशांचे फड पाहण्याचाही छंद मी केला. आमच्या शाळेतील अशाच काही छंदी मित्रांची एक टोळीच बनली होती. खेड्यांतील तमाशे आणि कुस्त्या आवडीने पाहायचा हा नादच त्यांनी घेतला होता. देवराष्ट्राच्या निमित्ताने मला ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी माहिती असली, तरी या जीवनातील सांस्कृतिक बाजू या निमित्ताने समजून येऊ लागली. रामा कुंभार, सावळजचा तातोबा मांग आणि निसरे-नावडीचा एक तमासगीर-आज त्याचे नाव माझ्या लक्षात नाही - या तमासगिरांचे तमाशे आठ-दहा मैलांच्या अंतरावर जेथे असतील, तेथे पाहण्यासाठी आम्ही जात असू. त्या वेळी मी इंग्रजी शाळेत पाचवी-सहावीत असेन. शाळेतील संमेलनाच्या निमित्ताने एकदा बर्नार्ड शॉच्या‘डॉक्टर्स डायलेमा’ या नाटकातील एका प्रवेशातले काम मी केले होते. त्या निमित्ताने बर्नार्ड शॉ यांच्या नावाची ओळख झाली होती. या तमाशा बघायच्या माझ्या नादात बर्नार्ड शॉच्या नावाचा मजेदार उल्लेख मला नेहमी आठवतो.

कराडपासून स्टेशन रोडने स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका गावी असाच एक नामांकित तमाशा होणार होता. त्या गावातील आमच्या एका मित्राने आम्हांला जेवायचे निमंत्रण दिले होते, म्हणून आम्ही संध्याकाळी जायला निघालो. पाच-सहाजण होतो. आम्ही कृष्णा नदीची फरशी ओलांडून एक मैल गेलो असू, नसू, तो समोरून येणारे आमच्या शाळेचे शिस्तप्रिय ड्रिल मास्तर दिसले.
मी बरोबरच्या मुलांना सांगितले, की आपण कुठे जातो आहोत, हे जरी नक्की सांगितले नाही, तरी आपण मास्तरांशी मुळीच खोटे बोलायचे नाही.
माझ्या अपेक्षेप्रमाणे झाले. आम्हां मुलांना पाहिल्यावर मास्तरांनी विचारले, ‘कोठे चाललात, रे, एवढया संध्याकाळी?’
मी पुढे होऊन सांगितले.
‘आम्ही स्टेशनवर चाललो आहोत. तेथे टॉम शॉ येणार आहे. त्यांना बघायचे आहे.’
ड्रिल मास्तरांनी आम्हांला विचारले.
‘हा कोण टॉम शॉ ?’
मी त्यांना सांगितले,
‘हा बर्नार्ड शॉचा भाऊ आहे.'
आमचे उत्तर मास्तरांना पटलेले दिसले आणि ते म्हणाले,
‘जा जा, चांगले आहे.’

ते पुढे निघून गेल्यानंतर आम्हांला हसू आवरले नाही. हसत-खिदळत त्या मित्राच्या घरी पोहोचलो आणि त्याला ही कहाणी सांगितली, तेव्हा फारच मजा आली. ही सबंध रात्र आम्ही आमच्या मित्राच्या घरी घालविली.

नाटक कंपनीची नाटके मी मोठ्या हौसेने पाहत असे. ‘आनंदविलास नाटक मंडळी’ही आमच्या कराडला वर्ष-दीडवर्षाने भेट देत असे. मास्टर दीनानाथ मंगेशकर व रघुवीर सावकार या प्रसिद्ध नटांच्या कंपन्यांची नाटकेही कराडला होत. पिटातल्या स्वस्त तिकिटाच्या जागेत बसून मी ती सगळी नाटके मनमुराद पाहिली. रात्री नऊ-साडेनऊला नाटक सुरू व्हायचे, ते पहाटे तीन-चार वाजेपर्यंत चालू राहायचे.‘मृच्छकटिक’नाटक तर यापेक्षा अधिक वेळ चाले. त्यातली संगीताची मैफल तर फारच रंगत असे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org