शब्दाचे सामर्थ्य १३८

४६

शंतनुराव किर्लोस्कर

मराठी माणसाच्या मनासमोर 'किर्लोस्कर' शब्द उच्चारताच कृषि-क्रांतिकार्यातील कै. लक्ष्मणरावजींच्या 'किर्लोस्कर' नांगराचा सिंहाचा वाटा उभा राहतो. श्री. शंतनुरावजी किर्लोस्कर यांनी हा सिंहाचा वाटा नुसता पितृगत वारसा म्हणून न सांभाळता, आपल्या पराक्रमाने तो वाढीस लावून एक नवी औद्योगिक परंपरा निर्माण करून ठेवण्यात यश मिळविलेले आहे.

उद्योग, उत्साह व उत्कर्ष ही त्रयी कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी मराठी मनासमोर ठेवली. हा आदर्श कित्ता गिरवून, श्री. शंतनुरावांनी जे कार्य उभे केले आहे, ते त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे. ते स्वतः एक अनुभवी तंत्रज्ञ आहेत. तसेच, आपल्या गोड स्वभावाने अनेक कर्तबगार माणसे आपल्याभोवती संघटित करणारे ते कुशल संचालकही आहेत.

सातारा जिल्ह्याची सीमा ओलांडूनही शंतनुरावांच्या कर्तृत्वाने भारताच्या विभिन्न क्षेत्रांत, प्रदेशांत प्रवेश केला, एवढेच नव्हे, तर साता समुद्रांपलीकडेही पदार्पण करण्याची धमक आज त्यांच्यांत निर्माण झाली आहे.

मराठी मनाच्या आशाआकांक्षांना, संयुक्त महाराष्ट्र स्थापनेपासून एक वेगळेच वैशिष्ट्यपूर्ण वळण लागले. अशा समयी, संस्कृती व काळाचा संकेत समजून घेऊन श्री. शंतनुरावांनी सहजपणे पाऊल टाकून, लघु व मध्यम दर्जाच्या उद्योगांनाही साह्य केले, यामुळे महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकासाला हातभार लागला, हे विसरून चालणार नाही.

जेट युगातला मराठी माणूस कसा असावा, याविषयीच्या त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार खरोखरीच विचार करण्याजोगे आहेत. कर्तृत्ववान माणसासारखे मोलाचे जगात दुसरे कोणतेही अन्य भांडवल नाही. आम्ही परदेशांतून अत्याधुनिक यंत्र, तंत्र व व्यवस्थापन - पद्धतीचे आराखडे आयात करू शकतो. पण कर्तृत्ववान माणसे या देशातच तयार व्हायला पाहिजेत. प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक कुटुंबात त्यांची गरज आहे. अशी माणसे मिळाली, तर सर्वच कामे यशस्वी होतील.

नव्या पिढीने श्री. शंतनुरावांच्या जीवनापासून आत्मविश्वासाची प्रेरणा घेऊन, पावले टाकली, तर देशाच्या विकासाला निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास मला वाटतो. यापुढच्या काळात, पारिवारिक उद्योगसमूह ही कल्पना कालविसंगत ठरणार आहे. आर्थिक शक्तीच्या विकेंद्रीकरणाचा नवा विचार आज समर्थपणे उभा राहिला आहे. तो विचार यशस्वी करण्यासाठी, विधायक प्रयत्‍नांची गरज राहील. या प्रयत्‍नांना पूरक असे कार्य करण्याची शक्ती व दीर्घायुष्य श्री. शंतनुरावांना लाभो, अशी हार्दिक इच्छा त्यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी व्यक्त करतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org