शब्दाचे सामर्थ्य १२८

तीस वर्षांपूर्वी त्यांनी प्रथम त्यांच्या गावात, पद्‍माळ्याला, लिफ्ट इरिगेशनच्या कामाला हात घातला, तेव्हाची आठवण माझ्या मनात ताजी आहे. या सर्व कल्पना तेव्हा लोकांना नव्या व अनोख्या वाटत असत व लोक काहीसे बुजत-बुजत या कल्पनांकडे पाहत. दादांवर त्यांच्या गावातील सर्व लोकांचा जीव व विश्वास होता. त्यांनी त्यांना त्या कामात पाठिंबा द्यावयाचे मान्य केले व हे अवघड काम त्यांनी सुरू केले व शेवटी ते पूर्णही केले. मला आठवते, की दादा या कामाच्या शुभारंभासाठी अगत्याने मला घेऊन गेले. भारताच्या उज्ज्वल भविष्यकाळाची चित्रे पाहणा-या माझ्यासारख्या स्वप्नाळू माणसाच्या  भावना व विचारांना असे काम पाहून उधाण येत असे. त्या समारंभाच्या भाषणात तेव्हा मी बोलून गेल्याचे मला आठवते की, 'नदीच्या पात्रातून वाहणा-या कृष्णेच्या पाण्याला शतकानुशतक आपल्या काठांवर असलेल्या व तहानलेल्या काळ्या बहिणीची आठवण आज झाली. कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम हा निसर्गाने दिलेला संगम आहे. पण काळी जमीन व कृष्णा नदी यांचा झालेला आजचा संगम हा माणसाच्या कर्तृत्वाने घडलेला संगम आहे आणि म्हणून याला जास्त महत्त्व आहे. या कर्तृत्वाचे प्रतीक आमचे वसंतराव आहेत. दादांसारखी पाच-दहा माणसं साथीला असली, तर महाराष्ट्राच्या कर्तृत्वाला सोन्याचे पीक येईल.' त्या वेळी भाषणाच्या ओघात मी हे बोललो, हे जरी खरे असले, तरी मला वाटते, माझ्या अंतर्मनाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे केलेले हे मूल्यमापनच मी अनपेक्षितपणे बोलून गेलो होतो.

गेल्या तीस-पस्तीस वर्षांत अशी अनेक विकासाची कामे त्यांनी बांधण्याचा प्रयत्‍न केला. कधी त्यात अडचणी आल्या, संकटे आली, पण दादांनी विकासाची लढाई सोडली नाही. एकापाठोपाठ नवे प्रकल्प, नवे संकल्प ते करीत राहिले व केलेले संकल्प पूर्ण करणे हा तर दादांचा खरा बाणा. मी याआधी उल्लेख केला, तो मित्रभाव दादांच्या स्वभावाचा पैलू आहे. दादांची माणसांची पारख आणि पारखून मित्र केलेल्या माणसांची ते जी जपणूक करीत असतात, ते संघटनेतील अनेकांना शिकण्यासारखे आहे. माणसाबद्दल मूलतःच प्रेम व जिव्हाळा असल्याशिवाय ते धोरण अमलात आणता येणार नाही, हा जिव्हाळा दादांच्याजवळ आहे. आज मुख्यमंत्री म्हणून शेकडो माणसांच्या गराड्यात ते नित्य असतात. त्यांची चौकशी करण्यात, त्यांचे प्रश्न समजावून घेण्यात ते रममाण झालेले असतात. त्याचे मुख्य कारण हा जिव्हाळा.

गेल्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रासारख्या दर्जेदार राज्याचा कारभार कुशलतेने चालविण्यात जे यश त्यांनी मिळविले, त्याच्या पाठीमागे माणसांची पारख करण्याची त्यांची शक्ती, त्याचप्रमाणे, बिकट व कितीही गुंतागुंतीचा प्रश्न असला, तरी तो शांतपणे समजावून घेऊन, त्या प्रश्नाच्या मुळाशी भिडण्याची त्यांची कुवत ही आहे. शेतक-यांचा प्रश्न असू द्या. बिकट औद्योगिक प्रश्न असू द्या. तो ते शांतपणाने ऐकून घेतील. त्यानंतर त्याबाबतीत चौकसबुद्धीने व गंभीरपणे प्रतिप्रश्न करतील व मग स्वतःचे मत बनवतील. एकदा ते मत बनले, की ते इतके पक्के व शहाणपणाचे असते, की ते मत स्वतःला फार शहाण्या म्हणणा-या किंवा तज्ज्ञाला मान्य करून पुढे जावे लागेल. हे जे सर्व घडते, त्याचे कारण जे जीवनातील प्रत्यक्ष अनुभवांतून सर्व काही शिकले आहेत. ग्रंथांतून शिकविण्यासारखे पुष्कळ असते; पण जे जीवनातील ग्रंथांतून शिकतात, ते इतके पक्के शिकतात, की त्यांच्यापासून इतरांना पुष्कळ वेळा शिकावे लागते. दादा अशा शिक्षकांपैकी आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org