शब्दाचे सामर्थ्य ११५

३६

मधुकरराव चौधरी

मधुकररावांचे व्यक्तित्व राजकारणाच्या क्षेत्रात त्यांच्या विधायक कर्तृत्वाने सुप्रसिद्ध झाले आहे. परंतु त्याची तयारी ते त्यापूर्वीपासून करीत होते, असे म्हटले, तरी चालेल. मधुकररावांना मी प्रथम भेटलो, तेव्हा ते जळगाव जिल्ह्यातील सर्वोदय क्षेत्रात प्रमुख म्हणून कार्य करीत होते. त्यांची कामाची तळमळ, त्यात जीव ओतून रममाण होण्याचा त्यांचा स्वभाव मी पाहिला होता. सामान्य माणसाच्या शक्तींना उत्थान देऊन, त्याचे कर्तृत्व क्रियाशील करावे, अशी विलक्षण तळमळ त्यांच्या बोलण्या-वागण्यांतून निश्चित पाहिली होती. घराण्यात वडिलांची देशसेवेची आणि स्वातंत्र्यप्रेमाची परंपरा, यामुळे माझ्या मनावर जो परिणाम झाला, तो असा, की महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मोलाची भर घालणारा हा उमदा तरुण आहे आणि त्याला महाराष्ट्राच्या सेवेसाठी केव्हातरी निमंत्रण द्यावे. हा योगायोग १९५७ साली ज्यावेळी मी मुख्यमंत्री या नात्याने द्वैभाषिक मुंबई राज्याचे मंत्रिमंडळ बनवीत होतो, त्या वेळी आला. गेल्या बारा-तेरा वर्षांत त्यांनी क्रमशः आपल्या कर्तृत्वाची प्रभा वाढवत नेली आणि एका अर्थाने माझी अपेक्षा पूर्ण केली, याचे मला समाधान वाटते.

गेली पाच-सहा वर्षे महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणविभागाचे नेतृत्व श्री. मधुकरराव चौधरी यांचेकडे आहे. या काळात महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात नवे विधायक वातावरण निर्माण करण्यात ते निश्चितपणे यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत, गेल्या बारा-तेरा वर्षांत मंत्री या नात्याने विविध विभागांत त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. तथापि, मधुकररावांच्या कर्तृत्वाला सुयोग्य संधी शिक्षणविभागात लाभलेली दिसत आहे.

शिक्षण हे मानव जीवन सर्वार्थाने संपन्न करण्याचे महत्त्वाचे साधन आहे आणि या साधनाचा अभाव ही भारतीय इतिहासाची गेल्या अनेक शतकांची शोकांतिका आहे. लोकजीवन या साधनाने संपन्न व शक्तिशाली करण्याची अपूर्व संधी स्वातंत्र्यप्राप्तीमुळे मिळाली आहे व लहानसहान तांत्रिक विचारांची व अडचणींची पर्वा न करता धैर्याने शिक्षणाची लाट समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचविली पाहिजे. ही माझी श्रद्धा आहे. शिक्षणक्षेत्रातील सर्व कार्यक्रमांकडे पाहताना मी माझी ही कसोटी मानली आहे.
 
शिक्षणक्षेत्रात नवे कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी व नवे विचार व्यवहार्य पातळीवर समाजापुढे ठेवण्यासाठी अभ्यासपूर्वक सखोल तयारी करावी लागते. महाराष्ट्रासारख्या शिक्षणाची थोर परंपरा - व तीही शासनाबाहेरील कामाची असलेल्या राज्यात शिक्षण मंत्र्याचे काम स्वाभाविकपणेच अवघड झालेले आहे. परंतु या अवघड क्षेत्रातही मधुकररावांनी अवघ्या पाच-सहा वर्षांत लहानमोठ्या असंख्य कामांना चालना दिली आहे. कृतिशीलता हा त्यांचा मनोधर्म बनलेला दिसत आहे.

गुंतागुंतीच्या शैक्षणिक समस्यांची उकल श्री. चौधरी सहजतेने करतात. त्यांची वक्तृत्वशैली दमदार आहे. मराठी भाषेचा वापर ते अत्यंत समर्थपणे करतात. शिक्षणाचे तत्त्वज्ञान असो, कार्यक्रमांचा तपशील असो, शिक्षकांचे अगर शिक्षणसंस्थांचे प्रश्न असोत अगर शिक्षणाच्या आर्थिक जबाबदारीचा प्रश्न असो - या कोणत्याही बाबीवर मधुकरराव सारख्याच अधिकारवाणीने बोलताना दिसून येतात. तत्त्वज्ञान व तपशील यासंबंधी त्यांना सारखेच आकर्षण वाटते, असे आढळून येते. शिक्षणाचे धोरण ठरविण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर आहे, त्या व्यक्तीमध्ये जो समतोलपणा असावा लागतो, तो मधुकररावांमध्ये आहे, ही समाधानाची बाब आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय विकासाशी व सामाजिक परिवर्तनाशी शिक्षणाचा जो घनिष्ठ संबंध आहे, त्याची तीव्र जाणीव मधुकररावांना झालेली आहे. त्यामुळे वर ज्या कसोटींचा मी उल्लेख केला आहे, ती ते दृष्टीआड होऊ देणार नाहीत, अशी आशा आणि विश्वास मला आहे.

मधुकररावांनी संसदीय राजकारणाच्या धकाधकीच्या क्षेत्रात १९५७ साली प्रवेश केला, त्या वेळी त्यांचे वय अवघे सव्वीस-सत्तावीस असावे. स्वातंत्र्योत्तर काळात, नव्या समस्यांची जाणीव असणारे व त्या सोडविण्यासाठी जिद्दीने प्रयत्‍न करणारे जे विचारी व कर्तृत्वसंपन्न तरुण महाराष्ट्राच्या नव्या पिढीतून वर येत आहेत, त्यांत श्री. चौधरी यांचे स्वतःचे म्हणून एक स्थान आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला नवा आकार देण्यासाठी त्यांची जी धडपड चालू आहे, ती लक्षणीय आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org