शब्दाचे सामर्थ्य ११४

३५

यशवंतराव मोहिते

श्री. यशवंतराव मोहिते आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. यापूर्वी बरीच वर्षे त्यांनी महाराष्ट्राचे सहकारमंत्री म्हणून काम केले आहे. गेली सोळा-सतरा वर्षे ते राज्यकारभाराच्या क्षेत्रात कुशलतेने क्रियाशील आहेत. या सर्व कारणांमुळे यशवंतरावांचे व्यक्तित्व मोहरून आले आहे. परंतु यशवंतराव मोहिते यांचा मूळ पिंड हा विचारवंताचा आहे. लोकशिक्षण करावे, अशी मनीषा असलेल्या कार्यकर्त्याचा आहे. ते पट्टीचे, तसेच दमदार वक्ते आहेत. आपल्या विषयाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ते बोलत नाहीत आणि बोलताना विषयाची मूलग्राही, तर्कशुद्ध मांडणी करण्याची त्यांची सवय आहे. यामुळे वक्तृत्व व विषयमांडणी यांमध्ये त्यांचे एक विशिष्ट व्यक्तित्व व त्यांची शैली यांचे दर्शन होते.

श्री. यशवंतराव मोहिते हे राजकारणाच्या प्रांगणात उतरले, ते शेतकरी-कामकरी पक्षाचे नेते म्हणून आणि तेही अगदी तरुण वयात. त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सहवासात त्यांना राहावे लागले असले, तरी त्यांनी स्वतःचे असे व्यक्तिमत्त्व घडविले आहे. स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे, हे त्यांनी त्या पक्षातही सिद्ध केले होते व ज्या वेळी, ज्या समाजवादाच्या प्रस्थापनेसाठी शेतकरी-कामकरी पक्षाची स्थापना झाली, त्याची खरी पूर्तता काँग्रेस पक्षात गेल्यावरच होईल, असे वाटले, त्या वेळी त्यांनी काँग्रेस पक्ष स्वीकारला. आज त्यांनी समाजवादावर निष्ठा असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरापुढे केलेले भाषण प्रबंधरूपाने प्रसिद्ध झाले आहे. ते मी नुकतेच वाचले. श्री. यशवंतराव मोहिते आपल्या भाषणात जसे बोलले, तसेच या ग्रंथात उतरविले आहे. त्यांनी कदाचित लिहिण्याचा प्रयत्‍न केला असता, तर हाच प्रबंध वेगळ्या पद्धतीने मांडला गेला असता, असे मला वाटते. भाषणात, विषय मांडण्यात काही मर्यादा असतात, त्या स्वाभाविकपणे यात स्पष्ट होतात, परंतु हे अपरिहार्य आहे.

काँग्रेस हा प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा बांधील पक्ष (Cadre Based Party) व्हावा, अशा दृष्टीने काही केले पाहिजे, या जाणिवेतून हे शिबिर व हे भाषण यांचा जन्म झाला आहे. काँग्रेस याच स्वरूपाचा पक्ष होईल, की नाही, हा चर्चेचा व वादाचा प्रश्न आहे. परंतु काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचे वैचारिक शिक्षण झाले पाहिजे, यासंबंधी मतभेद नाहीत. आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीही असे संघटित प्रयत्‍न फार मोठ्या प्रमाणात करीत आहे. काँग्रेसचे मूळ स्वरूप जनआंदोलनाचे आहे. माझ्या मताने हिंदुस्थानच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांच्या संदर्भात त्याचे स्वरूप आणखी कित्येक वर्षे असेच राहील आणि तसेच राहणे आवश्यकही आहे. जनआंदोलनाच्या स्वरूपाची मीमांसा स्वीकारली, म्हणजे मग केडर (Cadre) बद्ध पक्षांशी काँग्रेसची तुलना करण्याचा मोह आवरावा लागतो. या दृष्टीने मी याचा इथे उल्लेख करीत आहे.

श्री. मोहिते यांची राजकीय वाढ ही डाव्या राजकारणाच्या हवेमध्ये झाली आहे. त्यामुळे स्वाभाविकच मार्क्सवादाची चर्चा त्यांच्या भाषणात अपरिहार्य होते. मार्क्सवादाच्या मर्यादा या शतकाच्या उत्तरार्धात सुस्पष्ट होऊ लागल्या आहेत. तरीही ही गोष्ट कबूल केली पाहिजे, की मार्क्सवादाच्या आधाराने अनेक प्रश्नांची मीमांसा, राजकीयदृष्ट्या स्पष्ट व्हायला मदत होते आणि त्यामुळे मार्क्सवाद हा आजच्या जगातील राजकीय विचार, जीवनाचा ब-याच अंशी अंगभूत असा भाग झाला आहे. मार्क्सवादाचा अभ्यास माझ्या राजकीय जीवनात मला उपयोगी पडला आहे. मार्क्सवादाच्या अध्ययनामुळे आज त्याच्या मर्यादाही समजण्यास मदत होते. वर्गसंघर्षावर आधारित अशा विकासवादावर मार्क्सवाद आधारलेला आहे. या नजरेने परिशीलन केले, म्हणजे मानवजातीच्या इतिहासाच्या घडामोडीचे स्वरूप स्पष्ट होऊ लागते. हिंदुस्थानच्या राजकारणातील संघर्ष समजण्यास या विचारसरणीची मदत घेतली जाणे स्वाभाविकच आहे. ज्या जनआंदोलनाचे ध्येय समाजवाद आहे, अशा काँग्रेसला या विचाराने थोडी-फार वाट पुसावी लागली, तर त्यात आश्चर्य नाही. मात्र हिंदुस्थानच्या विशिष्ट परिस्थितीत गांधी व नेहरू यांच्या विचारदर्शनाने निर्माण झालेल्या या नव्या युगात मार्क्सवादाच्या मर्यादाही समजू लागल्या आहेत. हिंदुस्थानचा समाजवाद हा हिंदुस्थानच्या परिस्थितीला पोषक असा भारतीय चेह-या - मोह-याचाच असला पाहिजे, अशी इतरांप्रमाणे माझीही श्रद्धा आहे आणि श्री. यशवंतराव मोहितेही हाच विचार मांडतात.

श्री. यशवंतराव मोहिते यांनी आपल्या या प्रबंधात अनेकविध प्रश्नांचा विचार केला आहे आणि आपली विचारपूर्वक बनविलेली मते मांडलेली आहेत. महाराष्ट्रीय कार्यकर्ते व विचारवंत यांना या पुस्तकाची दखल घ्यावी लागेल, इतक्या मोलाचे ते आहे, असे मी जरूर म्हणेन. असे महत्त्वपूर्ण विचारप्रधान पुस्तक जनतेच्या हाती दिल्याबद्दल मी श्री. यशवंतराव मोहिते यांचे पुन्हा अभिनंदन करतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org