शब्दाचे सामर्थ्य ११२

३३

उद्धवराव पाटील

महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील एका आघाडीचे कार्यकर्ते म्हणून श्री. उद्धवराव पाटील यांना गेली जवळ जवळ तीस वर्षे मी पाहतो आहे. १९४८-४९ मध्ये शेतकरी कामकरी पक्ष त्याच्या पहिल्या उमेदीत पक्षबांधणीचे व वाढीचे काम मोठ्या नेटाने करीत होता, तेव्हा श्री. उद्धवराव त्या पक्षाचे तरूण कार्यकर्ते होते व मराठवाड्यातील जिल्ह्यांत त्यांनी आपल्या कामाचा पसारा बराच वाढविला होता. त्या पहिल्या काळात शेतकरी कामकरी पक्षाला तोंड देण्याची गरज आम्हां मुंबई राज्यातील कार्यकर्त्यांना वाटली नाही. पण उद्धवराव मुळचे सोलापूर जिल्ह्याचे. त्यामुळे त्यांचा परिणामकारक प्रचार सोलापूर जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचला होता. या एका प्रादेशिक पक्षाशी मुकाबला करण्याचे काम काँग्रेस पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्रातील मंडळी करीत होतो. त्या संदर्भात उद्धवरावांचे नाव व कीर्ती ऐकली होती.

श्री. उद्धवरावांचा व माझा वैयक्तिक संबंध संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी ते द्वैभाषिक राज्यात आपल्या जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून आले, त्या वेळी आला. मी माझ्या पक्षाचा पुढारी होतो व उद्धवराव विरोधी पक्षाचे नेते होते. खरे म्हणजे, ते एक मैत्रीचे नाते आहे. विरोधी पक्षाचा नेता व राज्यकर्त्या पक्षाचा नेता यांचे संबंध लोकशाहीत वैयक्तिक विरोधी भावनांच्या कक्षा ओलांडून पुढे गेले नाहीत, तर लोकशाही नीट चालणार नाही. त्या वेळी विधानसभेचे काम मोठ्या अटीतटीने चालत असे. श्री. उद्धवराव आपल्या पक्षाचे नेतृत्व परिणामकारक करताना मी पाहिले आहे. तसा त्यांचा स्वभाव अतिरेकी नाही. आपल्या म्हणण्याला काही तात्त्विक बाजू आहे, अशा पद्धतीने ते आपले विचार मांडीत असत. ते परखड बोलत असले, तरी त्यात कडवटपणा व वैयक्तिक टीकेचा भाग दिसून आला नाही. या निमित्ताने त्यांच्याशी सभागृहाबाहेर भेटण्याचा व चर्चा करण्याचा प्रसंग काही वेळा आला. त्यावेळी त्यांची मित्रत्वाची भावना ठेवण्याची वृत्ती उत्कटतेने पाहिली.

त्यांच्या अंतरंगात शिरून त्यांचे मित्र होणे इतके सोपे नव्हते. कारण त्यांच्या राजकीय मतांच्या रेषा इतक्या स्पष्ट असत, की त्या ओलांडून त्याचे वैयक्तिक स्वरूपात रूपांतर करणे फार कठीण असे. मी त्यांच्यावर ते ठसविण्याचा प्रयत्‍न करीत असे, की आमच्या पक्षातील मराठी माणसे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या विचाराची आहेत, परंतु राजकीय वास्तविकता लक्षात घेऊन, मुंबईचा प्रश्न किती कुशलतेने सोडविला जाईल, याच्यावर त्याचे यश अवलंबून आहे. उद्धवराव म्हणायचे, की तुमच्या या गोड शब्दांमध्ये आम्ही गुंतून जाऊ इच्छीत नाही आणि राजकीय मुद्यांची चर्चा सोडून इतर खासगी गोष्टी सुरू करीत.

अत्यंत नेकीचा आणि पक्षाच्या कार्याला वाहून घेतलेला कार्यकर्ता व नेता हे उद्धवरावांचे वर्णन उचित ठरेल. राजकारण सोडून इतर गप्पांचा अड्डा असला, तर त्यात ते रमून जातात. पान-तंबाखू खाऊन झाले, की ते इतके रंगून जातात, पण राजकीय प्रश्न आला, की त्याच्याशी अंतराय निर्माण होऊ देत नसत. पुढे ते दिल्लीलाही राज्यसभेचे सभासद म्हणून निवडून आले. माझ्या आठवणीने ते लोकसभेतही निवडून आले होते. पण दिल्लीच्या संसदीय कामात त्यांनी फारसा रस घेतला नाही.

मी त्यांना एकदा विचारले की, मुंबई गाजवीत होता, दिल्लीत दुर्लक्ष का? ते म्हणायचे मन, लागत नाही, रस येत नाही. खरे म्हणजे, त्यांची प्रश्नांची जाण इतकी चांगली आहे, की ज्या निष्ठेने त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न हाताळले, त्याच जाणिवेने राष्ट्राचे प्रश्न हाती घेतले असते, तर देशवासीयांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव झाली असती. पण त्यांनी असे केले नाही, याचे कोडे मला अजून उलगडले नाही. राजकीय पक्षाचे काम किती निष्ठेने करावे व आपले व्यक्तिमत्त्व मागे ठेवून, पक्षाच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशा प्रकारचे समर्पित जीवन जगणारे ते नेते आहेत. उद्धवरावांची शेतकरी व कामगारांसंबंधीची मानसिक ओढ मोठी तीव्र आहे.

आज जो उद्धवराव पाटील यांचा गौरव करण्यात येत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वासंबंधी व नेतृत्वासंबंधी या निमित्ताने चार शब्द लिहिता आले, याचा मला आनंद आहे.

श्री. उद्धवरावांना माझ्या शुभेच्छा.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org