शब्दाचे सामर्थ्य १११

नागरी खात्याचे पुरवठा मंत्री म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीत भाऊसाहेबांनी सहा-सात वर्षे दक्षतेने काम पाहिले. हे काम पाहत असताना त्यांना अनेक वेळा कठोर विपर्यस्त टीकेला तोंड द्यावे लागले. पुरवठा खात्याला पडणा-या परिस्थितीच्या मर्यादा उल्लंघून जाण्याचे भाग्य कोणत्याही पुरवठा मंत्र्याला अलीकडच्या काळात लाभलेले नाही. भाऊसाहेबही याला अपवाद नाहीत. अशा परिस्थितीत ज्या कर्तव्यबुद्धीने त्यांनी या खात्याचा व्याप दीर्घकाळ सांभाळला, त्याचे मूल्यमापन सहानुभूतीने व समजुतदारपणे होण्याची गरज आहे. तसे ते झाले नाही, हा एक दैवदुर्विलासच म्हटला पाहिजे. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या वेळीही त्यांनी असेच मोलाचे आणि त्यांच्या कर्तृत्वशक्तीची प्रचीती आणून देणारे काम केले आहे. परिस्थितीची अनुकूलता दुर्दैवाने भाऊसाहेबांना लाभली नाही, म्हणून केवळ त्यांनी नेटाने केलेल्या कार्याचे महत्त्व कमी ठरत नाही.

गेल्या तीस-पस्तीस वर्षांच्या काळात भाऊसाहेबांनी विविध क्षेत्रांत केलेले विधायक काम महाराष्ट्रातील थोर, निःस्वार्थी समाजसेवकांच्या परंपरेत शोभणारे असेच आहे. त्यांच्या षष्ट्यब्दपूर्तीच्या निमित्ताने भाऊसाहेब षष्ट्यब्दपूर्ती सत्कार समितीने 'जीवनधारा' हा गौरवग्रंथ प्रकाशित करून त्यांच्या कार्याचे आणि त्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे एक सुंदर दर्शन घडविले आहे, त्याबद्दल सत्कार समितीचे मी अभिनंदन करतो. भाऊसाहेबांनी केलेले कार्य हे राष्ट्राच्या प्रगतिपथावरील एक पाऊल आहे. अशा एक एक पावलाने राष्ट्राच्या प्रगतीचा गाडा पुढे सरकत असतो आणि म्हणून 'जीवनधारा' च्या रूपाने भाऊसाहेबांच्या महत्त्वपूर्ण कार्याची नोंद घेण्यात समितीने मोठे औचित्य साधले आहे.

भाऊसाहेबांची आजही काम करण्याची तडफ पाहिली, त्यांचा दुर्दम्य उत्साह पाहिला, म्हणजे भाऊसाहेबांच्या वयाला साठ वर्षे पुरी झाली आहेत, यावर विश्वास बसत नाही. कर्तव्यपूर्तीचा आनंद हा एक जीवनातील महत्त्वाचा निकष मानला, तर नियतीने भाऊसाहेबांच्या पदरात यशाचे भरपूर माप टाकले आहे, असे मी म्हणेन. असे यश ही पुढच्या यशाची पायरी असते. भाऊसाहेबांनी आतापर्यंत मिळविलेले यश त्यांना अधिक समृद्ध यशाप्रत नेवो आणि त्यांचे पुढील जीवन दीर्घायुरारोग्यसंपन्न होवो, अशी सदिच्छा मी या शुभ प्रसंगी व्यक्त करतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org