शैलीकार यशवंतराव ९८

व्यक्तिचित्रे, शब्दचित्रे यांच्याच पंक्तीस बसणारे आणखी काही नवे प्रकार मराठी साहित्यात रूढ होऊ पाहात आहेत.  एकसष्टी, अमृतमहोत्सव, श्रेष्ठ व्यक्तींच्या गौरवार्थ ग्रंथ प्रकाशन यांसारख्या नैमित्तिक प्रसंगानुसार लेखक प्रत्यक्ष जीवनातील एखाद्या व्यक्तीचे विविध अनुभवांचे चिंतन व त्या चिंतनाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष अनुभव, जसे रूप होईल तसेच रूप साहित्यात उतरविण्याचा प्रयत्‍न करतो.  यशवंतरावसुद्धा प्रत्यक्ष जीवन जगत असताना ज्या व्यक्ती भेटल्या, जे अनुभव आले, त्या अनुभवांच्या आधारे त्यांनी व्यक्तिचित्रणात्मक लेखन केले आहे.  अशा कितीतरी व्यक्तिचित्रणात त्यांनी विविधता आणि सजीवता निर्माण केली आहे.  ''व्यक्तिचित्र म्हणजे व्यक्तीच्या कार्याचा कोरडा परिचय किंवा तिच्या कार्याचे विवेचनात्मक वर्णन नव्हे.  कार्याचा परिचय हवाच, पण तो केवळ माहितीवरून नसावा.  त्याची मांडणी एखाद्या शलाकाचित्राप्रमाणे कलात्मक पद्धतीने केलेली, आटोपशीर व सुबक असावी.  यशवंतरावांच्या व्यक्तिचित्रात्मक लेखनाचे स्थान असेच अनन्यसाधारण आहे.  यशवंतरावांनी लिहिलेली ही व्यक्तिचित्रे सामान्य उपेक्षित व्यक्तिपासून ते महान श्रेष्ठ विभूतींची आहेत.  समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यकार, राजकारणी, अध्यापक, लेखक आणि तळागाळातील उपेक्षित या सर्वांना यशवंतरावांच्या लेखणीने सारखाच न्याय दिला आहे. 

यशवंतरावांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे

यशवंतरावांचे संपूर्ण जीवन हे लोकसमुदायात, माणसांच्या गोतावळ्यात गेले.  त्यामुळे थोरामोठ्यांचे भेटीगाठीचे प्रसंग, माणसांच्या स्वभावाचे विविध नमुने, माणसांच्या जीवनातील सुखदुःख माणसांचा विक्षिप्‍त स्वभाव, माणसांचा रागलोभ, ध्येय-मूल्ये इत्यादींची सूक्ष्मनिरीक्षणे, त्यांच्या व्यक्तिचित्रणात येतात.  पण हे व्यक्तिचित्रात्मक लेखन प्रसंगोपात झालेले आहे.  विशेषांक, दैनिके, ग्रंथ, प्रस्तावना, शताब्दीनिमित्त, वाढदिवसानिमित्त, स्मरणग्रंथासाठी, षष्ट्यब्दीपूर्तिनिमित्त, स्मृतिदिनानिमित्त, शिबिरातील भाषणे, सत्कारसमारंभातील केलेले अध्यक्षीय भाषण, ग्रंथप्रकाशन समारंभप्रसंगी केलेले भाषण, कधी त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातील एखाद्या स्मरणीय घटनेच्या निमित्ताने, कधी दुःखद प्रसंगाच्या वेळी तर आयुष्यात कळत नकळत त्यांच्या मनावर प्रभाव टाकणार्‍या व आयुष्य समृद्ध करून गेलेल्या अशा अनेक व्यक्तींची चित्रणे यशवंतरावांनी चितारली आहेत.  व्यक्ती जशा अनेक तसेच लेखनाचे निमित्तही वेगवेगळ आहे.  त्यांच्या जीवनात ज्या व्यक्ती आल्या आणि ज्यांना पाहिले, ज्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला, ज्यांच्यासंबंधी वाचले अशासंबंधी स्वतःच्या अनुभूतीतून आणि विचारांच्या सहाय्याने यशवंतरावांनी भावना चित्रित केल्या आहेत.

यशवंतरावांचे व्यक्तिचित्रात्मक स्वरूपाचे लेखन त्यांच्या ॠणानुबंध, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, विदेश दर्शन, युगांतर, यशवंतराव चव्हाण :  शब्दांचे सामर्थ्य, यशवंतराव चव्हाण विधिमंडळातील भाषणे खंड-१ ला तसेच नियतकालिके, मासिके, विशेष अंक इत्यादीतून प्रकट झालेली आहेत.  यामध्ये विविध क्षेत्रांतील माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यांच्या गुणावगुणांसह स्पष्ट केली आहेत.  असे असले तरी यशवंतरावांचा स्वतंत्र असा व्यक्तिचित्रात्मक संग्रह त्यांच्या नावे एकही नाही.  पण इतस्ततः विखुरलेल्या स्वरूपातील त्यांचे या वाङ्‌मयप्रकारातील लेखन मात्र पुष्कळ आहे.  त्याचीच गोळाबेरीज त्यांच्या व्यक्तिचित्रात्मक साहित्यप्रकारामध्ये करता येईल.  व्यक्तिचित्रणाचा विचार करताना मागील चरित्रात्मक-आत्मकथनात्मक लेखनातील प्रसंग आणि घटना यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.  कारण यशवंतरावांनी काल्पनिक पात्रांची निर्मिती करून व्यक्तिचित्रण केलेले नाही.  आप्तांच्या जीवनात घडलेल्या घटनाधारे, भेटलेल्या संस्मरणीय व्यक्तींची चित्रे त्यांनी रेखाटली आहेत.

यशवंतरावांनी काही घटना, प्रसंगांच्या साहाय्याने मोजक्या शब्दसंगतीच्या आधारे माणसाच्या स्वभावाचे दर्शन घडविले आहेच; पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन त्या त्या व्यक्तीमधील 'माणूस' आणि त्याला घडविणारी किंवा त्याभोवती असलेली 'परिस्थिती' या दोहोंचे उत्कट दर्शनही देतात.  'कुलसुमदादी' सारख्या सामान्य व्यक्तीचेही अत्यंत प्रत्ययकारी असे व्यक्तिचित्र रेखाटले आहे.  यशवंतराव चव्हाणांच्या आजोळच्या देवराष्ट्र गावची ही मुसलमान कुटुंबातील यशवंतरावांच्या आजीच्या वयाची स्त्री.  ती त्यांच्या आजीची मैत्रीण होती.  त्या एकमेकींचा खूप जिव्हाळा होता.  जातीपातीची बंधने त्या ठिकाणी गौण होती आणि प्रेमाचा झरा त्यांच्या हृदयात ओतप्रोत भरलेला असे.  यशवंतरावांचे लहानपण आपल्या मामाच्या गावी खेळण्याबागडण्यात घालवताना त्यांना या कुलसुमदादीविषयी जे प्रेम निर्माण झाले, जो जिव्हाळा निर्माण झाला, जी स्वभाववैशिष्ट्य दिसली ती त्यांनी शब्दांत अंतःकरणापासून रेखाटली आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org