शैलीकार यशवंतराव ९५

यशवंतरावांच्या चरित्रलेखाइतकेच त्यांचे मृत्यूलेख स्मरणीय आहेत.  अभ्यासनीय आहेत.  सर्वसाधारण परिचितांवर मृत्यूलेख लिहिणे तसे अवघड काम आहे, तसेच मान्यवर अथवा सर्वज्ञात व्यक्तीवर लिहिणे ही कठीण आहे.  दुःखद प्रसंगाच्या वेळी शब्दाला वाचा फोडणे तसे अवघडच.  त्यासाठी मनाची मूस वेगळी असावी लागते.  मनाजवळ स्थितप्रज्ञतेची एक कडा असणे इष्ट असते.  तशी व्यक्तीच असे लेखन करू शकतात.  अशा लेखांमध्ये त्या व्यक्तीच्या जीवनाचे आणि कार्याचे मूल्यमापन करताना केवळ त्यांच्या चरित्रामधल्या प्रसंगांची जंत्री देऊन भागत नाही, तर तो ज्या राजकीय, सामाजिक अथवा वाङ्‌मयीन प्रवृत्तींचा प्रतिनिधी असेल त्याचे अत्यंत रसपूर्ण आणि मार्मिक विश्लेषण लेखकाला करावे लागते.  यशवंतरावांनी त्या अनुषंगाने मृत्यूलेखांची मांडणी केली आहे.  यशवंतरावांचे काही मृत्यूलेख 'करुण रम्य काव्य' बनतात.  'पापण्यात गोठविली मी नदी आसवांची' हा त्यांचा लेख असाच आहे.  या लेखात ग.दि.माडगूळकरांच्या जीवनकार्याचा परामर्श घेतला आहे.  ''सिनेमाच्या लखलखत्या दुनियेत राहूनही ज्याने आपली शालीनता, संस्कृती सोडली नाही, राजकारणात असूनही ज्याने पक्षबाजी केली नाही, आपत्तींना तोंड देतानाही ज्याने कटुता येऊ दिली नाही, धार्मिक परंपरांचा अभिमान बाळगूनही ज्याने गायन, संगीत, सिनेमा आदी कलाक्षेत्रातून मनाने संचार केला, असा एक श्रेष्ठ साहित्यिक, निखळ आनंद देणारा मित्र गेला.  फार लवकर गेला, न सांगता सवरता गेला.  त्याचे दुःख न संपणारे, न ओसरणारे आहे.''  यशवंतरावांनी नेमक्या शब्दांत ग.दि.माडगूळकरांचे वर्णन येथे केलेच आहे शिवाय यातून त्यांची चरित्ररेखाही साक्षात केली आहे.  ग.दि. माडगूळकरांचे प्रिय व्यक्तिमत्त्व, त्यांची शब्दसिद्धी, शब्दसुष्टीतील त्यांचे कर्तृत्व, रसाळ शब्द, लेखणीतील सहजता, सामाजिक जबाबदारी सांभाळणारा कार्यकर्ता, कौटुंबिक जबाबदारी पार पाडणारा कुटुंबप्रमुख, उत्तम मित्र, उत्तम कवी, गीतकार अशी नानाविध रूपे यशवंतराव स्पष्ट करतात.

यशवंतरावांनी विपुल प्रमाणात मृत्युलेख लिहिले आहेत.  छोट्या-मोठ्यांची गणती करणे थोडे कठीणच जावे एवढी त्यात विपुलता आहे.  ग. त्र्यं. माडखोलकरांच्या संदर्भात ते लिहितात, ''भाऊसाहेब पहिल्या श्रेणीचे साहित्यिक, टीकाकार, पत्रकार आणि साहित्य व समाजजीवनाच्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते होते.  त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेले नुकसान भरून येण्यासारखे नाही.  विशेषतः भाऊसाहेब खांडेकरांच्या निधनानंतर भाऊसाहेब माडखोलकरांच्याही निधनाने महाराष्ट्र सारस्वताचा रत्‍नकोश जास्तच दरिद्री झाल्यासारखा भासतो आणि माडखोलकरांच्या निधनाचे दुःख जास्तच जाणवते.''  यशवंतरावांना ही माणसे हयात असायला हवी असे वाटते.  मृत्यूने त्यांच्यावर घाला घालायला नको होता असे वाटते.  यातूनच माडखोलकरांच्या संबंधी त्यांच्या आठवणी ते सांगतात.  शिवाय त्यांचे चरित्रही ते स्पष्ट करतात.  मराठी राजकीय कादंबरीकार, राजकीय नेत्याशी असणारा त्यांचा घनिष्ठ संबंध, लेखनाला असलेली अनुभूतीची जोड, एखाद्या विषयाला हात घालण्याची हातोटी, दलित समाजाबद्दलची त्यांची आस्था, बोलण्याचालण्यातला दिलदारपणा, त्यांचे रसिकत्व, संगीताची आवड, विविध कलांची आस्वादकता, स्पष्टवत्तेफ्पणा अशी विविध स्वभाववैशिष्ट्ये ते स्पष्ट करतात.  यशवंतराव भाऊसाहेब हिरे यांच्याबद्दल लिहितात, ''कै. भाऊसाहेब हिरे यांचे जीवन अनेक कामांनी भरलेले आहे.  त्यांच्या कोणत्या कामाला महत्त्व द्यावे आणि कोणत्या कामाला गौण लेखावे हेच समजत नाही.  त्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये फार मोलाची कामगिरी केली आहे.''  माजी राज्यपाल डॉ. सुब्बरायन यांच्या दुःखद निधनाबद्दल लिहितात, ''कै. डॉ. सुब्बरायन हे जुन्या पिढीतील एक अत्यंत कर्तबगार आणि बुद्धिमान ऍडव्होकेट.''  असा त्यांचा उल्लेख करतात.  डॉ. श्रीधर बाळकृष्ण मांडजेकर, श्री. महादेव तुकाराम ठाकरे, माजी दारूबंदी उपमंत्री डॉ. भास्कर पटेल यांसारख्या कर्तृत्वपूर्ण व्यक्तींच्या कारकीर्दीबाबत यशवंतराव गौरवोद्‍गार काढतात.  यशवंतरावांनी या मृत्युलेखातून त्या व्यक्तिमनाला महत्त्व दिलेले आहे.  शिवाय घटना प्रसंगातून, अनुभव कथनातून या चरित्ररेखा अधिक गडद केल्या आहेत.  या चरित्रलेखातून भावस्पर्शी असे त्या चरित्रनायकाच्या जीवनाचे दर्शन घडवतात.  म्हणून यशवंतरावांच्या या लेखांबद्दल असे म्हणता येईल की सहृदयतेने, उत्कटतेने, लिहिणारा यशवंतरावांसारखा साहित्यिक अपवादानेच आढळेल.  यशवंतरावांच्या या चरित्रलेखनाची थोरवी कोणत्या मापन पद्धतीने मोजता येईल ?  किंवा या चरित्रलेखांची महती कशी ठरवता येईल याबाबत मतमतांतरे असू शकतात.  पण एक महत्त्वाची बाब अशी की या चरित्रलेखनात वास्तव लेखनाचे पूर्ण पथ्य पाळले आहे.  शिवाय काव्यविरहित चरित्रलेखन केल्याने या लेखनास एक वेगळेपणा प्राप्‍त झाला आहे.  यशवंतरावांच्या चरित्रलेखापासून बोध मिळतो हा अगदी प्राथमिक हेतू झाला.  चरित्रलेख वाचनाने बोध व्हावा की आनंद व्हावा की दोन्हीही व्हावे याविषयी खूप चर्चा करता येईल.  पण या लेखातील चरित्रनायकाची थोरवी कोणत्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून आहे ?  चरित्रनायक जगला कसा, त्याचे कर्तृत्व कोणत्या हिमतीवर आधारलेले आहे ?  त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान कोणते ?  या प्रश्नांची उत्तरे शोधता येणे आवश्यक आहे.  चरित्रनायकाच्या जीवनाचे धागेदोरे उलगडून दाखवताना चरित्रनायकाच्या अंतर्मनातली विविध आंदोलने, खळबळ, त्याचे दृष्टिकोन यांचा मागोवा घेता आला पाहिजे.  यशवंतरावांनी त्यांच्या या चरित्रलेखनाद्वारे असा मागोवा घेण्याचा निश्चित प्रयत्‍न केला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org