शैलीकार यशवंतराव ९३

चरित्रात्मक लेखन हा माणसांचा इतिहास असतो.  त्यामुळे इतिहासाप्रमाणे चरित्रलेखनही प्रत्यक्ष घटनेला धरूनच असावे लागते.  तसेच चरित्रात्मक लेखनामध्ये घटना-वर्णनांची नुसती साखळी असून चालत नाही तर त्या चरित्रलेखकांचे त्या घटनांमागील मन बघितले पाहिजे.  यासाठी चरित्रलेखकांनी चरित्रनायकांची मने जाणून घेतली पाहिजेत.  'प्रकाशाचा लेखक' या लेखात वि.स.खांडेकरांचा व्यक्तिविमर्श असाच त्यांचे मन जाणून घेऊन यशवंतरावांनी केलेला आहे.  वि.स.खांडेकर यांच्या खासबाग येथील ज्ञानपीठ पुरस्कार सत्कार समारंभाच्या वेळी यशवंतरावांनी जे कृतज्ञतेचे भाषण केले आहे त्यात भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे स्पष्ट होत जातात.  मराठी लेखकात वि.स.खांडेकर हे त्यांचे आवडीचे लेखक होते.  त्यांची जवळपास सर्वच साहित्यकृती यशवंतरावांनी वाचली होती.  त्यातूनच त्यांनी कृतज्ञतेने 'प्रकाशाचा लेखक' म्हणून संबोधिले होते.  त्यांच्या साहित्याबद्दल ते लिहितात, ''त्यांच्या शब्दचमत्कृती, त्यांच्या कल्पनाचमत्कृती यांच्यामुळे त्यांचे लिहिणे मला आकर्षित करीत होते.  भाऊसाहेबांच्या कथा कादंबरीतील नायकाला आठवण झाली म्हणजे ती वार्‍याच्या आल्हाददायक झुळकीसारखी असायची.  भाऊसाहेबांच्या नायिकेला भीती वाटली तर ती भीती संध्याकाळच्या वेळी अंधारामध्ये पायामध्ये जसे काहीसे वळवळते वाटते, तशी ती भीती असायची.  भाऊसाहेबांच्या नायकाने एखाद्या तरुणीच्या उजव्या गालावरची खळी पाहिली म्हणजे आपण लहान असताना तळ्यात खडा मारल्यानंतर जे पाण्यात भोवरे फिरत फिरत जातात, त्यांची त्यांस आठवण व्हायची.  भाऊसाहेबांचे वाङ्‌मय वाचायला घेतले म्हणजे विजेची कोर आली नाही किंवा चवथीचे चांदणे आले नाही, असे कधी व्हायचे नाही.  भाऊसाहेबांच्या वाङ्‌मयांत निदान मी कधी अमावस्या पाहिली नाही.  ती विजेची कोर असेल किंवा चवथीचा चांद असेल किंवा अष्टमीचा चंद्रमा असेल किंवा पुनवेचा चंद्र असेल, असा हा चांदण्यांचा लेखक आहे, प्रकाशाचा लेखक आहे.  पण नुसत्या सहृदय लेखक नाही.  भाऊसाहेबांच्या लेखनामध्ये स्वप्नाळू सहृदयतेबरोबर निर्धारित क्रियाशीलताही आहे.  भाऊसाहेबांना फुले व चांदणे फार आवडते.  पण पुढे ते जसे लिहित गेले, तसे त्यांचे वाढते वाङ्‌मय सातत्याने १९४० पर्यंत मी नियमाने वाचले.''  यशवंतराव भाऊसाहेबांच्या लेखनशैलीचाच हळुवारपणे मागोवा घेतात.  त्यांच्या 'ययाती' या कादंबरीने दिल्ली आपलीशी करून भाऊसाहेबांची कीर्ती अमर झाल्याचेही सांगतात.  भविष्याचा वेध घेणारी प्रतिभा लाभलेला, थोर मानवतावादी कलावंत, द्रष्टा लेखक, मध्यमवर्गीय जीवनातील संघर्षाचे चित्रण करणारा लेखक, भावनांना स्पर्श करणारी सामर्थ्यवान लेखणी, विषमतेचे 'दोन ध्रुव' नाहीसे होण्याची उत्कट इच्छज्ञ अशी भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील व साहित्यातील अनेक रूपे यशवंतराव सांगतात.  ''लेखक या नात्याने भाऊसाहेब तसे बहुरूपी आहेत.  त्यांनी गुजगोष्टी लिहिल्या आहेत.  कथा लिहिल्या आहेत.  भाषणे केली आहेत.  टीकाकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.  त्यांची किती रूपे आहेत !  कादंबरीकार ते नंतर झाले.  कादंबरीकार म्हणून 'ययातीकार' म्हणून ते आज सर्वांच्या डोळ्यापुढे आहेत.  मानवतावादी कलाकार हे जे त्यांचे रूप आहे, ते माझ्या मनाने अतिशय महत्त्वाचे असे रूप आहे.''  यशवंतरावांनी मराठीतील एका थोर साहित्यिकाच्या वाङ्‌मयीन व्यक्तित्वाचा वेध येथे घेतला आहे.  तसेच खांडेकर, नोबेल प्राईज मिळविण्यापेक्षा तसूभरही कमी नाहीत, असे यशवंतराव गौरवाने म्हणतात.  

खांडेकरांच्या साहित्याच्या विचारानंतर त्यांनी स्वीकारलेल्या जीवनवादी भूमिकेचा यशवंतरावांनी विचार केला आहे.  मराठी वाङ्‌मयात कला-जीवनवाद खूपच गाजला.  त्यात खांडेकरांची जीवनवादी भूमिका होती.  खांडेकरांनी साहित्याकडे केवळ रंजनवादी भूमिकेतून पाहिले नाही, वास्तववादी दृष्टिकोन ठेवून, देश-काल, स्थितीचे चिंतन त्यांनी साहित्यातून केले. अंतिम सत्याचा शोध घेत त्यांना जे उत्कटेने व अपूर्वाईने जाणवले ते ते त्यांनी सुंदरतेने साहित्यातून व्यक्त केले.

यशवंतरावांचे चरित्रलेख प्रामुख्याने प्रत्यक्ष परिचयातून वाटणीस आलेल्या आठवणीतून साकारले आहेत.  एखादी गोष्ट सांगावी तसे यशवंतराव लिहितात, स्वाभाविकपणे यशवंतरावांचे हे लेख कुठे कथासदृश निबंध आहेत, कुठे लघुनिबंधात्मक लेख आहेत.  कुठे शब्दचित्रातील स्वभावचित्रे आहेत, कुठे जीवनदृष्टी मांडणारी क्षणचित्रे आहेत.  कुठे वेचलेल्या आयुष्याचे अनुभवकथन आहेत.  असे या लेखांचे विविध स्वरूपी रंग रूप आहे.  यशवंतरावांनी प्रसंगानुरूप हे चरित्रलेख लिहिले आहेत.  कधी त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातील एखाद्या स्मरणीय घटनेच्या निमित्ताने, कधी साठ वर्षांच्या परिपूर्तीच्या सोहळ्याच्या निमित्ताने तर कधी बर्‍याच वर्षांच्या भेटीगाठीच्या संबंधाने, कधी अचानक कानी आलेल्या एखाद्या वार्तेच्या निमित्ताने.  व्यक्ती जशा अनेक तशी लेखनाची निमित्तेही वेगवेगळी.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org