शैलीकार यशवंतराव ९२

यशवंतरावांच्या चरित्रलेखनातील चरित्रनायक समकालीन असावा, परिचित असावा आणि तोही व्यापक सहानुभूती, तत्त्व, जिज्ञासू बुद्धी यांनी मंडित असावा हा योग यशवंतरावांच्या चरित्रलेखन संबंधात अमृतयोगच म्हणावा लागेल.  'तत्त्वचिंतक रचनाकार' या लेखात डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या कृतार्थ जीवनाचा आलेखच ते वाचकांसमोर मांडतात.  ''कोणतीही निर्मिती करण्यासाठी लागणारे चातुर्य, कौशल्य दूरदृष्टी व संघटनकौशल्य गाडगीळांनी दाखविले म्हणून गाडगीळ आधुनिक महाराष्ट्राचे द्रष्टे पुरुष, तत्त्वचिंतक व रचनाकार होते हे निःसंशय आहे.''  असा त्यांच्या गुणांचा सार्थ गौरव करतात.  बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांनी केलेले कार्य म्हणजे 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या थोर तत्त्वाचे प्रतीक होते.  त्यांची लोकशाहीवर मात्र निष्ठा होती.  गरिबांच्या प्रश्नांची त्यांना कणव होती.  लोकहित जपण्याचे सापेक्षी धोरण त्यांनी अवलंबिले होते.  या सर्व त्यांच्या जीवनाच्या मूलभूत निष्ठा होत्या.  त्यांनी सहकारी संस्था उभारल्या, चालविल्या, त्यासाठी लागणारे सुजाण नेतृत्व त्यांच्या अंगी होते.  या विविध कार्यांतून त्यांचे जीवनकार्य साकार झाल्याचे यशवंतराव सांगतात.  

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याबद्दल यशवंतराव आदरभार व्यक्त करतात.  ''त्या व्यक्तिमत्त्वाला तीक्ष्ण बुद्धिमत्तेची व समतोल विचारशक्तीच झालर लागली आहे.''  असा त्यांचा यथोचित गौरवपूर्ण उल्लेख करतात.  शास्त्रीबुवांचे व्यक्तिमत्त्व हे एक आकर्षक व्यक्तिमत्त्व होते.  उघड्या अंगावर खादीची शाल, चेहर्‍यावर विद्वत्तेचे प्रखर तेज, साहित्य, तत्त्वज्ञान यांचे गाढे, व्यासंगे अभ्यासक, करुणा आणि मानवतावाद यांवर आधारलेली राष्ट्रीयता, भोगलेला कारावास, रॉयवादाच्या काळात नशिबी आलेली अप्रियता, मराठी भाषेच्या विकासाचे त्यांनी केलेले कार्य तसेच उत्तम गृहस्थ, प्रेमळ मित्र, विचारवंत वक्ते अशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची अनेक गुणवैशिष्ट्ये यशवंतराव सांगतात.

यशवंतराव चव्हाणांनी तात्यासाहेब केळकरांचे जीवन अनेक अंगांनी व मोठ्या जिव्हाळ्याने न्याहाळले.  यातूनच यशवंतरावांनी या श्रेष्ठतर व्यक्तीची जीवनदृष्टी, त्यांच्या जीवनासंबंधीच्या प्रतिक्रिया, त्यांच्या जीवनाचा आशय नि अर्थ, एका सहृदय तत्त्वजिज्ञासू मनाने टिपला आहे आणि यातूनच केळकरांवर चरित्रलेख लिहिला आहे.  केळकरांच्या साहित्य वाचनाने त्यांच्याबद्दलच आदरभाव द्विगुणित झाला.  वाचलेला व अभ्यासलेला त्यांच्या संबंधीचा सर्व इतिहास पुढील पिढयांसाठी नोंदवून ठेवावा या इच्छेमुळेच केळकरांच्या जन्मशताब्दी महोत्वसात ते सहभागी झालेले असावेत.  यशवंतरावांचा समतोलपणा व प्रांजळपणाही या चरित्रलेखात पाहावयास मिळतो.  केळकरांच्या साहित्यिक भव्य कामगिरीबद्दल यशवंतराव लिहितात, ''बुद्धी हे केळकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय वैशिष्ट्य होते.  पण केवळ त्या बुद्धिबळावरच केळकरांनी एवढे प्रचंड साहित्य निर्माण केले नाही तर अखंड वाचन, मनन व लेखन केल्यामुळेच दहा हजार पृष्ठे भरतील, एवढे प्रचंड साहित्य त्यांनी लिहिले.  वाङ्‌मयीन समीक्षा आतापर्यंत अनेकांनी केली आहे.  त्यांची सरळ भाषा, तिचा डौल, नर्म विनोद, खेळकरपणा युक्तिवादप्रधानता या सर्व गुणांचा तो एक गुच्छ होय.  पण केळकरांनी वृत्तपत्राचे व मासिकाचे संपादन म्हणून जी कामगिरी केली ती आजही आदर्श आहे.''  यशवंतरावांनी केळकरांच्या साहित्य व व्यक्तिमत्वातील वास्तव आणि सत्य येथे प्रकट केले आहे.  केळकर साहित्यिक म्हणून जसे येथे परिचित होतात तसे केसरीचे संपादक म्हणूनही त्यांनी केलेल्या कामाची नोंद यशवंतराव घेतात.  केळकरांनी कल्पकता, नवमताबद्दलची त्यांची जिज्ञासा, गुणी माणसांना जवळ करण्याची, उत्तेजन देण्याची त्यांची रीत, प्रतिपक्षाबद्दल त्यांच्या मनात असलेली न्यायबुद्धी, व्यवहारी दृष्टिकोन, वैचारिक कर्तृत्व, लो. टिळकांचे विश्वासू सहकारी इ. गुणांमुळे ते पुण्याच्या बुद्धिवैभवाचे प्रतीक होते.  ते लिहितात, ''केळकरांचे व्यक्तित्व, त्यांचे मन, त्यांची बुद्धी, त्यांचे जीवनकार्य, अत्यंत सुसंगत व सुधारित होते.''  या लेखात यशवंतरावांनी केळकरांचे साहित्यिक, व्यक्तिगत, राजकीय जीवन चित्रित केले आहे.  यशवंतरावांनी केळकरांच्या या बहुविध घटकांकडे लक्ष देऊन त्यांचे जीवनचित्रण अतिशय समर्थपणे केले आहे.  म्हणूनच यशवंतराव जसजसे त्यांच्या जीवनाची एकेक अवस्था मांडतात तसतसा नवा नवा देखावा दृष्टिसमोर सरकत असल्याचा भास हे चरित्रलेख वाचत असताना होत राहतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org