शैलीकार यशवंतराव ९

मनीचे गूज.....

हे पुस्तक म्हणजे मुळात पीएच.डी. पदवीसाठी लिहिलेला प्रबंध आहे.  (यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व वाङ्‌मय) हा प्रबंध मी २००२ साली सादर केला आणि आज २००९ साली आवश्यक ते संस्कार संक्षेप करून पुस्तक स्वरूपात प्रकाशित होत आहे.  यानिमित्ताने मला आनंद होणे स्वाभाविक आहे.

श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्याचा अनेकांगी अभ्यास येथे सादर करण्यात आलेला असला तरी तसा तो सर्वांगीण अभ्यास नाही याची प्रस्तुत लेखकाला जाणीव आहे.  यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटलेला आहे.  ते राजकारणात गेले नसते तर एक जाणते साहित्यिक झाले असते.  त्यांच्या लेखनात सातत्याने विपुल आणि विविध साहित्य गुणांचा अंतर्भाव झाला आहे.  त्यामुळे त्यांच्या साहित्याचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास होणे शक्य आहे.  त्याचप्रमाणे या ग्रंथात प्रकट झालेल्या दृष्टिकोनाविषयी देखील काही प्रमाणात मतभिन्नता होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  वाङ्‌मयाच्या अभ्यासात हे अपेक्षित असते.  इतकेच नाही तर आवश्यकही असते.  या ग्रंथातील प्रमेये मांडताना प्रस्तुत लेखकाने शक्य तेवढी तटस्थता राखण्याचा प्रयत्‍न केलेला असला तरी शेवटी त्याच्या विशिष्ट दृष्टीचे प्रतिबिंब त्यात पडले नसेलच असे म्हणता येत नाही.

मूळ प्रबंधात पृष्ठसंख्या अधिक असल्याने तो आहे तसा प्रसिद्ध करणे केवळ अशक्य होते.  त्याचा संक्षेप करीत तो दोन भागात पुस्तक रुपाने प्रसिद्ध होत आहे.  यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकीय व्यक्तिमत्त्व नसून ते मूलतः एक साहित्यिक होते.  ते साहित्यप्रेमीच नव्हे तर साहित्यिक प्रेमी, साहित्यनिर्माते आणि जीवनभाष्यकार होते.  त्यांच्या साहित्याला समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला गतिमान करण्याची ताकद लाभली आहे.  'शैलीकार यशवंतराव' हेच केंद्रस्थानी ठेवून प्रबंधाचे पुनर्लेखन केले आहे.  पुनर्लेखन करीत असताना संदर्भजडता कमी करून एक सलग, ओघवते असे विवेचन राहील याची दक्षता घेतली आहे.

प्रस्तुत पुस्तक म्हणजे श्री. यशवंतराव चव्हाण यांचे फक्त चरित्र किंवा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आढावा नव्हे तर यशवंतराव यांनी व्यक्ती म्हणून सिद्धहस्त साहित्यिक, राजकारणी, झंझावाती वक्ते, रसिक, लेखक अशा विविध रूपात अंतःकरणातील कलावंत जिवंत ठेवला.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या विविध पैलूंचे साहित्यातील स्थान निश्चित करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्‍न आहे.

माननीय श्री. यशवंतराव चव्हाण व्यक्ती म्हणून बालपणापासून मला परिचित होतेच.  कारण त्यांचे आजोळ देवराष्ट्र, शिक्षणभूमी व कर्मभूमी कराड, विटा ही गावे माझ्या 'अमरापूर' गावापासून अत्यंत निकट आहेत.  त्यामुळे शालेय शिक्षण घेत असताना एक नेता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी माझा परिचय होता.  शालेय शिक्षण संपल्यानंतर श्री. यशवंतराव चव्हाणसाहेबांचा साहित्यिक क्षेत्रातील दबदबा जाणवू लागला.  एक राजकारणी व्यक्ती साहित्यिक असते किंवा पुस्तक लिहू शकते ही बाब मला अचंबित करणारी होती.  हीच माझ्या लेखनाची प्ररेणा.  त्यानंतर पुढील शिक्षण घेत असताना 'मराठी' या विषयाचा विद्यार्थी व पुढे मराठी विषयाचा अधिव्याख्याता म्हणून त्यांच्या ग्रंथाचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या लेखनातील वैशिष्ट्ये ग्रंथरूपात मांडावी असे वाटू लागले.  प्रस्तुत ग्रंथात एखाद्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी होते, त्यांचे शब्द कसे आकार घेतात यासंबंधी स्वतंत्र प्रकरणातून साकल्याने विचार मांडला आहे.  यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य लेखन, प्रासंगिक लेख, भाषाप्रभू लोकाभिमुख कलावंत आणि नेता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख, त्यांची भाषणे व साहित्यातील भाषिक मूल्य, चरित्रात्मक, आत्मचरित्रात्मक, ललित स्वरूपातील लेखन, त्यातील देशीयता, नागरता, पत्रात्मक लेखन या सर्वांचा प्रस्तुत पुस्तकात विचार करण्यात आला आहे.  तसेच श्री. यशवंतरावांचा पिंड आणि त्यांची वाङ्‌मयनिर्मिती याचा परस्परानुबंध अधोरेखित केला आहे.  हे लेखन करत असताना थोडीशी पुनरावृत्ती झालेली असली तरी मांडणीची गरज म्हणून ती झालेली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org